शिवछत्रपतींच्या धाकामुळेच वसली आजची मुंबई...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 09:52 AM2019-02-19T09:52:06+5:302019-06-06T17:18:55+5:30

जानेवारी १६६४ मध्ये शिवरायांनी सुरतेवर पहिली स्वारी केली. मुघलांची 'सूरत' 'बदसुरत' करणं, हा या स्वारीचा प्रमुख उद्देश होता.

Shiv Jayanti Special feature: Shivaji Maharaj Mumbai Connection | शिवछत्रपतींच्या धाकामुळेच वसली आजची मुंबई...

शिवछत्रपतींच्या धाकामुळेच वसली आजची मुंबई...

googlenewsNext
ठळक मुद्देशिवरायांच्या या धडाडी आणि शौर्यामुळेच प्रामुख्याने मुंबई वसवली गेली, याची अनेकांना कल्पना नसेल.१६७०च्या ऑक्टोबर महिन्यात शिवरायांनी सुरतेवर पुन्हा स्वारी केली आणि मुघल सुरतेचे संरक्षण करण्यास असमर्थ आहेत, हे अधोरेखित झालं.

>> संकेत सातोपे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शूर योद्धे, शककर्ते, कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष राजे अशी छत्रपती शिवरायांची अनेक रुपं आपल्याला माहीत आहेत. पण शिवरायांच्या या धडाडी आणि शौर्यामुळेच प्रामुख्याने आज जागतिक दर्जाचे महानगर झालेली मुंबई वसवली गेली, याची अनेकांना कल्पना नसेल. 

१६६१ साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला पोर्तुगीजांकडून मुंबई बेट आंदण मिळालं. मात्र येथील प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि अन्य अनेक कारणांमुळे मुंबईच्या विकासाकडे ब्रिटिशांनी विशेष लक्ष दिलेलं नव्हतं. पश्चिम किनारपट्टीवर व्यापार-उदिमाचं प्रमुख केंद्र सुरत हेच होतं. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या पश्चिमेकडील कारभाराची सूत्र प्रामुख्याने सूरतवरूनच हलवली जात होती. 'सूरत' हा मुघल साम्राज्याचा चेहरा मानला जायचा. हजला जाणारे जाणारे यात्रेकरू येथूनच रवाना होत असल्यामुळे मुघलांचे इथे विशेष लक्ष असे. परदेशांशी व्यापारासाठीही हे ठाणे सोयीचं आणि महत्त्वाचं होतं. त्यामुळेच इंग्रजाबरोबरच डच आणि अन्य व्यापारीही येथे बस्तान मांडून होते.

जानेवारी १६६४ मध्ये शिवरायांनी सुरतेवर पहिली स्वारी केली. मुघल सरदार शाहिस्तेखान याने पुण्यात ठाण मांडून स्वराज्यात चालवलेल्या नासधुशीचा वचपा काढून मुघलांची 'सूरत' 'बदसुरत' करणं, हा या स्वारीचा प्रमुख उद्देश होता. अवघ्या ४ हजार निवडक घोडेस्वारांनिशी महाराजांनी नाशिकमार्गे सुरतेवर धडक दिली, तेव्हा तेथील मुघल अंमलदार इनायतखान चक्क शहर सोडून किल्ल्यात दडून बसला. मात्र त्याने वाटाघाटीच्या नावाखाली महाराजांवर मारेकरी घालून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संतापलेल्या मराठ्यांनी हे शहर अक्षरशः जाळून बेचिराख केले.

अवघं सूरत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांखाली चिरडलं जात असताना, अवघ्या २०० सैनिकांच्या पथकनिशी इंग्रजांनी आपल्या वखारीचे संरक्षणासाठी तटावर तोफांसह कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.  मात्र शिवरायांना या व्यापाऱ्यांना त्रास देण्यात मुळीच स्वारस्य नव्हतं. याचे एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्या वखारीत नगद किंवा सोन्या-रुप्यापेक्षा व्यापारी मालाचाच भरणा अधिक असे. लूट सोबत नेताना हा माल अडचणीचा ठरत असे. 

या वेळी सर जॉर्ज ऑक्झिंडन इंग्रजांच्या येथील वखारीचा अध्यक्ष होता. मराठे तिसऱ्या दिवशी हाजी बेग या सूरतेतील बड्या व्यापाऱ्याचं घर लुटत असताना, इंग्रजांनी त्यांना अनाठायी अटकाव केला. त्यामुळे उभयपक्षात तणाव निर्माण झाला. संतापलेल्या शिवरायांनी इंग्रजांकडे तीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. ती देण्यास ऑक्झिंडनने स्पष्ट नकार दिला. मात्र मुघल फौज पाठीवर असल्याने शिवरायांनी हा वाद फार वाढवला नाही. त्यामुळे इंग्रज-मराठ्यांचा सुरतमध्ये उघड संघर्ष टळला. मात्र इंग्रजांनी मराठ्यांपुढे दाखविलेल्या या करारीपणाबाबत त्यांचे कौतुक करीत औरंगजेबाने त्यांना एक वर्षाची जकात माफ केली होती.

यानंतर १६७०च्या ऑक्टोबर महिन्यात शिवरायांनी सुरतेवर पुन्हा स्वारी केली. याही वेळी त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांना त्रास दिला नाही. मात्र दुसऱ्यांदा स्वारी केल्यामुळे मुघल सुरतेचे संरक्षण करण्यास असमर्थ आहेत, हे अधोरेखित झालं. त्यातच दुसऱ्या स्वारीची लूट घेऊन परतत असताना आडव्या आलेल्या दाऊद खान या मुघल सरदाराचाही महाराजांनी वणी- दिंडोरीजवळ पूर्ण पाडाव केला. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांवर फारच दहशत बसली. महाराजांनीही भविष्यात सुरतेची लूट टाळण्यासाठी वार्षिक १२ लाख रुपयांची खंडणी देण्यास येथील व्यापाऱ्यांना बजावले. या लुटीनंतर काही महिन्यांतच शिवरायांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनीही सूरतच्या अंमलदारास पत्र पाठवून खंडणी देण्यास बजावले होते. पुढच्या काळात मराठा सरदार नेताजी पालकर यांनी सुरतवासियांना अशी खंडणी मागणारी पत्रे लिहिली.

या साऱ्याचा परिणामस्वरूप सूरतमध्ये वारंवर शिवाजी आल्याच्या आवई उठू लागल्या. त्यामुळे दहशत पसरून लोकांनी धांदल उडत असे. या साऱ्याचा परिणाम येथील व्यापारावर होऊ लागला. त्यामुळे ब्रिटिशांना नव्या, सुरक्षित व्यापारी बंदराचा शोध घेणे भाग पडलं आणि त्यांनी आयत्या आंदण मिळालेल्या मुंबईकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मुंबईच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा असणारे दुसरे गव्हर्नर जेराल्ड ऑजियर हे सुरत लूटीच्या वेळी वखारीत उपस्थित होते. त्यांनी मराठ्यांची दहशत प्रत्यक्ष अनुभवली होती. आता सुरतेतून व्यापार करण्यात राम राहिलेला नाही, हे तेव्हाच त्यांच्या लक्षात आले असावे.

शिवरायांची सूरत स्वारी हे मुंबईच्या उभारणीचे एकमेव कारण नसले, तरीही अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी ते एक आहे. शिवरायांच्या धाकामुळे मुघलाच्या प्रमुख व्यापारी केंद्रास घरघर लागण्यास सुरुवात झाली आणि व्यापाराचा केंद्रबिंदू मुंबईकडे सरकला, असे म्हणणे नक्कीच योग्य ठरेल. 'शिवाजींच्या दहशतीमुळे सुरतेचा व्यापार बसला आणि इंग्रजांनी सूरत सोडून मुंबईस आपले ठाणे केले', असं इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासतीत म्हटलं आहे.

Web Title: Shiv Jayanti Special feature: Shivaji Maharaj Mumbai Connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.