जिल्ह्यात निवडणुकांचे जोरदार वारे

By Admin | Published: November 2, 2016 02:42 AM2016-11-02T02:42:10+5:302016-11-02T02:42:41+5:30

जिल्ह्यात सर्वत्र नगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.

Strong winds of elections in the district | जिल्ह्यात निवडणुकांचे जोरदार वारे

जिल्ह्यात निवडणुकांचे जोरदार वारे

googlenewsNext

आविष्कार देसाई,

अलिबाग- जिल्ह्यात सर्वत्र नगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून नवनवीन शक्कल लढविण्यात येत आहेत. यासाठी चक्क रामायणातील दाखले दिली जात आहेत.
पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शुंगारपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्यावेळी याचा प्रत्यय आला. चोऱ्यामाऱ्या, भ्रष्टाचार करणारे भाजपामध्ये गेले की, त्यांचा वाल्मीकी होतो. इतर राजकीय पक्षात मात्र वाल्याच राहत असल्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगून उपस्थितांना धक्का दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन महाराष्ट्र’ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील जनतेसाठी कोणते क्रांतिकारक निर्णय घेतले, त्याचे फलित काय झाले, याची माहिती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश महेता अलिबागमध्ये दाखल झाले होते. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वरील माहिती दिली.
‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये रायगडचे योगदान, महत्त्वाबाबत महेता यांना विचारणा केली असता, याबाबत तीन महिन्यांत पुस्तिका छापणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांंमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाला उधाण आले आहे. काहीच दिवसांपूर्वी पेण नगरपालिका क्षेत्रातील विविध राजकीय नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. यात पेण अर्बन बँकेच्या सुमारे ७५० कोटी रुपयांच्या घोटाळ््यातील आरोपी संतोष शुंगारपुरे यांचाही समावेश होता.
भ्रष्टाचाऱ्यांची जागा जेलमध्ये आहे, असे भाजपा ओरडून ओरडून सांगते, असे असताना शुंगारपुरेसारख्या व्यक्ती तुम्हाला कशा चालतात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा वाल्मीकी होणार असेल, तर त्यांना मदत करणार का, असे प्रश्नही मेहता यांना विचारण्यात आले. यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द होणाऱ्या कोणाचीही भाजपा गय करणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
>सांबरकुंड धरणाबाबत महेता अनभिज्ञ
पहिल्या पंचवार्षिक योजनेतील सांबरकुंड धरण अद्याप पूर्ण झालेले नाही. सरकार बदलले परंतु प्रश्न जैसे थे आहे. हे धरण अलिबाग तालुक्यातील रामराज येथे प्रस्तावित आहे. धरणाच्या निर्मितीबाबत प्रश्न विचारला असता, प्रकल्प कोठे आहे, प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घेतो, असे मोघम उत्तर महेता यांनी दिले. सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन भूसंपादन कायद्यानुसार सुमारे ३३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई सरकारने देऊ केली आहे. हेही मेहता यांना माहित नव्हते.
>मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होणार
मुंबई-गोवा महामार्गाचे काम ३१ डिसेंबर २०१६ पासून सुरू होईल आणि ठरलेल्या मुदतीत पूर्ण होणार असल्याचे महेता यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्याबाबतही संबंधित विभागांना रस्ते सुस्थित करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महाड येथील सावित्री नदीवरील पूल नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यात कामाचे भूमिपूजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Strong winds of elections in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.