आजपासून श्रावणास प्रारंभ हर हर महादेव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:22 AM2017-07-24T02:22:19+5:302017-07-24T02:22:19+5:30

श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून, दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. यावर्षी

Shravanas starting from today every Har Mahadev! | आजपासून श्रावणास प्रारंभ हर हर महादेव!

आजपासून श्रावणास प्रारंभ हर हर महादेव!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून, दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. यावर्षी दि. २४ जुलै रोजी पहिला श्रावणी सोमवार असून, पाच सोमवार आले आहेत.
पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार वृक्षांनी वेढलेल्या जंगलात आंबेगाव व खेड तालुक्याच्या हद्दीवर श्री क्षेत्र भीमाशंकर वसले आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले असून, या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. तसेच भीमाशंकरमधून भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर हे ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनक्षेत्र म्हणून लोकांना आकर्षित करते. निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते. १३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले घनदाट सदाहरित हिरवेगार जंगल येथे आहे. या जंगलात शेकरू नावाची मोठी खार आढळते. तसेच जंगली प्राणी, पशूपक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आढळतात. पावसाळ्यात सतत धुक्याने हा परिसर व्यापलेला असतो. पोर्तुगीज काळातील घंटा, घंटेला लागून असलेले शनिमंदिर, मंदिराजवळचे गोरक्षनाथ मंदिर, पायऱ्यांच्या सुरुवातीला असलेले कळमजाई देवीचे मंदिर, ही प्राचीन मंदिरे आहेत.

या यात्रेचे नियोजन भीमाशंकर देवस्थान ट्र्रस्ट करत असते. यावर्षी दि.२४ पासून श्रावण महिना सुरू होत असून, दि.२४, ३१, ७, १४, २१ असे पाच श्रावणी सोमवार आले आहेत, तर दि. ३०, ६, १३, २० या दिवशी रविवार सुटी आली आहे. दि. ७ आॅगस्ट रोजी रक्षाबंधन, १५ आॅगस्ट, दि. १७ रोजी पतेतीची सुटी आहे. श्रावण महिन्यात खूप सुट्या आल्याने तसेच यावर्षी पाऊसदेखील चांगला झाला असल्याने पर्यटक व भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. श्रावणापूर्वीच पर्यटकांचा महापूर भीमाशंकरकडे ओसंडलेला दिसला.

भीमाशंकर अभयारण्यात हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनीमातेचे मंदिर आहे. जंगलात गुप्त भीमाशंकर हे ठिकाण असून येथे साक्षीविनायकाचे मंदिर आहे. गुप्त भीमाशंकर या ठिकाणी श्रावण महिन्यात अनेक भाविक दर्शनासाठी जातात. भीमाशंकर जंगलातील भोरगिरी या ठिकाणी कोटेश्वराचे मंदिर असून, श्रावण महिन्यात येथेही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.
४हे मंदिर प्राचीन काळातील असून, येथे अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भोरगिरी गावाला लागूनच भोरगड हा किल्ला असून येथे जुन्या काळातील लेण्या आहेत. हा भोरगड व येथील धबधबे पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक येत असतात. पावसाळ्यात मुंबई व उपनगरातील धाडसी पर्यटक व गिर्यारोहक खांडस, पदरमार्गे शिडी अथवा बैलघाटाने भीमाशंकरमध्ये येत असतात.
४ही वाट शिवकालीन असून या रस्त्याने भीमाशंकरकडे
येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भीमाशंकरमध्ये श्रावण महिन्याबरोबरच महाशिवरात्र, चातुर्मास, त्रिपुरी पौर्णिमा या काळात यात्रा भरते. यातील श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. पूर्ण एक महिना दर्शनासाठी भाविकांची येथे गर्दी असते.

संगमेश्वर मंदिर
सासवड येथे कऱ्हा व भोगावती (चांबळी) नदीच्या संगमावर श्री संगमेश्वराचे मंदिर असून ते पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे. नदीकाठावर सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, पांदेश्वर अशी शंकराची मंदिरे आहेत.
मंदिरामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या ‘गुळाचा गणपती’मधील ‘इंद्रायणी काठी’ या अभंगाचे तसेच अनेक प्रसंगांचे चित्रीकरण येथे झाले. साहित्यसम्राट आचार्य प्र. के. अत्रे यांचे बालपण सासवड येथे कऱ्हेकाठी गेले. त्यांना हा परिसर अतिशय प्रिय़ त्यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘कऱ्हेचे पाणी’ असे असून, पुस्तकावर श्री संगमेश्वर व परिसराचे रम्य चित्र आहे.
४संगमेश्वर व वटेश्वर मंदिराचे बांधकाम एकमेकांसारखेच आहे. आताच्या भाषेत ही अक्षरश: कार्बन कॉपी आहे. भव्य मंदिर आहे. दगडी कासव, खांबावर शिल्पकाम आहे. सासवड येथे आलेला प्रवासी भव्यता पाहून दीपून जातो.
४मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हातीर आहे. घाटावर खडकेश्वर मंदिर व सतीची समाधी मंदिरे दिसतात. पश्चिम बाजूस उद्यानासाठी जागा आहे. श्रावणी सोमवार, महाशिवरात्र या दिवशी येथे गर्दी असते. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात दिवे लावून रोषणाई केली जाते. ते दृष्य विलोभनीय असते.
४कऱ्हा नदी परिसर स्वच्छ करणे, तसेच संत सोपानदेव मंदिर ते संगमेश्वर मंदिर रस्ता करणे, सुशोभीकरण इ. कामे नगर परिषदेने हाती घेतली आहेत. कऱ्हा व चांबळी नदी वाहत असताना हे मंदिर अतिशय विलोभनीय दिसते.


बनेश्वर मंदिर
नसरापूर गावाजवळ बनेश्वराचे प्राचीन मंदिर असून, त्याचे बांधकाम हेमाडपंथी असून, २ कळस आहेत. कळसाखाली मुख्य मंदिरात १ व त्याच्यावर १ असे २ गाभारे आहेत.
गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या शिवलिंगाची शाळुंका उचलून आतमध्ये हात लावल्यास आतमध्ये पाणी वाहत असून, त्यामध्ये सुमारे दीड फूट खोलीवर एकत्र पाच गुप्त लिंगे हाताला लागतात.
मंदिरापुढे मोठा नंदी आहे. त्याच्यावर नगारखान्याची व्यवस्था आहे. मंदिर परिसरात स्वच्छ पाण्याची ३ कुंडे आहेत. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असून, तोरण, सभामंडप, गाभारा अशा ३ भागांत आहे.
नागेश्वर मंदिर
भोर शहरापासून १३ किलोमीटरवर आंबवडे गावातील निसर्गरम्य वातावरणात पांडवकालीन नागेश्वराचे मंदिर आहे. या पांडवकालीन मंदिराचा जीर्णोद्धार भोर संस्थानच्या पंतसचिवांनी केला. नागेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा कारभार पाहिला जातो. पूर्ण दगडाचे मंदिर असून, दगडी खांबावर मंदिर उभे आहे. जिवंत पाण्याची कुंडे असून, १२ महिने भरून वाहतात. त्याचबरोबर गायमुखही आहे. महाशिवरात्रीला भाविक मोठी गर्दी करतात. गावात यात्राच भरते.
४भोरच्या राजवाड्याशेजारी १७८३ मध्ये भोरचे राजे सदाशिव चिमणाजी यांनी हे मंदिर बांधले. त्या वेळी नांगरट करताना शेतात पिंड सापडली, म्हणून मंदिर बांधले, असे पुजारी सांगतात. येथे महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, कार्तिक पौर्णिमेला उत्सव साजरा केला जातो. राजवाडा, नीरा नदीघाट पाहण्यास लोक येतात.
४बनेश्वराचा २१ एकर परिसर केतकी, चंदन, केवडा, जांभूळ, करंज यांसारख्या वृक्षांनी वेढलेला आहे. शेजारून शिवगंगा नदी वाहते.
पावसाळ््यात या ठिकाणचे सौंदर्य अवर्णनीय असते. श्रावण सोमवारी भाविक दर्शनाला
येतात. पुणे शहरापासून ३० किलोमीटर
अंतरावर नसरापूर फाट्यावरून बनेश्वर १ किलोमीटरवर आहे. स्वारगेट नसरापूर पीएमटीची सोय उपलब्ध आहे.

कपर्दिकेश्वर
जुन्नर तालुक्यात अनेक पुरातन देवस्थाने व देवालये आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा ८५ किलोमीटर व आळेफाट्यापासून राष्ट्रीय महामार्ग नगर-कल्याण महामार्गावर आळेफाट्याकडून पश्चिमेकडे १६ किलोमीटर अंतरावर ओतूर व ओतूरच्या उत्तरेस दीड किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र ओतूर येथे श्री कपर्दिकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
या मंदिरात प्राचीन असे शिवलिंग आहे. ओतूरचे ते ग्रामदैवत असून, नवसाला पावणारे, मनोकामना पूर्ण करणारे दैवत आहे, महादेव आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कपर्दिकेश्वर मंदिर हे मांडवी नदीकाठी असून, मंदिराजवळ या नदीने चंद्राकृती वळण घेतले आहे. म्हणून या नदीला चंद्रभागेचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
४यात्राकाळात अभिषेकासाठी अभिषेक कक्ष तयार केला जातो. भाविक पहाटे ४ वाजल्यापासून गर्दी करतात. त्यांना रांगेत सोडण्यासाठी दर्शनरांगेची व्यवस्था केली जाते. स्वयंसेवक व पोलिसांचे यावर नियंत्रण असते. श्रावण महिन्यात दर सोमवारी स्वयंभू शिवलिंगावर तांदळाच्या कलात्मक पिंडी असतात. शिवलिंगावर तांदळाची पिंड तिच्यावर परत पिंड
एकावर एक अशा असतात. एका पिंडीची उंची ५ फुटांपर्यंत असते. पहिल्यास एक, दुसऱ्यास दोन, तिसऱ्यास तीन, चौथ्यास
चार, पाचवा सोमवार असेल तर पाच पिंडी असतात.
४या पिंडीसाठी भाविक रविवारी सायंकाळी वाजतगाजत तांदूळ घेऊन येतात. हे पिंडीचे तांदूळ नवसाचे मनोकामना, इच्छापूर्तीचे असतात. ते पुजाऱ्याकडे पूजा करून सुपूर्त करतात. त्या तांदळाच्या पिंडी असतात.

भुलेश्वर

लोकमत न्यूज नेटवर्क
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वराच्या यात्रेस सुरुवात झाली असून यात्रेची सांगता श्रावणातील शेवटच्या सोमवारी होणार आहे.
दिवेघाटापासून पूर्वेकडे निघालेल्या डोंगररांगेत शेवटच्या टेकडीवर महाराष्ट्रात जागृत देवस्थान व पुणे जिल्ह्यात शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे भुलेश्वर.
बाहेरून तीन घुमटामध्ये इतके साधे दिसणारे मंदिर आत आल्यानंतर शिल्पकलेने किती परिपूर्ण आहे, हे पाहावयास मिळते. मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीची असून मंदिराच्या बांधकामाविषयी कुठेही शिलालेख नाही. परंतु या ठिकाणी असणाऱ्या सप्तमातृकांच्या मूर्तीवरून मंदिर १० व्या शतकापूर्वीचे असल्याचे वाटते. बांधकामासाठी वापरलेला चार प्रकारचा दगड व न्हाणी कुंड पाहिल्यावर मुख्य मंदिर, ओवरी; आवारभिंत, सभामंडप व शिखरे अशा चार टप्प्यात मंदिराचे बांधकाम झाल्याचे जाणवते. कारण पूर्वी मंदिर बांधल्यानंतर पूजेचे पाणी थेट मंदिराबाहेर निघेल, अशी व्यवस्था केलेली असायची, पण या ठिकाणी पाणी न्हाणीकुंडातून उपसून काढावे लागते. मंदिरासमोर असणारा सभामंडप व त्यावरील नगारखाना व तीन शिखरे याचे बांधकाम पुण्याचे पेशवे व सातारचे शाहूमहाराज यांचे गुरु ब्रम्हेंद्रस्वामीयांनी केल्याचे पुरावे सापडतात.
सभामंडप पार करून पुढे आल्यावर लाकडी दरवाजापुढे एका दगडी चौकटीत मारुतीची मूर्ती दिसते, ती कालांतराने नंतर बसवली असल्याचे जाणवते. पुढे दगडी जिना चढून वर आल्यानंतर भव्य दगडी नंदी दिसतो. सूर्याचा पडणारा पहिला किरण शिवलिंगावर पडावा, म्हणून महाकाय नंदीची मान उजवीकडे वळवण्यात आली आहे. नंदीसमोर गाभाऱ्यात भुलेश्वराचे सुंदर असे शिवलिंग दिसते. भुलेश्वराचे दर्शन करून आल्यावर प्रदक्षिणा मार्गावर सीतास्वयंवर, चौसष्टयोगिनी, सप्तमातृका, सीतेचे अपहरण, महाभारतातील युद्धप्रसंग, शरपंजरी भीष्माचार्य, द्रौपदी स्वयंवर, समुद्रमंथन अशी विविध शिल्पे पाहावयास मिळतात. डोंगरावर असणारे बुरुज दिसल्यावर पूर्वी या ठिकाणी किल्ला असल्याचे जाणवते. डोंगराला पूर्ण प्रदक्षिणा मारली तर बुरुज व तटबंदी दिसते. पूर्वी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात यास दौलत मंगळगड असेही संबोधले जायचे.
सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहेत. येणारा पर्यटक या ठिकाणी कसा आकर्षक होईल, हे सर्वच विभाग पाहतात. वनविभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वागत कमानी उभारल्या आहेत.

नागेश्वर

दौंड तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटस गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी आहे. पाटस गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्री नागेश्वर हे ग्रामदैवत आहे. प्रतिवर्षी त्रिपुरी पौर्णिमेस या ग्रामदैवताचा उत्सव सर्व धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तसेच श्रावण शुद्ध महिन्याच्या प्रारंभापासून श्री नागेश्वरांच्या मंदिरात संपूर्ण श्रावण महिना विविध धार्मिक कार्यक्रमांनी दुमदुमला जातो. श्री नागेश्वर देवाविषयीची एक आख्यायिका आहे. नागेश्वर देवस्थान स्वयंभू असून ते भाविकांचे आणि भक्तांचे आराध्य दैवत आहे. ५0 वर्षापूर्वी नागेश्वराच्या पिंडीवर नाग होता व हा नाग बेलात होता. भाविकांच्या पिंडीजवळ एक तबक ठेवून त्यात दुधाची वाटी ठेवली. काही वेळातच नाग पिंडीवरून तबकात येऊन बसला त्या वेळेस भक्तांनी ते तबक धाडसाने उचलून बाहेर पालखीत ठेवले. तरीही नागाने काही हालचाल केली नाही. मिरवणूक संपल्यानंतर नागाला देवळातील तुळशीवृंदावनामध्ये हळूच सोडले व नंतर तो नाग नाहीसा झाला.

गोपीनाथ

गोपीनाथ महाराज मंदिर
वरवंड (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत स्वयंभू गोपीनाथमहाराजांचे यादवकालीन मंदिर आहे. साधारणत: पुण्यापासून ६0 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर वसलेले आहे. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ख्याती आहे. पांडव वनवासाच्या काळात असताना या ठिकाणी थांबले. त्यांनी भात शिजवून खाल्ला. पण हात धुण्यासाठी पाणी न मिळाल्याने
रागाने त्यांनी हात झटकले तेव्हा त्या हाताला चिकटलेली शीते दूर भिरकावली जाऊन त्याचे असंख्य गारांत रुपांतर झाले. विशेष म्हणजे त्या गारा पाण्यावर तरंगत असत. असे जाणकार सांगतात. नंतर लोकांनी परिसरातील मुरुम उचलल्यामुळे गारा नष्ट होत गेल्या. दरवर्षी दिवाळीनंतरच्या कार्तिकी महिन्यातील त्रिपुरी पौर्णिमेला देवाचा उत्सव असतो. या दिवशी शंकराने त्रिपुर नावाच्या राक्षसाचा वध केलेला होता. महिला या दिवशी दिवे लावून त्रिपूरवाती जाळतात. लोक मंदिराला नवसाचे ध्वज बांधतात. देवाची दररोज संध्याकाळी ७.३0 वाजता आरती केली जाते. दर पौर्णिमेला दहीभाताची पिंड करून अन्नदान केले जाते.

सोमेश्वर
बारामती तालुक्यातील नीरा—बारामती रस्त्यावर सोमेश्वरनगर बसथांब्यावर उतरले, की तीन किलोमीटर अंतरावर करंजे गावामध्ये चिंचेच्या झाडीत द्वापारयुगाच्या खुणा जपणारे सोमेश्वर मंदिर दिसते. या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. या मंदिरात शेकडो वर्षांपासून खरं-खोटं करण्याची तीर्थाची विहीर आहे. आजही या ठिकाणी जमिनीचे वाद, कोर्टातील वाद, पैशाचे व्यवहार, चोरीचा आळ व तंटे मिटतात.
राज्यातील अनेक भागांतून या ठिकाणी
भाविक येतात. या मंदिरात जाऊन देवाचा गुलाल उचलावा लागतो. मात्र खोटे बोलणाऱ्याने आजतागायत हा गुलाल उचलण्याआधीच गुन्हा कबूल करतो. आजही संगणकाच्या युगात
भक्तांचे पोलीस स्टेशन, न्यायालयाच्या कायद्याबरोबरच देवाच्या कायद्यावरही विश्वास आहे. जिल्हयातून लांबून या ठिकाणी खरे खोटे करण्यासाठी भाविक येतात.

Web Title: Shravanas starting from today every Har Mahadev!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.