पाण्यासाठी शेतकºयांनी तर चाºयासाठी मराठवाड्याने दिला आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:30 PM2019-05-14T12:30:22+5:302019-05-14T12:32:47+5:30

गावडी दारफळ : दुष्काळामुळे लग्ने टाकली लांबणीवर, पाण्यासाठी आबालवृद्धांची वणवण

Marathwada support for water for farmer! | पाण्यासाठी शेतकºयांनी तर चाºयासाठी मराठवाड्याने दिला आधार !

पाण्यासाठी शेतकºयांनी तर चाºयासाठी मराठवाड्याने दिला आधार !

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर-बार्शी रोडवर वसलेल्या गावडी दारफळची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहेमागील वर्षी वॉटर कप स्पर्धेत गावडी  दारफळने तिसºया क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर आणि त्याशेजारील विंधन विहीर हे पाणी पुरवठ्याचे मुख्य स्रोत

राकेश कदम 

सोलापूर : मागील वर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पारितोषिक पटकावलेल्या गावडी दारफळ (ता.  उत्तर सोलापूर) ला यंदा पाणीटंचाई आणि चाºयाच्या प्रश्नाने घेरले आहे.  गावतलाव आणि ग्रामपंचायतीची विहीर कोरडी पडली आहे. या परिस्थितीत गावातील हरिदास पवार आणि भामाबाई पवार यांनी आपल्या घरासमोरील विंधन विहीर गावासाठी खुली केली आहे. त्यातून निम्म्या गावाला आधार मिळाला आहे. गावात चाºयाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी मराठवाड्यातील काटी गावच्या छावणीत काही जनावरे दाखल करण्यात आली आहेत. 

सोलापूर-बार्शी रोडवर वसलेल्या गावडी दारफळची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. मागील वर्षी वॉटर कप स्पर्धेत गावडी  दारफळने तिसºया क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर आणि त्याशेजारील विंधन विहीर हे पाणी पुरवठ्याचे मुख्य स्रोत आहेत़ विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. या विहिरीत दररोज रात्री दोन टॅँकर पाणी सोडले जाते. त्यानंतर एका गल्लीला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

गावातील हरिदास पवार यांनी चार महिन्यांपूर्वी आपल्या घरासमोर एक विंधन विहीर घेतली.  त्याला चांगले पाणी लागले. हरिदास पवार हे पाणी केवळ स्वत:च्या घरासाठी वापरु शकले असते. पण गावातील पाणी टंचाई त्यांना अस्वस्थ करीत होती. आपल्या घरासमोरच त्यांनी दोन हजार लिटर पाण्याची टाकी बसविली. दररोज सकाळी ही टाकी भरुन घेतली जाते. लोक आदल्या दिवशी सायंकाळी टाकीसमोर घागरी, हंडे ठेवायला सुरुवात करतात. पवार यांच्या दातृत्वामुळे निम्म्या गावाला आधार मिळाल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते श्रीधर कदम यांनी सांगितले. 

गावच्या शेजारी काही लोकांची शेती आहे. हे शेतकरी दररोज आपल्या विहिरीतील, विंधन विहिरीतील एक-दोन घागरी पाणी प्रत्येकाला देतात. गावातील लोक एकमेकांचा आधार बनल्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी गावाला पाणी टंचाईची झळ बसली होती. पण केवळ याचवर्षी टँकर सुरू करावा लागला आहे. गावात दरवर्षी १८ किंवा १९ फेब्रुवारीला सामुदायिक विवाह सोहळा होतो. यानंतर होणारी लग्ने लांबणीवर टाकण्याची किंवा समोरच्या नातेवाईकांवर टाकण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी आबालवृध्द वणवण करीत असतात.

काटी गावच्या छावणीत जनावरे 
- गावडी दारफळमध्ये पाण्याच्या टंचाईबरोबरच जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न गंभीर आहे. ज्यांच्याकडे पाणी होते त्यांनी चारा पिकवून तो साठवून ठेवला आहे. पण ज्यांच्याकडे चाराच नाही अशा पशुपालकांचे हाल होत आहेत. गावडी दारफळ लगत तुळजापूर तालुक्यातील काटी गावची शिव आहे.  काटी गावात जनावरांची चारा छावणी उघडण्यात आली आहे. गावातील काही लोकांची काटी गावच्या हद्दीतही शेती आहे. त्या शेतकºयांनी काटी गावच्या छावणीत आपली जनावरे दाखल केली आहेत. 

पाण्यासाठी शेतात एकूण सात बोअर घेतले. त्यातील केवळ एका बोअरला पाणी लागले. पाणी टंचाईमुळे गावातील व्यवसायावरही परिणाम झाला आहे. पुढील वर्षी पाऊस पडला नाही तर शेतीचे अर्थशास्त्र ढासळणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांत पाणी आणि चाºयाची टंचाई आहे. पण तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश नाही याचे वाईट वाटते. 
- किशोर मेटे, शेतकरी. 

आमची सीताफळची बाग आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या बागेला टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे. जवळपास २० ते २५ टॅँकर लागले आहेत. उन्हाळ्यात बाग जगविली नसती तर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले असते. गावातील इतर अनेक शेतकरी टॅँकरचा आधार घेत आहेत. 
- श्रीधर कदम, गावडी दारफळ. 

Web Title: Marathwada support for water for farmer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.