मी देश सोडणार नाही

By admin | Published: November 26, 2015 03:36 AM2015-11-26T03:36:20+5:302015-11-26T03:36:20+5:30

अभिनेता आमीर खान याच्या असहिष्णुतेवरील वक्तव्यावरून गत दोन दिवसांपासून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच बुधवारी खुद्द आमीरने एक निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली.

I will not leave the country | मी देश सोडणार नाही

मी देश सोडणार नाही

Next

मुंबई, नवी दिल्ली/ कानपूर : अभिनेता आमीर खान याच्या असहिष्णुतेवरील वक्तव्यावरून गत दोन दिवसांपासून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच बुधवारी खुद्द आमीरने एक निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली. माझा व माझ्या पत्नीचा देश सोडून जाण्याचा कुठलाही इरादा नाही. भारत माझा देश आहे. या देशावर माझे प्रेम आहे. पण मी दिल्लीतील मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यावर अद्यापही ठाम आहे, असे त्याने स्पष्ट केले.
नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्काराच्या कार्यक्रमात बोलताना आमीरने देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेविरोधात कलावंतांनी सुरू केलेल्या ‘पुरस्कार वापसी’चे समर्थन केले होते. शिवाय मुलांच्या सुरक्षेच्या चिंतेने ग्रासलेल्या आपल्या पत्नीने देश सोडून जाण्याचा विचार बोलून दाखवला होता, असे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर आमीरविरोधात काही नेत्यांनी तसेच नेटीझन्सनी तीव्र नाराजी व्यक्त करीत निषेधाचे सूर काढले होते. याचवेळी काहींनी आमीरच्या वक्तव्याचे समर्थनही केले होते. या पार्श्वभूमीवर आमीरने स्पष्टीकरण दिले. देशात असहिष्णुता वाढल्यामुळे आपली पत्नी किरण देश सोडून जाण्याच्या विचारात असल्याच्या सुपरस्टार आमिर खान याच्या वक्तव्यावरून उठलेल्या वादावर बुधवारी दुसऱ्या दिवशीही बऱ्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. आॅस्कर विजेता संगीतकार ए.आर. रेहमान याने देशात असहिष्णुता आहेच, मी स्वत: त्याचा सामना केला आहे, असे सांगून आमिरच्या स्वरात स्वर मिसळला. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव हेही आमिरच्या समर्थनार्थ आले. याउलट हिंदू महासभेने आमिर, शाहरुखसारख्यांचा शिरच्छेदच करायला हवी, अशा ‘जहाल’ शब्दांत आमिर वादावर प्रतिक्रिया नोंदवली. केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही आमिरच्या वक्तव्यावर नाराजी बोलून दाखवली. याच घडामोडीदरम्यान कानपूरमध्ये आमिरविरुद्ध देशद्रोहाचे प्रकरण दाखल करण्यात आले. या याचिकेवर १ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
..............

देशात असहिष्णुता नाही. पण जेव्हा केव्हा कुणी असहिष्णुता असल्याचे म्हणतो तेव्हा प्रत्येकजण त्याच्यावर तुटून पडतो. असहिष्णुतेच्या वेगवेगळ्या व्याख्या असू शकतात. अशा स्थितीत ‘तुम्ही आम्हाला असहिष्णु कसे म्हणू शकता? ’ असा प्रश्न विचारणे हेच एक विडंबन आहे.
- फराह खान,चित्रपट दिग्दर्शिका
......................

अफवांवर विश्वास ठेवू नका
मुंबई : असहिष्णुतेवरून निर्माण झालेल्या वादानंतर सुरक्षा कारणास्तव आमीर खान आपल्या पत्नी व मुलासह काही दिवसांसाठी मुंबईबाहेर जाणार असल्याचे वृत्त असतानाच आमीरच्या निकटच्या सूत्रांनी ही अफवा असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. कृपया अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आमीर लुधियानात ‘दंगल’चे चित्रीकरण करीत आहे. आणखी काही दिवस तो तिथेच राहण्याची शक्यता आहे आणि किरण ही मुंबईत असणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
गत दोन दिवसांपासून माझ्यावर टीका करणाऱ्यांनी, मला देशद्रोही ठरवणाऱ्यांनी एक तर माझी मुलाखत बघितलेली नाही वा जाणीवपूर्वक माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. भारत माझा देश आहे. या देशात जन्म घेतल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. किरण आणि मी इथेच जन्मलेलो आहोत. मी जे काही बोललो, त्या मुलाखतीतील प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे. मला देशद्रोही म्हणणाऱ्यांना मी केवळ इतकेच सांगेन की, मला भारतीय असण्याचा गर्व आहे. त्यासाठी मला कुणाच्याही दाखल्याची गरज नाही. माझ्यावर टीका होताना माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचा मी आभारी आहे. आपण सर्वांना या सुंदर देशाची काळजी घ्यायची आहे. देशाचे ऐक्य, विविधता, सलोखा या सर्वांचे संरक्षण करायचे आहे.
मुस्लीम कधीच भारत सोडणार नाहीत
आमीरच्या वक्तव्याच्या वादात बुधवारी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली. मुस्लीम कुठल्याही स्थितीत भारत सोडून जाणार नाहीत. ते केवळ जन्मानेच नाही तर मनानेही भारतीय आहेत, असे ते म्हणाले.
मी कधीही झुकणार नाही. संघ परिवाराच्या दबावाला बळी पडणार नाही. हा देश माझा आहे. जोपर्यंत जग अस्तित्वात आहे. तोपर्यंत मुस्लीमही भारतात असतील. राज्यघटनेने तशी हमी दिली आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: I will not leave the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.