नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट! १० एप्रिल रोजी प्रकाशन : शिवसेना, काँग्रेसवर लक्ष्यभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:22 AM2017-09-07T03:22:48+5:302017-09-07T03:23:08+5:30

काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले व भाजपा प्रवेशाचेद्वार उघडण्याची प्रतीक्षा करीत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले असून वाढदिवशी (१० एप्रिल रोजी) त्याचे प्रकाशन होणार आहे.

 Narayan Rane's autobiography will be a spoof! Publication on 10th April: Shivsena, Opposition on Congress | नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट! १० एप्रिल रोजी प्रकाशन : शिवसेना, काँग्रेसवर लक्ष्यभेद

नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट! १० एप्रिल रोजी प्रकाशन : शिवसेना, काँग्रेसवर लक्ष्यभेद

संदीप प्रधान 
मुंबई : काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले व भाजपा प्रवेशाचेद्वार उघडण्याची प्रतीक्षा करीत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले असून वाढदिवशी (१० एप्रिल रोजी) त्याचे प्रकाशन होणार आहे. या आत्मचरित्रात शिवसेना व काँग्रेसमधील अनेक घडामोडींबाबत गौप्यस्फोट केले जाण्याची शक्यता आहे. राजकारणातील व्यक्तीला सर्वच सत्य उघड करता येत नसले तरी वास्तवाशी जास्तीतजास्त प्रामाणिक राहण्याचा आपला प्रयत्न राहील, असे राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून आपण आत्मचरित्राचे लेखन सुरू केले असून दररोज सकाळी उठून दीड ते दोन तास लेखन करीत आहे. बालपणापासून ते आतापर्यंतचा जीवनपट मांडण्यात येणार आहे. अनेक राजकारणी सिद्धहस्त लेखकांकडून आत्मचरित्र लिहून घेतात. मात्र मी स्वत:च लेखन करायचे ठरवले आहे. कालांतराने आत्मचरित्राला आकार प्राप्त झाल्यावर त्यावर संपादकीय संस्कार करण्याकरिता परिचित लेखक, पत्रकारांची मदत घेणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
राणे यांची सुरुवात चेंबूरमधील राजकारणापासून झाली. ‘आपण शिवसेनेत आलो नसतो तर कदाचित आपला एन्काउंटर झाला असता,’ अशी भावना खुद्द राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा जाहीरपणे व्यक्त केली होती. कोकणातील गरीब कुटुंबातून मुंबईत आलेला तरुण शिवसेनेकडे आकृष्ट झाला व हळूहळू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकट गेला. राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना राणे यांनी मुख्यमंत्री होण्याकरिता प्रयत्न केले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यातील मुरब्बी राजकारण्याने त्यांच्यावर मात केली. मात्र अखेर जोशी यांच्या जावयाचे पुण्यातील टॉवरचे प्रकरण उघड झाले आणि त्यांना पद गमवावे लागले. राणे हे जेमतेम सहा महिन्यांकरिता मुख्यमंत्री झाले. युतीचे सरकार असताना गाजलेल्या रमेश किणी हत्या प्रकरणानिमित्ताने शिवसेनेत रंगलेल्या राजकारणावरही हे पुस्तक भाष्य करील, अशी शक्यता आहे. १९९९मध्ये मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा भाजपाचा आग्रह, युतीचा पराभव व पुन्हा सरकार स्थापन करणे शक्य होत असतानाही भाजपा नेत्यांनी केलेली दिरंगाई यावर राणे यांच्या आत्मचरित्रातून प्रकाश पडू शकेल.
विधानसभेच्या २००४मध्ये झालेल्या निवडणुकानंतर निकालाच्या आदल्या दिवशी ‘मातोश्री’वरून शिवसेना उमेदवारांना केले गेलेले दूरध्वनी व उद्धव ठाकरे यांचेच नाव मुख्यमंत्रीपदाकरिता सुचवण्याचा झालेला प्रयत्न याबाबतही अधिक तपशील यातून उघड होऊ शकेल. त्यानंतर उद्धव व राणे यांच्यात आलेले वितुष्ट, ‘शिवसेनेत पदांचा बाजार सुरू असल्याचे’ वक्तव्य रंगशारदा सभागृहातील पक्षाच्या बैठकीत करून बाळासाहेबांची ओढवलेली नाराजी आणि शिवसेनेतून झालेली हकालपट्टी या घडामोडींतील घालमेल आत्मचरित्रात प्रकट होईल, असे सांगण्यात येते.
तरुण पिढीच्या मार्गदर्शनासाठी-
कोकणातील सामान्य कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. शून्यातून त्याने सारेकाही उभे केले. या काळात जी सामाजिक, राजकीय व व्यावसायिक स्थित्यंतरे पाहिली त्यातून तरुण पिढीला मार्गदर्शन मिळावे या हेतूने आत्मचरित्र लिहीत आहे. -आ. नारायण राणे, काँग्रेस नेते

Web Title:  Narayan Rane's autobiography will be a spoof! Publication on 10th April: Shivsena, Opposition on Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.