शरद पवार - राज ठाकरे एकाच विमानात; हवेत होणार 'मन(से) की बात'? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 05:47 PM2018-10-25T17:47:06+5:302018-10-25T20:20:37+5:30

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे.

Sharad Pawar & Raj Thackeray travel in same plane | शरद पवार - राज ठाकरे एकाच विमानात; हवेत होणार 'मन(से) की बात'? 

शरद पवार - राज ठाकरे एकाच विमानात; हवेत होणार 'मन(से) की बात'? 

औरंगाबाद -  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. 

मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. तो दौरा आटोपल्यानंतर आज राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. दरम्यान, आज संध्याकाळी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. याच विमानातून शरद पवार प्रवास करत होते. शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच विमनातून प्रवास करत असल्याने त्यांच्यात नेमकी मन(से) बात झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या उमेदवारींच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. मनसेकडून ज्या मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मतदान मिळाले, अशा 40 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळेच, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे.

लोकसभा निवडणुकांना काही महिनेच उरले असून त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचेही पडघम वाजणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही राज ठाकरेंच्या मनसेचा चांगलाचा प्रभाव जाणवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असल्याचे समजते. दरम्यान, राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदी अन् शिवसेनेवर होणारी टीका आणि शरद पवारांसोबत वाढणारी जवळीक लक्षात घेता मनसेही आघाडीत जाण्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, याबाबत काँग्रेसने अद्यापही मौन पाळले आहे. मात्र, मनसेने आघाडीत प्रवेश केल्यास याचा फायदा निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होईल. या जागांवरील आघाडीचे उमेदवार निवडणूक आणण्यात मनसेची भूमिका महत्त्वाची ठरेल. 

दरम्यान, मुंबईतील काही मतदारसंघात मनसेचं स्थान भक्कम आहे. तसेच ठाणे, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यातील काही मतदारसंघात मनसे जोमाने उतरणार आहे. तर, राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेऊनच भाजपाचा विजयीरथ रोखण्याचा आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. 

Web Title: Sharad Pawar & Raj Thackeray travel in same plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.