आरटीई प्रवेशासाठी राज्याच्या १ हजार ८८५ शाळांकडे पालकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:01 AM2019-04-22T06:01:46+5:302019-04-22T06:01:58+5:30

शून्य अर्ज आल्याने १४,२६० जागा रिक्त; आतापर्यंत २०,३५० विद्यार्थ्यांना प्रवेश

Parents have tried to get 1,8585 schools in the state for admission to RTE | आरटीई प्रवेशासाठी राज्याच्या १ हजार ८८५ शाळांकडे पालकांनी फिरविली पाठ

आरटीई प्रवेशासाठी राज्याच्या १ हजार ८८५ शाळांकडे पालकांनी फिरविली पाठ

Next

मुंबई : आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या लॉटरीत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गेल्या ११ दिवसांपासून सुरू आहे. २० एप्रिलपर्यंतच्या आरटीई प्रवेशाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात निवड झालेल्या एकूण प्रवेशांपैकी केवळ ३० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. आरटीईच्या पहिल्या सोडतीत राज्यातील ९,१९५ शाळांतील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. २० एप्रिलपर्यंत त्यातील केवळ २० हजार ३५० प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे पहिल्या सोडतीतच ५० टक्के प्रवेशही अद्याप निश्चित न झाल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे पहिल्या सोडतीनंतर राज्यात शून्य अर्ज आलेल्या एकूण १,८८५ शाळा असून त्यामध्ये एकूण १४,२६० जागा आहेत. पालकांनी या शाळांकडे पाठ फिरवल्यामुळे या जागा निदान पहिल्या सोडतीसाठी रिक्त राहणार आहेत. यातील अनेक शाळांचीच नावे पालकांना माहीत नाहीत तर काही शाळा या नव्याने मान्यता मिळालेल्या असल्याने पालकांनी त्यास पसंती दिली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी ठरावीक शाळांकडेच पालकांचा ओढा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यातही नावाजलेल्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा, अशी पालकांची इच्छा असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, यंदा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यांनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र उत्पन्नाच्या दाखल्याचे प्रमाणपत्र नसणे, अर्ज व प्रत्यक्ष गुगल मॅपिंगमध्ये घर ते शाळा यातील अंतर नियमबाह्य असणे, जातीचे प्रमाणपत्र नसणे अशी कारणे देऊन अद्यापही समितीकडून प्रवेश नाकारले जात असल्याची माहिती मिळत आहे.

प्रवेश निश्चितीत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर
२० एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार आतापर्यंत सर्वात जास्त ४,९८५ प्रवेश हे पुण्यात निश्चित झाले आहेत. त्यानंतर ठाणे २,५२२ तर नाशिकमध्ये १,६४९ प्रवेश निश्चित झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अद्याप एकही प्रवेश निश्चित झाला नसून सिंधुदुर्गमध्ये केवळ ५ आरटीई प्रवेश निश्चित झाले आहेत. मुंबई पालिकेतील शाळांमध्ये आतापर्यंत १,१२४ तर इतर माध्यमाच्या शाळांत ३९४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Parents have tried to get 1,8585 schools in the state for admission to RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.