महापालिका उद्याने सुविधांच्या प्रतीक्षेत

By admin | Published: November 3, 2016 01:40 AM2016-11-03T01:40:38+5:302016-11-03T01:40:38+5:30

पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसर उच्चभ्रू समजला जातो.

Nupur park waiting for the facilities | महापालिका उद्याने सुविधांच्या प्रतीक्षेत

महापालिका उद्याने सुविधांच्या प्रतीक्षेत

Next


नवी सांगवी : पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसर उच्चभ्रू समजला जातो. परिसरातील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसण्यासाठी, खेळण्यासाठी अनेक उद्यानांचा विकास करण्यात आला. मात्र, परिसरातील काही उद्याने विकसित, तर काही उद्याने सुविधांबाबत उपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. या परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. येथील लोकांना विरंगुळा साधन असणे आवश्यक आहे.
महापालिका प्रशासनाने ही गरज ओळखून या परिसरात भव्य उद्याने बांधली. रोज ही उद्याने गर्दीने फुलून गेलेली दिसून येतात. जिजाऊ उद्यान, ज्याला डायनॉसोर गार्डन म्हणूनही ओळखले जाते. आधुनिक सुविधा आणि स्वच्छता हे येथील वैशिष्ट्य आहे. मात्र, या उद्यानातील पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह त्वरित दुरुस्त करण्याची गरज असल्याचे दिसून आले. तसेच संध्याकाळी या बागेत डासांचा उपद्रव जास्त असल्याने साथीच्या रोगांना निमंत्रण मिळण्याची ही लक्षणे आहेत. उद्यानाच्या वॉल कम्पाउंडला अनेक ठिकाणी असे मार्ग असून, जेथून या परिसरातील मुले आडमार्गाने प्रवेश करतात. ते बंद करणेही सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच या उद्यानात टवाळखोर मुलांचा त्रासही सहन करावा लागतो. या टवाळखोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तसेच उद्यानातील पार्किंगच्या जागेतच खेळणीविक्रेते ठाण मांडून बसतात. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने लावतात. रहदारीच्या रस्त्यावर वाहने लागत असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांबरोबरच पार्किंगची व्यवस्था पाहण्यासाठी काही कर्मचारी नेमणे गरजेचे आहे, असे नागरिकांनी सांगितले.
पीडब्ल्यूडी ग्राउंडशेजारील उद्यान जुनी आणि नवी सांगवी परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने जवळ असल्याने हे उद्यान परिसरात प्रसिद्ध आहे. मात्र या उद्यानातील अनेक सोयी-सुविधा व्यवस्थित नाहीत. येथील लहान मुलांची खेळणी साहित्य, झोके जुने आणि नादुरुस्त असल्याचे दिसून येते. सुशोभीकरणासाठी बांधलेले पाण्याचे कारंजे कोरडे पडले आहे.
उद्यानात बसण्यासाठी पुरेसे बाक नसल्याचे दिसून येते. उद्यानाचे मुख्य द्वार सुशोभित नसून, इथे उद्यान आहे याचा फलकही परिसरात दिसून येत नाही.
ढोरेनगर परिसरातील श्री संत गोरोबा कुंभार उद्यान हे जुन्या सांगवीतील आडवळणात हरवलेले आणि परिसरात जास्त माहिती नसलेले एक उद्यान आहे. हे उद्यान अनेक सुविधांपासून वंचित असून उद्यानाला असलेली जागा खूप कमी असून, सुविधांचा विकास जागेच्या अभावाने करता येत नसल्याची खंत उद्यान सहायक संतोष लांडगे यांनी बोलून दाखवली. या उद्यानाबरोबरच अनेक सुविधा असलेले आणि नवीनच झालेले शितोळेनगर परिसरातील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानात महानगरपालिकेने सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. परंतु नदीकाठावर असल्याने आणि परिसरातील आतील भागात असल्याने हे उद्यान दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांना इथे आकर्षित करण्यासाठी महानगरपालिकेने नामदर्शक फलक आणि रस्त्याची योग्य सुविधा केल्यास या परिसरातील नागरिकांना या उद्यानाचा लाभ होऊ शकतो.
उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र राखीव बैठक व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे माजी समाजकल्याण अधिकारी सुभाष लोळगे यांनी सांगितले, तर महानगरपालिके च्या वतीने काही कार्यक्रम या उद्यानात घेतले जातात. अशा वेळी नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे रहिवासी सूर्यकांत खोल्लम यांनी सांगितले. (वार्ताहर)
प्रशस्त आणि सोयी सुविधांयुक्त आणखी एक उद्यान शितोळेनगर परिसरात बांधले आहे. परंतु, नदीकिनारी आतील भागात हे उद्यान असल्याने अनेक नागरिकांना ते माहित नाही. त्यामुळे नागरिकांची वर्दळ या उद्यानात दिसून येत नाही. यासाठी मुख्य रस्त्यावर नामफलक लावणे गरजेचे आहे.
सर्व सोयी आणि सुविधा असलेले डायनासोर गार्डन हे एक मोठे उद्यान असून वेळोवेळी स्वच्छता केली जाते. उद्यानातील खेळण्याचे साहित्य, झाडे आणि डायनासोर पुतळा यांची निगा घेतली जाते. येथील पाणी आणि स्वच्छतागृहाचा प्रस्ताव महानगरपालिकेला पाठवला असून, राहिलेली कामे लवकरच केली जातील.
- गोपाळ खैरे, उद्यान निरीक्षक

Web Title: Nupur park waiting for the facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.