राज्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’अभियानास प्रारंभ

By Admin | Published: March 28, 2017 06:15 PM2017-03-28T18:15:57+5:302017-03-28T18:15:57+5:30

मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचा शुभारंभ

Start of 'Advanced Agriculture Affordable Farmers' campaign in the state | राज्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’अभियानास प्रारंभ

राज्यात ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’अभियानास प्रारंभ

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28: मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचा शुभारंभ केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. आकाशवाणीवरून शेतकऱ्यांना संदेश प्रसारीत करून कृषिमंत्र्यांनी अभियानाची सुरूवात केली.
 
या अभियाना विषयी अधिक माहिती देतांना फुंडकर म्हणाले, शेतकरी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पुढील वर्षाच्या शेतीचे नियोजन सुरु करतो. त्याप्रमाणे शासनाने देखील खरीप हंगामाच्या शेतीचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा आणि घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे हा या नियोजनाचा मुख्य हेतू आहे.
 
तालुका हा विकास घटक:5 वर्षाचा बियाणे पुरवठ्याचा आराखडा-
या वर्षीपासून कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी तालुका हा विकास घटक ठरवून नियोजन करण्यात आले आहे. शासनाने खरीप हंगामामध्ये लागणारे उत्तम प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पुढील 5 वर्षाचा बियाणे पुरवठ्याचा आराखडा देखील तयार केलेला आहे.  खतांचा शेतकऱ्यांना मुबलक पुरवठा वेळेत होईल याबाबतही नियोजन केलेले आहे. दर्जेदार कंपन्यांचे कीटक नाशके, शासकीय प्रयोगशाळेतून जैविक द्रवरूप खते व जैविक कीटक नाशकांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. कृषी विभागासह सर्व कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, आणि सर्व संशोधन संस्था यांनी त्यांच्याकडील कामाचे नियोजन केलेले आहे.
कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम-
शेतकरी बांधवाना खरीप पूर्व मशागतीची व पेरणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी, शेतीतील बैलांची कमी झालेली संख्या व ऐन हंगामात निर्माण होणारी मजुरांची टंचाई यावर मात करून पिकांच्या काढणी पर्यंतची कामे सुकरपणे करणे शक्य व्हावे यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांना 4 बैलांचे काम करू शकणारे छोटे ट्रॅक्टर, पॅावर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, थ्रेशर, तसेच भातासाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, ऊसासाठी पाचट कुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर इ. यंत्र खरेदी साठी वर्षाच्या सुरुवातीपासून शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे. ही यंत्रे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने खरेदी करण्याची मुभा शासन देणार आहे आणि त्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवडा
या वर्षी संपूर्ण ‘रोहिणी’ नक्षत्रातील 15 दिवस कृषी विभाग “उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवडा” साजरा करणार आहे. या पंधरवड्यात सर्व कृषी शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी – कर्मचारी गावोगावी जावून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहेत.  शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देतील. या वर्षात राज्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना विविध पिकांच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
1 कोटी सहा लाख शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप-
 
शासनाने राज्यातील शेत जमिनींची आरोग्य पत्रिका तयार करून 1 कोटी सहा लाख शेतकऱ्यांना वितरीत केल्या आहेत. सदर आरोग्य पत्रिकांच्या आधारे शेतकऱ्याने आपल्या जमिनीत घेणाऱ्या पिकांकरिता आवश्यक मात्रेतच खते द्यावीत व उत्पादन खर्चामध्ये बचत करावी. याकामी शेतकऱ्यांना गावातील कृषी सहाय्यकांचे सहाय्य मिळणार आहे.
 
फुंडकर पुढे म्हणाले की, कृषी विभाग नवीन वर्षामध्ये गाव पातळीवर 10 हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहे. यामध्ये शेतकरी गटास प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण शास्त्रज्ञांमार्फत देण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकांसाठी लागणारे खते, बियाणे, औषधे याची खरेदी शेतकऱ्यांनीच करावयाची आहे आणि त्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येईल.
 
ठिबक सिंचनासाठी तातडीने पूर्वसंमती-
 
 नविन वर्षात ठिबक सिंचन योजनेच्या निधीमध्ये भरीव वाढ केली जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून ते डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा दिली जाईल. पात्र लाभार्थ्यांना तातडीने पूर्वसंमती देण्यात येईल जेणेकरून शेतकऱ्यांना पिक लागवडी पासूनच ठिबक सिंचन संच बसविणे शक्य होईल. शासन ठिबक सिंचन संचाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करेल.
 
आठ हजार कांदा चाळींची उभारणीचे नियोजन-
 
राज्यातील शेतकऱ्यांची कांदा चाळउभारणी करिता असलेली मोठी मागणी लक्षात घेता कांदा चाळीसाठी भरीव तरतूद केली आहे. या माध्यमातून दोन लाख मेट्रीक टन कांदा साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी आठ हजार चाळींची उभारणीचे नियोजन आहे व त्याकरिता शासन शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान देईल.
 
राज्यातील ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी ऊसाच्या सुधारित वाणांची लागवड करण्याच्या दृष्टीने रोपांपासून ऊसाची लागवड करण्याच्या तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर शेडनेटमध्ये ऊसाची रोपवाटिका तयार करण्याकरिता अनुदान देण्यात येईल.
शेतकऱ्यांना कमी नैसर्गिक साधन सामुग्रीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य व्हावे म्हणून शेड नेट व हरित गृहउभारण्याकरिता शासन यावर्षी प्रमाणेच नवीन वर्षात देखील भरीव निधी उपलब्ध करून देईल. त्याचप्रमाणे शासन फलोत्पादनासाठी देखील भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना प्राथमिक प्रक्रिया युनिट उभारण्याकरिता अर्थसहाय्याची योजना-
शेतकऱ्यांना शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून मूल्यवर्धित माल बाजारपेठेत विक्रीस नेणे शक्य व्हावे म्हणून शेतकऱ्यांना प्राथमिक प्रक्रिया युनिट उभारण्याकरिता अर्थसहाय्य करण्याची नवीन योजना कृषी विभागामार्फत ह्या वर्षापासून सुरु करणार आहे.  
शेतकऱ्यांच्या शेतावर ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, आधुनिक औजारे, कांदा चाळी, शेड नेट, विहिरी, पंप इ. पायाभूत सुविधा निर्माण करून शेतकऱ्यांना आधुनिक शेती करता यावी व त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ व्हावी ही शासनाची भूमिका आहे. त्याकरिता नवीन वर्षात शेतकऱ्यांना शासन मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य पुरविणार आहे. शासनाचे सदर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर देण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याकरिता  शेतकरी बांधवांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे तसेच, ज्यांच्या आधार क्रमांक नसतील त्यांनी तातडीने नजीकच्या सेवा केंद्रातून आपले आधार कार्ड काढून घ्यावे. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारीत फळ पीक योजनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहनही फुंडकर यांनी केलं.

Web Title: Start of 'Advanced Agriculture Affordable Farmers' campaign in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.