"जालन्यातील घटनेनंतर पोलीस हतबल, सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास देणं गरजेचे"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:45 PM2023-11-27T12:45:13+5:302023-11-27T13:20:04+5:30

अंतरवाली सराटी इथं पोलिसांवर अमानुषपणे दगडफेक झाली. ७० पोलीस रुग्णालयात दाखल झाले. हिंमत असेल तर महिला पोलिसांना विचारा असं भुजबळ म्हणाले.

Maratha-OBC: Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil, also alleges that the police have become desperate | "जालन्यातील घटनेनंतर पोलीस हतबल, सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास देणं गरजेचे"

"जालन्यातील घटनेनंतर पोलीस हतबल, सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास देणं गरजेचे"

पुणे - जालनात पोलिसांवर हल्ले झाले, महिला पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या मग आमचे काय घेऊन बसलात? पोलीस हतबल झाल्यासारखे वाटतात. पोलीस जखमी झाल्यानंतरही काही कारवाई नाही. पोलिसांना सध्या विश्वास देणे गरजेचे आहे. सरकार पोलिसांच्या पाठिशी आहे असं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी गृह विभागाचं आणि पोलीस अधीक्षक यासाठी जबाबदार असल्याचे म्हटलं. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बीडमध्ये घरे जाळपोळ करण्यापर्यंत मजल गेली. अंतरवाली सराटी इथं पोलिसांवर अमानुषपणे दगडफेक झाली. ७० पोलीस रुग्णालयात दाखल झाले. हिंमत असेल तर महिला पोलिसांना विचारा तुमच्यासोबत कशी वागणूक झाली त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केलेला आहे. पहिली बाजू जनतेसमोर आली नाही.त्याला पोलीस अधीक्षक आणि गृह विभागही जबाबदार आहे. मी गृहमंत्र्यांशी बोललो, पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होईल असं करू नका. पोलिसांना विश्वास दिला पाहिजे हे मी सांगितले. मी सर्वपक्षीय बैठकीतही हे बोललो. बीडवेळी पोलीस हतबल का झाले याबाबत चौकशी करून माहिती समोर आणावी अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्या ही मागणी आम्ही मान्य करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे परंतु ओबीसी कोट्यातून नाही. राज्य सरकारने आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. कुणी विरोध केला? सरसकट कुणबीच प्रमाणपत्र द्या याला विरोध आहे. ते होता कामा नये अशी स्पष्ट भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे. मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी असतील तर ते कुणबी होतील. परंतु काही ठिकाणी पूर्वी टाकाने लिहिले जायचे तिथे आता पेनाने कुणबी लिहिले जातेय त्याला विरोध आहे. अशी काही कागदे आम्ही दाखवली आहे. जो मुळात कुणबी आहे त्याला प्रमाणपत्रे द्या. आता खोडाखोडी करून कुणबी नोंदी दाखवल्या जातायेत. आरक्षण मिळून २७-२८ वर्ष झाली. जे खरोखरच कुणबी आहेत त्यांनी प्रमाणपत्रे मिळवली आहेत. आता अनेक प्रमाणपत्रावर कुणबी नोंदी लिहिल्या जात आहेत असा आरोप भुजबळांनी केला. 

माझा विरोध झुंडशाहीला

बीड पेटवलं कुणी हे का शोधत नाही? भुजबळांनी एक दगड, टायर तरी जाळला का? ज्यांनी जाळले त्याला पकडल्यानंतर आरोपींना सोडा अशी मागणी ते करतायेत. जो अन्याय झाला त्याला तोंड फोडायचे काम मी केले. मी जबाबदारीनं कागदपत्रासह जाहीर सभेत बोलतोय.  मराठा समाजाला माझा अजिबात विरोध नाही. वेगळे आरक्षण द्यायला विरोध नाही. ज्यावेळी तसा कायदा आला तेव्हा मी समर्थन दिले आहे. माझा विरोध झुंडशाहीला आहे. परवा एका मुलाखतीत पोलिसांनीच एकमेकांना मारल्याचे बोलले गेले. बीडमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनीही घरे जाळली असं सांगितले. यावर कुणी काय बोलणार आहे की नाही? असा सवाल भुजबळांनी केला आहे. 

२-४ लोकांना घाबरून बसणार का?

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पु्ण्यातील विश्रामगृहात येऊन विरोध केला, त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, मला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आजही फार आदर आहे. ज्या गादीवर ते बसलेत त्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र आपला आहे. या राज्यात जो घटक आहे त्याला सर्वांना समान न्याय द्या असं त्यांनी म्हटलं पाहिजे. अशा २-४ लोकांनी विरोध केला म्हणून घाबरून बसणार का? असंही भुजबळ म्हणाले. 

मी पक्षाविरोधात बोललो नाही

प्रत्येकाला आपापल्या समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. मी ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर समाजाची बाजू मांडतो. त्या व्यासपीठावर सगळ्याच पक्षाचे नेते असतात असंही छगन भुजबळांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: Maratha-OBC: Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil, also alleges that the police have become desperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.