घटस्थापनेदिवशी नारायण राणेंची नवी 'गट'स्थापना, 21 सप्टेंबरला पुढील भूमिका जाहीर करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 06:51 PM2017-09-18T18:51:29+5:302017-09-18T20:00:24+5:30

नारायण राणे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र मी टप्प्याटप्प्याने ब्रेकिंग न्यूज देणार आहे. 21 सप्टेंबरला घटस्थापने दिवशी  पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडणार, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज जाहीर केले. 

The new group of Narayan Rane will be established on the day of the establishment, on September 21, the next role will be announced | घटस्थापनेदिवशी नारायण राणेंची नवी 'गट'स्थापना, 21 सप्टेंबरला पुढील भूमिका जाहीर करणार 

घटस्थापनेदिवशी नारायण राणेंची नवी 'गट'स्थापना, 21 सप्टेंबरला पुढील भूमिका जाहीर करणार 

 कुडाळ, दि. 18 -  काँग्रेसविरोधात बंड करणारे माजी मुख्यमंत्री आणि कोकणातील मातब्बर नेते नारायण राणे 21 सप्टेंबर रोजी आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी मोठी घोषणा करणार आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना नारायण राणेंनी ही घोषणा केली. तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समर्थ विकास पॅनेलच्या माध्यमातून लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता 21 सप्टेंबर रोजी नारायण राणे कोणती घोषणा करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
सोमवारी कुडाळ येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राणे म्हणाले, "नारायण राणे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र मी टप्प्याटप्प्याने ब्रेकिंग न्यूज देणार आहे. 21 सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी  पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडणार आहे. तसेच आमचे कार्यकर्ते आगामी ग्रामपंचायत निवडणूक समर्थ विकास पॅनेल या नावाने निवडणूक लढवतील." मला अमूक तमूक नको तर पूर्ण 100 टक्के यश हवे आहे. त्यासाठी झटून कामाला लागा असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. 
यावेळी राणेंनी आपल्या राजकीय भूमिकेविषयी उलटसुलट बातम्या पसरवणाऱ्यांचाही समाचार घेतला,"गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या राजकारणाची बिनपैशाने जाहिरात सुरू आहे. राणे इकडे जाणार, राणे तिकडे जाणार अशा चर्चा पिकवल्या जात आहेत." असे ते म्हणाले.  
  जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या निर्णयावरही राणेंनी जोरदार टीका केली. काँग्रेसच्या नेतृत्वाने मला न विचारता कार्यकारिणी बरखास्त केली. दत्ता सामंत यांना नोटीस दिली नाही. मला विचारलं नाही, आमदारांना विचारलं नाही, याला लोकशाही म्हणायची का. हा निर्णय नियमबाह्य आहे. त्यामुळे आमची पदे कायम आहेत" 
 अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले, माझ्यात आणि अशोक चव्हाणांमध्ये शत्रुत्व नाही. आजही आमच्यात संवाद आहे. पण आमच्यात राजकीय मतभेद आहेत. अशोक चव्हाण यांना नारायण राणे कळालेच नाहीत. या चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मग हे सरकारला कसे काय धारेवर धरू शकतील, असा सवाल मी सोनिया गांधींना केला होता. अशोक चव्हाण हे काँग्रेस संपवण्याचे काम करत आहेत. त्यांना नांदेड जिल्ह्यातही काँग्रेसला यश मिळवून देता आलेले नाही. त्यांनी समर्थ लोकांना पदे दिलेली नाहीत. "  
नुतन अध्यक्ष विकास सावंत हे जिल्ह्यात प्रप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे दूत म्हणून काम करायचे.  विकास सावंत यांना आमदारकीचे गाजर दाखवले आहे. माझ्याविरोधात डोके वर काढणारे आता दिसत नाहीत. माझ्या खबरी पुरवण्याचे बक्षीस त्यांना जिल्हाध्यक्षपदाच्या रूपात देण्यात आले आहे.  
माजी खासदार निलेश राणे यांनीही कार्यकारिणी बदलात भूमिका बजावणाऱ्या हुसेन दलवाईंवर टीका केली.  खासदार निधी देण्यासाठी हुसेन दलवाई 15 टक्के घेतात, असा आरोप निलेश राणेंनी केला."सिंधुदुर्गातील कार्यकारिणी बदलली, पण आम्ही रत्नागिरीसाठी अध्यक्ष मागतोय तो दिला नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही राज्यात काँग्रेसच्या ताब्यात असलेली एकमेव जिल्हापरिषद आहे. मग इथे सर्व सत्तास्थाने होती तर इकडे का बदल केलात, असा सवाल निलेश राणेंनी केला. तसेच शिवसेनेचे अस्तित्व संपवून 2019 मध्ये नवस फेडणार असल्याची गर्जनाही त्यांनी केली. 
आमदार नितेश राणेंनी यावेळी हुसेन दलवाई यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले,"खासदार हुसेन दलवाई की हलवाई हेच कळत नाही. विकास सावंत, हुसेन दलवाई यांची आमच्यासमोर बोलण्याची हिंमत नाही.  स्व.शंकरराव चव्हाण यांचा काँग्रेसने अपमान केला होता, त्याचा बदला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे घेत आहेत त्यांना काँग्रेस संपवायची आहे." 
यावेळी दत्ता सामंत यांनीही काँग्रेसवर जोरदार टीकास्र सोडले. "भविष्यात काँग्रेस पक्ष देशात कधीच वर येणार नाही. विकास सावंत यांचा मुलगा शिवसेनेत आणि हे काँग्रेसमध्ये. मग हे कोणता पक्ष वाढवणार? आता जिल्ह्यातील कार्यकर्ता पेटून उठला आहे. राणे साहेबांची दोन्ही मुले राम-लक्ष्मणाची जोडी आहे. नारायण राणे जो झेंडा घेतील तो झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही यश मिळवू," असे दत्ता सामंत म्हणाले. 

Web Title: The new group of Narayan Rane will be established on the day of the establishment, on September 21, the next role will be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.