लोकसभेला कोणाला किती जागा? महायुतीत फॉर्म्युला ठरला; फडणवीसांनी आकडा सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 10:11 AM2023-11-26T10:11:57+5:302023-11-26T11:12:08+5:30

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला चांगलं यश मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Lok Sabha election seat sharing Formula was decided in the Grand Alliance says devendra fadanvis | लोकसभेला कोणाला किती जागा? महायुतीत फॉर्म्युला ठरला; फडणवीसांनी आकडा सांगितला!

लोकसभेला कोणाला किती जागा? महायुतीत फॉर्म्युला ठरला; फडणवीसांनी आकडा सांगितला!

मुंबई - आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीने महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदललं आहे. दोन्हीही पक्षात बंड केलेल्या नेत्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जाणं पसंत केलं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघांचं गणितही बदलणार असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणती जागा कोणाला मिळणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबद्दल महत्त्वाचं विधान केलं असून आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं आहे.

"आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप २६ जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून २२ जागांवर लढतील. जागावाटपाचा हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल," असं देवेंद्र फडणवीस यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबरपणे उभा राहील आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे- पवार २२ जागांवर समाधान मानणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी शरद पवार यांना आव्हान देत वेगळी चूल मांडली. शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रुपाने त्यांची पहिलीच मोठी परीक्षा असणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून दोघांना मिळून २२ जागा दिल्या जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आल्यानंतर आता हे दोन्ही नेते जागावाटपावर समाधानी होणार की आणखी जागांची मागणी करणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

आरक्षणाबद्दल काय म्हणाले फडणवीस?

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून तणाव निर्माण झाल्याचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काळजी व्यक्त करत म्हटलं आहे की, "आरक्षण प्रश्नाने केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसून याचा राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो," असं फडणवीस म्हणाले.

Web Title: Lok Sabha election seat sharing Formula was decided in the Grand Alliance says devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.