‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत लागले हिंसक वळण, पोलीस ठाण्यावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:24 AM2018-01-04T05:24:42+5:302018-01-04T11:15:31+5:30

कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली.

 'Maharashtra Bandh' started violently in Mumbai, stone-throwing at the police station | ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत लागले हिंसक वळण, पोलीस ठाण्यावर दगडफेक

‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत लागले हिंसक वळण, पोलीस ठाण्यावर दगडफेक

Next

मुंबई - कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली. आंदोलनकर्ते हिंसक झाल्याने मुंबईत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. असे असले तरी मुंबई पोलिसांनी संयम राखत लाठीचार्ज न करताही जमाव नियंत्रित राहील याची काळजी घेतली. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी २५० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलनादरम्यान, विक्रोळी गोदरेज कंपनीच्या गेटपासून ते गांधीनगर जंक्शन परिसरातील एकामागोमाग एक अशा २००हून अधिक खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर भांडुप ते पवईच्या दिशेनेही रस्त्याकडेला पार्क केलेल्या खासगी बसेस आणि बेस्ट बसेस आंदोलकांनी लक्ष्य केल्याचे पाहावयास मिळाले. रेल रोको, रास्ता रोकोवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक झाली. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. अशात पवईच्या हिरानंदानी आणि आयआयटी परिसराबाहेर दुपारी तणाव वाढला. आंदोलकांनी खासगी सोसायटीतील सामानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रहिवासी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. अशात येथील काही आंदोलकांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ आंदोलकांनी पवई पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार शेलार, साठे, परब, कोळी, घोळवे, वाव्हळ, बादकर, कदम, जाधव आणि घोडेस्वार असे एकूण ११ जण जखमी झाले आहेत.
चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात दगडफेक झाली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेलेल्या गोवंडी पोलीस ठाण्याच्या १ क्रमांकाच्या गाडीची तोडफोड करत पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. यामध्ये सपोनि घोडे, घाडगे, अहिरे, जाधव तसेच चंद्रकांत निकम, मल्हारी मलबे, राजेंद्र पाटील, सोमनाथ सिंग, सागर जगताप, पूनम जोदे, धोंडीराम सरगर, किशोर भामरे, अजित तडवी, जीवन मोहिते हे पोलीस जखमी झाले. मुंबईतील अन्य भागांतही जमावावर नियंत्रण आणताना काही पोलीस किरकोळ जखमी झाले. तर तोडफोडीमध्ये काही बसचालक जखमी झाले.
पोलिसांचा आंदोलकांवर हवा तसा दबाव पाहावयास मिळाला नाही. मात्र त्यांनी जमाव नियंत्रित राहील यासाठी विशेष नियोजन केले होते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य झाले.

आंदोलकांवर गुन्हे दाखल
आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांचे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. आतापर्यंत मुंबईतून पोलिसांनी २५० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अन्य आंदोलकांची माहिती मिळविण्यात येत आहे. या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस प्रवक्ते
सचिन पाटील यांनी दिली.

फूटेजच्या आधारे तपास
सीसीटीव्ही, माध्यम प्रतिनिधी, रहिवासी, पोलिसांनी केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारे तसेच सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून पोलीस तपास सुरू आहे.

‘लाइफ लाइन’ कोलमडली
मुंबई : धावत्या मुंबईकरांची लाइफलाइन असलेली रेल्वे सेवा हे आंदोलनकर्त्यांचे प्रमुख लक्ष्य होते. बुधवारी महाराष्टÑ बंदच्या पार्श्वभूमीवर मध्यसह हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील बहुतांशी स्थानकांत ‘रेल रोको’ झाला. त्यामुळे मुंबईकरांची लाइफ लाइन कोलमडली.
मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर कल्याण-डोंबिवलीसह कांजूर मार्ग, घाटकोपर, विक्रोळी, दादर या रेल्वे स्थानकांवर रेल रोको झाला. तर हार्बर मार्गावर गोवंडी, चेंबूर स्थानकांवर आंदोलनकर्त्यांमुळे लोकलला ब्रेक लागला. जमावाने सर्वांत आधी गोवंडी स्थानकावर धाव घेतली. सरकारच्या निषेधाच्या घोेषणा देत आंदोलकांनी रेल रोको केला. रेल्वे सेवा कोलमडल्याने अनेकांनी रेल्वे रुळावरून चालत जाणे पसंत केले.
पश्चिम रेल्वेच्या दादर, माहीम, दहिसर, गोरेगाव, मालाड आणि अंधेरी येथेदेखील मोठ्या संख्येने जमाव रेल्वे रुळावर उतरला. कर्णावती व डबलडेकर एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. सायंकाळी बंद मागे घेण्यात आला आणि मंदावलेली लाइफलाइन हळूहळू ट्रॅकवर आली.

मध्य रेल्वे : ११० लोकल फेºया रद्द, ३० विशेष लोकल फेºया
पश्चिम रेल्वे : ६० फेºया रद्द,
२०० लोकल फेºयांना लेटमार्क

बेस्टची तोडफोड
 
मुंबई : बंदच्या काळातही सामान्य मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरून बेस्ट उपक्रमाने दिलासा दिला. मात्र महाराष्ट्र बंदचा मोठा फटका आधीच आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला सोसावा लागला. गेल्या दोन दिवसांत बेस्टच्या तब्बल १७३ बसगाड्या फोडण्यात आल्या. तर ठिकठिकाणी झालेल्या दगडफेकीत बेस्टचे चार बसचालक जखमी झाले.
कोरेगाव-भीमा प्रकरणी आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या काळात तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. तरीही संवेदनशील भागातील काही बसगाड्यांना जाळ्या लावून त्या सेवेसाठी आगाराबाहेर काढण्यात आल्या. बेस्ट उपक्रमातील एकूण ३३७० बसेसपैकी ३२०८ बसेस आज रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या. मात्र प्रतीक्षानगर, वरळी नाका, चेंबूर, मुलुंड, पवई, सांताक्रुझ आदी ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेक झाली.
या घटनांमध्ये बसच्या काचा लागून चार चालक जखमी झाले. त्यांच्यावर तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. जखमी चालकांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या दगडफेकीच्या घटनांमध्ये बुधवारी बेस्टच्या ९० बसेसचे तर मंगळवारच्या घटनांमध्ये ८३ बसेसचे नुकसान झाले. अशा एकूण १७३ बसेसच्या काचा फुटल्या व टायर फाटले आहेत.

बेस्टची तोडफोड
१७३ बसेसचे नुकसान : चार बसचालक जखमी
जखमी
बसचालकांची नावे
आसारजी विश्वनाथ गरजे
डेपो - प्रतीक्षानगर,
अरुण गणपत मिरगळ
डेपो - मध्य मुंबई
नितीन कमलाकर वाघमारे
डेपो - मजास
शशिकांत गणपत गोसावी
डेपो - सांताक्रुझ

मंत्रालयातही शुकशुकाट
भारिप बहुजन महासंघ आणि डाव्या संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे मंत्रालयातही शांतता पाहायला मिळाली. एरव्ही, मंगळवार आणि बुधवारी राज्यभरातून आपली निवेदने आणि मागण्यांसाठी नागरिक मंत्रालयात मोठी गर्दी करतात.
बुधवारी मात्र, मंत्रालयात येणाºयांची संख्या तुरळकच होती. शिवाय, बंदमुळे रस्ते व उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने, मंत्रालयातील कर्मचाºयांचीही संख्या रोडावली होती. अर्थात, सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Web Title:  'Maharashtra Bandh' started violently in Mumbai, stone-throwing at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.