"हा खूप चुकीचा संदेश जाईल, आतापर्यंत जे मिळवलंय ते..."; मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 05:02 PM2024-02-25T17:02:44+5:302024-02-25T17:05:09+5:30

फडणवीस मराठा समाजात फूट पाडायचा प्रयत्न करत असल्याचा जरांगे यांनी केला आरोप

Manoj Jarange Patil serious allegations against Devendra Fadnavis over Maratha Reservation Issue Bacchu Kadu Reaction | "हा खूप चुकीचा संदेश जाईल, आतापर्यंत जे मिळवलंय ते..."; मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा सल्ला

"हा खूप चुकीचा संदेश जाईल, आतापर्यंत जे मिळवलंय ते..."; मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा सल्ला

Bacchu Kadu, Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis: गेले काही महिने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शांततेत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील आज अचानक आक्रमक झाले. राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संतप्त होत उपोषणाच्या मध्येच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्यांच्या सागर या मुंबईतील शासकीय निवासस्थानाकडे कूच केली. 'उपचार देण्याच्या बहाण्याने मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जाणार होता, राज्यात माझ्याविरोधात जी लोकं उभी करण्यात आली ते फडणवीसांनीच केली. फडणवीसांना माझा बळी हवा आहे', असे काही दावे करत जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर आरोप केले. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी यासंदर्भात मत व्यक्त करताना जरांगे यांना एक सल्ला दिला.

"एवढ्या दिवस ते आंदोलन करत आहेत. त्यांनी इतकी मेहनत केली आहे त्याला कुठेही डाग लागू देऊ नये. जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. जरांगे पाटील असोत किंवा देवेंद्रजी असोत, कोणाचाही जीव महत्त्वाचाच आहे. हे आंदोलन कोणाच्याही जीवाशी संबंधित नाही. उलट या आंदोलनात आणखी चांगला मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. टोकाची भूमिका घेतली ही थांबवावी. कोणीही आंदोलनाला गालबोट लागेल असे करू नये. जरांगे पाटील हे एका गावापुरते मर्यादित नाहीत. त्यांनी खूप मोठे आंदोलन उभारले आहेत. आता असे निर्णय घेऊन त्याचे काही दुष्परिणाम झाले तर त्याचा चुकीचा संदेश जाईल. आतापर्यंत त्यांनी जे काही मिळवलंय ते पाहता त्यांनी शांततेचा मार्ग पुढेही सुरू ठेवावा," असा सल्ला बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मराठ्यांचे आंदोलन संपवण्याचं कारस्थान फडणवीसांचे असल्याचे म्हणत आज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. तसेच, काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मला संपवण्याचे कटकारस्थान आहे. त्यामुळे, आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे जरांगे पाटील उपोषण स्थळावर बसून म्हणाले आणि तडक आपल्या जागेवरुन उठले अन् गाडीत बसून मुंबईकडे निघाले. रस्त्यात आंदोलनकर्ते सहकारी आणि काही मराठा समाजातील बांधव यांनी जरांगे यांनी कार अडवली. तब्येतीची काळजी घेण्यासाठी आधी उपचार घ्या, असे आग्रह त्यांनी धरला.

Web Title: Manoj Jarange Patil serious allegations against Devendra Fadnavis over Maratha Reservation Issue Bacchu Kadu Reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.