विद्यार्थी विकासाला बळ; संशोधनाला चालना

By admin | Published: March 25, 2017 12:47 AM2017-03-25T00:47:42+5:302017-03-25T00:49:44+5:30

शिवाजी विद्यापीठाचे ३४१ कोटींचे अंदाजपत्रक : राज्यात पहिल्यांदाच आॅनलाईन प्रक्रिया; विद्यार्थ्यांना मिळणार ‘टॅब’

Strengthening of student development; Exploration of research | विद्यार्थी विकासाला बळ; संशोधनाला चालना

विद्यार्थी विकासाला बळ; संशोधनाला चालना

Next

कोल्हापूर : संशोधन जागृती व सुविधा साहाय्य अनुदान, गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार अशा विविध नवीन योजना, उपक्रमांचा समावेश असलेले विद्यार्थीकेंद्रित आणि संशोधनाला चालना देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या ३४१ कोटी ५० लाख ७२ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला अधिसभेने शुक्रवारी मान्यता दिली. यावर्षी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने अंदाजपत्रकासाठी पूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली. अशा स्वरूपातील हा विद्यापीठ पातळीवरील राज्यातील पहिलाच प्रयत्न ठरला आहे.
विद्यापीठ कार्यालयातील या सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विशेष कार्य अधिकारी डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. अधिसभेसमोर २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या या अंदाजपत्रकात ३४१ कोटी ५१ लाख ३२ हजार रुपये अपेक्षित जमा, तर अपेक्षित खर्च ३४४ कोटी २७ लाख ८५ हजार इतका अंदाजित आहे. हे अंदाजपत्रक २ कोटी ७७ लाख रुपये इतक्या तुटीचे आहे. अंदाजपत्रक तुटीचे असले, तरी ते विद्यार्थी विकासाला बळ आणि संशोधनाला चालना देणार असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे व कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी अधिसभेत स्पष्ट केले.
या वर्षीच्या अंदाजपत्रकात गेल्या वर्षीच्या तुलनेत अपेक्षित जमा रकमेत ११ कोटी ११ लाख आणि अपेक्षित खर्चात १४ कोटी २८ लाख रुपयांची वाढ झाली आहे. हे अंदाजपत्रक देखभाल, विकास, वेतन, संस्था योजना आणि निलंबन लेखे यांमध्ये विभागले आहे. अंदाजपत्रकात गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिपअंतर्गत विद्यापीठातील विविध अधिविभागांच्या रौप्यमहोत्सवी वर्षासाठी तेथील संशोधक विद्यार्थ्यांसाठी दोन लाख, सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी पाच लाख रुपयांची संशोधन शिष्यवृत्तीसाठी आर्थिक तरतूद केली आहे.
महाविद्यालयातील शिक्षकांना संशोधन साहाय्य अनुदान,
पदवी पातळीवरील विद्यार्थ्यांना संशोधन जागृती अनुदान, नोंदणीकृत संशोधन विद्यार्थ्यांसाठी सुविधा साहाय्य अनुदान व छत्रपती शिवाजी
महाराज पुरस्कार यासाठी एकत्रितपणे
१३ कोटींचा कॉर्पस फंड तयार करण्यात आला आहे.
या सभेस अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, वासंती रासम, पी. एस. पाटील, ए. एम. गुरव,
ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, आर. व्ही. गुरव, पी. टी. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन.
शिंदे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


नोंदणी ते पूर्तता अहवालापर्यंत आॅनलाईन प्रक्रिया
या वर्षीचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी वित्त विभागामध्ये संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. याद्वारे खर्चाची नोंदणी ते पूर्तता अहवालापर्यंतची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली असल्याचे प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रणालीत विद्यापीठातील विविध विभागांना एकूण ८० स्वतंत्र आॅनलाईन लॉगीन उपलब्ध करून दिली.
याद्वारे पहिल्यांदाच संबंधित विभागांनी आॅनलाईन पद्धतीने अंदाजपत्रक नोंदविले. मसुदा व छाननी समितीने दाखविलेल्या त्रुटी उपस्थितांना आॅनलाईन कळवून त्यांची पूर्तता अहवाल या प्रणालीद्वारे प्राप्त करून घेतली. आॅनलाईन अंदाजपत्रकाचा विद्यापीठ पातळीवरील हा राज्यातील पहिल्याच प्रयत्न आहे.


पदसिद्ध अधिकाऱ्यांची उपस्थिती
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. मात्र, त्यानुसार नवीन अधिकार मंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाची शुक्रवारची अधिसभा पदसिद्ध सदस्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. यामध्ये अंदाजपत्रक आणि विद्यापीठाच्या ५३ व्या वार्षिक अहवालास मंजुरी देण्यात आली.

विद्यार्थीकेंद्रित आणि सर्वांगीण विकासाचे या वर्षीचे अंदाजपत्रक आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने विविध योजना, उपक्रमांचा समावेश केला आहे. पेपरलेस कामकाजाच्या दृष्टीने या वर्षीच्या अंदाजपत्रकाची प्रक्रिया आॅनलाईन राबविली आहे. अधिसभेचे इतिवृत्त आॅनलाईन नोंदविले आहे. विद्यापीठाला ज्ञानाच्या मार्गानेच उत्पन्न वाढविता येते. त्यामुळे ज्ञानाच्या सीमा रुंदावण्यात येतील. -डॉ. देवानंद शिंदे , कुलगुरू


अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये
ई-लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन लाखांची तरतूद
विद्यापीठाच्या वसतिगृहांमधील मेस व उपाहारगृहांच्या सुधारणेसाठी २५ लाखांची तरतूद
उत्कृष्ट संशोधक पुरस्कारासाठी १ लाख, तर संशोधनविषयक उपक्रमांसाठी ५ लाखांचा निधी
सर्वोत्कृष्ट अधिविभाग योजनेअंतर्गत विज्ञान, अभियांत्रिकी व अन्य विभागांसाठी २० लाख रुपयांची तरतूद
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी
ाृहकर्ज योजनेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद

तंत्रज्ञान अधिविभाग, स्कूल आॅफ नॅनो सायन्सच्या पायाभूत सुविधांसाठी अनुक्रमे ५० व ४० लाखांची तरतूद
विद्यापीठ परिसरातील जलसंधारण समृद्धी योजनेसाठी ५० लाख.
साताऱ्यातील शहीद स्मृती केंद्राच्या देखभालीकरिता ५ लाखांची तरतूद
बेटी बचाव आणि अवयवदान भियानाद्वारे समाजात जागृती करण्यासाठी ३ लाख
विद्यापीठाच्या अतिथिगृहाचे नूतनीकरण, विस्तारीकरणासाठी ४० लाख, मुद्रणालयात आधुनिक यंत्रसामग्री खरेदीसाठी १ कोटी ८० लाख
डॉ. बाळकृष्ण यांच्या ‘शिवाजी द ग्रेट’ ग्रंथाच्या छपाईसाठी ८ लाख रुपयांची तरतूद

Web Title: Strengthening of student development; Exploration of research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.