विमानात भांडणारे रवींद्र गायकवाड रेल्वेतून गायब

By admin | Published: March 25, 2017 11:58 AM2017-03-25T11:58:04+5:302017-03-25T14:16:09+5:30

ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीहून निघालेले खासदार रवींद्र गायकवाड रेल्वेतून गायब झाले आहेत

Ravindra Gaikwad van derailed in the plane | विमानात भांडणारे रवींद्र गायकवाड रेल्वेतून गायब

विमानात भांडणारे रवींद्र गायकवाड रेल्वेतून गायब

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 -  एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला गुरुवारी चप्पलने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी बंदी घातल्याने त्यांनी रेल्वेने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. मात्र ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने निघालेले खासदार रवींद्र गायकवाड रेल्वेतून गायब झाले आहेत. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली मात्र सोबत रवींद्र गायकवाड नव्हते. ट्रेनमधील सहप्रवाशांच्या माहितीनुसार खासदार गायकवाड शेवटचे वापी स्टेशनवर दिसले होते.
 
(खासदार रवींद्र गायकवाडांचे विमान जमिनीवर)
(रवींद्र गायकवाडांमुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत)
 
विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना ब्लॅक लिस्ट केल्यानंतर रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर होता. त्याप्रमाणे रवींद्र गायकवाड यांनी शुक्रवारी संध्याकाळी 4.45 च्या ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने निजामुद्दीन स्टेशनवरुन प्रवास सुरु केला होता. परंतु तब्येतीचं कारण देत रवींद्र गायकवाड मथुरेलाच ट्रेनमधून उतरले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान अगोदरच मारहाण केल्याने अडचणीत असलेले रवींद्र गायकवाड यांची ट्रेनमध्येही काही पत्रकारांसोबत बाचाबाची झाली.
 
खासदार रवींद्र गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यासाठी एअर इंडिया तसेच चार खासगी कंपन्यांनी बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ही बंदी उठेपर्यंत खासदार गायकवाड यांना विमानाने प्रवासच करता येणार नाही. एअर इंडियाने त्यांचे शुक्रवारचे दिल्ली ते पुणे हे परतीचे तिकीटच रद्द केले.
 
कोणत्याच कंपनीच्या विमानाने परतणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर खा. गायकवाड यांनी दिल्लीहून रेल्वेने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. मुंबईत पोहोचल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील अशी शक्यता होती. खा. गायकवाड यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हाही दाखल केला आहे. एअर इंडिया आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला.
 
शिवसेनेचे नेते खा. गायकवाड  यांनी चूक केल्याचे मान्य करीत होते. मात्र त्यांच्याविरुद्ध एआयआर दाखल होताच, शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप सुरू केला आहे. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावीच, असा इशारा गायकवाड यांनी दिला. मी माफी मागणार नाही. त्या कर्मचाऱ्याने आधी माफी मागावी. नंतर काय ते पाहू, असे सांगून माझ्याबाबतील शिवसेना पक्षप्रमुखच योग्य तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
 
दिल्लीहून शुक्रवारी दुपारी गायकवाड पुण्याला येणार होते. पण त्यांचे परतीचे तिकीट रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला. एअर इंडिया या सरकारी कंपनीने आणि जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईस जेट आणि गो एअर या चार खासगी विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिली. इंडिगोचे संचालक आदित्य घोष म्हणाले की, या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे.
 
तक्रार आल्यास तपशील पाहू
मात्र त्यांच्या वर्तणुकीबाबत लोकसभेत आज चर्चा झाली नाही. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना घटनेविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या की,ही घटना संसदेच्या बाहेर घडलेली असल्याने सभागृह याची स्वत:हून दखल घेऊ शकत नाही. कोणाची तक्रार आल्यास तपशील घेऊन नंतर पाहू.
 
लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, नागरी उड्डयन मंत्री यांनी पत्र लिहिले आहे. याशिवाय या घटनेची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही दिल्याचे समजते.
 
सभ्यतेची अपेक्षा
सफाई कर्मचाऱ्यांना विमानाची साफसफाई करायची होती. त्यामुळे त्यांनी (गायकवाड) विमानातून खाली उतरावे, एवढेच मी त्यांना सांगितले. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी सभ्यतेने वागायला हवे, असे मारहाण झालेला एअर इंडियाचा कर्मचारी सुकुमार यांनी सांगितले.

खासदाराच्या मुजोरीचा व्हिडिओ
या घटनेचा एक कथित व्हिडिओ गुरुवारी रात्री समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यात एअर इंडियाची एक महिला कर्मचारी सहकाऱ्याला मारणे थांबवावे, अशी खासदार गायकवाड यांना विनंती करताना दिसते. यावर गायकवाड ज्याला मारतअसतात त्याला विमानाबाहेर फेकून देण्याची भाषा करतात. असे केले तर तो कर्मचारी मरेल व तुमच्यावर खुनाचा खटला होईल, असे कर्मचारी त्यांना सांगतात. त्यावर गायकवाड, याआधी माझ्यावर अनेक खटले आहेत, आणखी एक झाल्याने काही फरक पडत नाही, अशी बढाई मारत असल्याचेही या व्हिडिओत दिसते.
 

Web Title: Ravindra Gaikwad van derailed in the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.