भाजपा पक्षात घेईना, काँग्रेस राहू देईना, राणेंचे राजकारण त्रिशंकू अवस्थेत

By Balkrishna.parab | Published: September 17, 2017 09:02 PM2017-09-17T21:02:12+5:302017-09-17T21:05:05+5:30

भाजपाच्या वाटेवर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आगामी वाटचालीविषयीची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. सध्या राजकारणात अच्छे दिन उपभोगत असलेल्या भाजपात प्रवेशासाठी उत्सुक असूनही भाजपाकडून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेली चालढकल आणि काँग्रेसनेही त्यांचे पक्षांतर गृहित धरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष टिकवण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली यामुळे नारायण राणे यांचे राजकारण सध्या त्रिशंकू अवस्थेत सापडले आहे. 

Take BJP, party, Congress and Rane's politics in hunger strike | भाजपा पक्षात घेईना, काँग्रेस राहू देईना, राणेंचे राजकारण त्रिशंकू अवस्थेत

भाजपा पक्षात घेईना, काँग्रेस राहू देईना, राणेंचे राजकारण त्रिशंकू अवस्थेत

भाजपाच्या वाटेवर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आगामी वाटचालीविषयीची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. सध्या राजकारणात अच्छे दिन उपभोगत असलेल्या भाजपात प्रवेशासाठी उत्सुक असूनही भाजपाकडून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेली चालढकल आणि काँग्रेसनेही त्यांचे पक्षांतर गृहित धरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष टिकवण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली यामुळे नारायण राणे यांचे राजकारण सध्या त्रिशंकू अवस्थेत सापडले आहे. 
राणे काँग्रेस सोडणार, भाजपात प्रवेश करणार याची चर्चा गेल्या सात आठ महिन्यांपासून रंगली आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्यानंतर राणे शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. मात्र काही दिवसांतच हे वृत्त मागे पडले आणि राणे हातातला हात सोडून कमळ हाती घेतील अशा बातम्या पसरल्या. भाजपा नेत्यांकडून त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी होणारी सकारात्मक विधाने, अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेली कथित भेट यामुळे राणे आता भाजपावासी होणार हे जवळपास निश्चितच झाले होते. मात्र भाजपातील दिल्ली आणि महाराष्ट्र अशा दोन्हीकडच्या नेत्यांमधील मतभिन्नतेमुळे त्यांचा पक्षप्रवेश वारंवार लांबणीवर पडत आहे. सुरुवातीला गुढीपाढवा, त्यानंतर मे महिना, अमित शहांचा मुंबई दौरा, गणेशोत्सव असे एकामागून एक मुहूर्त हुकत गेले आहेत. त्यामुळे राणे समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे. 
बारा वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे नेहमीच असंतुष्टांच्या श्रेणीत राहिले आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवल्यानंतरही त्यांची मुख्यमंत्रिपदाविषयीची सुप्त महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही. मात्र काँग्रेसमध्ये त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यास मागेपुढे पाहिले नाही. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणही त्यांच्या रोखठोक स्वभावाला मानवले नाही. त्यातच सत्ता गेल्यानंतर त्यांच्या काँग्रेसमधून पक्षांतराच्या चर्चा रंगू लागल्या. या चर्चांना काँग्रेसमधीलच त्यांच्या हितशत्रूंनी वेळोवेळी हवा दिली. त्यामुळे त्यांची पक्षातील नाराजी दूर होऊ शकली नाही. आता  राणे पक्ष सोडून जाणार हे काँग्रेसमधील नेतृत्वाने जवळपास गृहितच धरले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा फटका बसू नये यादृष्टीने काँग्रेसकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्गातील काँग्रेसच्या कार्यकारिणीत फेरबदल करून त्याचेच संकेत देण्यात आले आहेत. 
काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमट आणि भाजपाची देश आणि राज्यात स्थिरस्थावर होत असलेली सत्ता यामुळे राणेंना भाजपात संधी हवी आहे. तर दुसरीकडे  एनडीएमधील एकेकाळचा विश्वासू सहकारी आणि युतीतुटीनंतर शत्रू नं 1 बनलेल्या शिवसेनेकडून होत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपालाही राणेंसारखी मुलूख मैदानी तोफ हवी आहे. मात्र राणेंना पक्षात घेताना त्यांचे उपद्रवमूल्य कमी करण्याचा भाजपा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे. त्यामुळे राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण नवरात्रीआधीच मोठा निर्णय घेऊ अशी घोषणा राणेंनी केलीय. त्यात सोमवारी ते सिंधुदुर्गात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसांत त्यांच्या भविष्यातील वाटचालीविषयीचे चित्र स्पष्ट होऊ शकते. अन्यथा पुन्हा एकदा राणेंच्या राजकीय भूमिकेविषयी "तारीख पे तारीख" सुरूच राहील. 

Web Title: Take BJP, party, Congress and Rane's politics in hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.