बीडच्या सभेनंतर शरद पवारांना पहिला धक्का; ३५ नगरसेवक, २९ सरपंचांनी साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 09:50 PM2023-08-23T21:50:35+5:302023-08-23T21:51:08+5:30

वेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार करण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे असं अजित पवार म्हणाले.

Many NCP activists including Yogesh Kshirsagar from Beed joined the Ajit Pawar group | बीडच्या सभेनंतर शरद पवारांना पहिला धक्का; ३५ नगरसेवक, २९ सरपंचांनी साथ सोडली

बीडच्या सभेनंतर शरद पवारांना पहिला धक्का; ३५ नगरसेवक, २९ सरपंचांनी साथ सोडली

googlenewsNext

बीड – सत्तेत सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीत २ गट पडले. त्यात ३० हून अधिक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. त्यानंतर शरद पवारांनी मैदानात उतरत सभांचा धडाका लावला. येवल्यातील सभेनंतर बीड येथे नुकतीच शरद पवारांची सभा झाली. त्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार गटाला मोठा धक्का  दिला आहे.

बीडचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह ३५ नगरसेवक, ५ जिल्हापरिषद सदस्य, ७ पंचायत समिती सदस्य, आणि २९ सरपंचांनी अजित पवार गटातील राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी मजबुतीने उभे राहा. तुमची सर्वांची साथ त्यांना महत्त्वाची आहे. बीडमध्ये एक चांगलं नवीन नेतृत्व पुढे येऊ दे. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यात कुठेही आम्ही बदल होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्याचसोबत वेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार करण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. अल्पसंख्याक समाजाला आपण असुरक्षित आहोत ही भावना तुमच्या मनात येऊ देणार नाही, ही भूमिका घेऊन काम करत आहोत. २७ ऑगस्टला सभेला येणार आहे, त्याअगोदर राज्याचा कृषिमंत्री म्हणून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची बैठक घ्या असे धनंजय मुंडे यांना सांगितले आहे. त्यामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांना या बैठकीला घ्या अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्या.

दरम्यान, खरीप पीक काही प्रमाणात गेले आहे. पिण्याच्या पाण्याची, हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. लोकांना आताच प्रश्न पडला आहे. मात्र मराठवाड्यात परतीचा पाऊस येत असतो. तरीदेखील काळजी घेण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा तुलनेने कमी आहे. ही नवीन समस्या, हे नवीन संकट राज्यावर आले आहे. परंतु आपण कसलीही काळजी करु नका, कसलेही संकट आले तरी तुमच्या पाठिशी राज्य सरकार आहे हे कृतीतून आपण दाखवून मदत करण्यासाठी कुठे तसुभरही कमी पडणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

विकासाचे पर्व अजित पर्व

महाराष्ट्रात गतिमान करण्यासाठी विकासाला कामाला वेग द्यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. विकासाचे नवे पर्व म्हणजे अजित पर्व म्हणून कामाला सुरुवात करत आहोत असं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सुनिल तटकरे यांनी विशेष आभार मानले. बीड बांधवांनी सोबत येत आपल्या कामाची पोचपावती दिली आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवत आपण आलात त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे कौतुक केले.

 

Web Title: Many NCP activists including Yogesh Kshirsagar from Beed joined the Ajit Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.