पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:30 PM2024-03-04T14:30:43+5:302024-03-04T14:31:23+5:30

कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली असं जरांगे पाटलांनी सांगितले.

Leaders do not come to my door, put posters on the house; Appeal of Manoj Jarange Patil to Maratha | पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन

पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन

सोलापूर - एक पेपर घ्यायचा. मोठ्या अक्षरात लिहायचं, मी मतदार, पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही असं लिहून दाराला चिटकवून टाका. उद्यापासून राज्यात ही मोहिम सुरू करा. आपल्या दुचाकी, चारचाकीला तेच कागद चिटकवायचे.  आता मतदान मागायला अमेरिकेत जाणार का? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन केले तसेच सरकारवर निशाणा साधला.  

वैराग इथं मनोज जरांगे पाटलांची सभा झाली, त्याठिकाणी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गोरगरिब मराठा एकत्र आलाय. ५७ लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत. त्याचा आकडा ६३ लाख झालाय अशी माहिती आहे. ५७ लाखांच्या नोंदीतून आतापर्यंत १ ते सव्वा कोटी जनतेला आरक्षण मिळालंय. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरे माध्यामातून अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करायची आणि त्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आज देऊ, उद्या देऊ करत करत सरकारने मराठ्यांचे ३ महिने घालवले. त्यानंतर मराठ्यांनी चलो मुंबईची हाक दिली. ओबीसी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचनेची गरज होती. एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची त्यामुळे अधिसूचना होणे गरजेचे होते. हरकती मागवण्याची तारीख १६ होती. अधिवेशन १५ ला होणार होते. १० तारखेला उपोषण का सुरू केले असा काहींचा प्रश्न होता. याचे उत्तर आज इथं देतो. १६ तारखेपर्यंत सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणीची वाट बघितली असती आणि १५ तारखेला अधिवेशन होऊन गेले असते तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला नसता. १० तारखेला आमरण उपोषण सुरू केल्यामुळे सरकारला १५ चे अधिवेशन २० तारखेला घ्यावे लागले हे उपोषणाचं यश होते. २० तारखेला विधानसभेच्या पटलावर सरकारला सगेसोयरेबाबत चर्चा करावी लागली त्यामुळे अधिसूचनेचाही पटलावर नोंद झाली. १५ ला अधिवेशन झाले नसते तर हे पटलावर आले नसते असा दावा जरांगेंनी केला. 

दरम्यान, अधिसूचना मुख्यमंत्र्यांच्या हातातून घेतली. आता सरकारने वेगवेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी मध्ये बोललो ते खूप लागले. मी काही वाईट बोललो नाही. कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली. मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभे केले नाही तर जातीसाठी उभे केले आहे. माझ्या अंतरवालीतील आई बहिणींची डोकी फुटली तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं नाही. नेत्याला बोललो म्हणून तुटून पडले असा टोला जरांगेंनी टीका करणाऱ्या मराठा नेत्यांना लगावला. 

Web Title: Leaders do not come to my door, put posters on the house; Appeal of Manoj Jarange Patil to Maratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.