हेल्मेट जनतेला... ‘खाकी’ मिरवायला

By admin | Published: July 12, 2017 12:02 AM2017-07-12T00:02:36+5:302017-07-12T00:02:36+5:30

हेल्मेट जनतेला... ‘खाकी’ मिरवायला

Helmet masses ... 'Khaki' Mirwaal | हेल्मेट जनतेला... ‘खाकी’ मिरवायला

हेल्मेट जनतेला... ‘खाकी’ मिरवायला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कराड : कायदा सर्वांना समान असतो म्हणे; पण कऱ्हाडात बहुदा पोलिसांसाठी वेगळाच कायदा असावा. सामान्य दुचाकीस्वारांवर पोलिस सध्या हेल्मेट सक्तीची कारवाई करतायत. प्रत्येकाकडून दंडाच्या नावाखाली पैसेही उकळतायत. मात्र, ते स्वत: हेल्मेट वापरत नाहीत. खाकीच्या साक्षीनं ते या सक्तीचं अक्षरश: ‘श्राद्ध’च घालतायत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार जिल्"ात शनिवारपासून हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना प्रत्येक पोलिस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. मात्र, वाढत्या विरोधामुळे सध्या ही सक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांनीही शहरात हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविला आहे. महामार्गावर हेल्मेटसक्ती करावी. मात्र, शहरात हे बंधन घालू नये, असेच अनेकांचे मत आहे. असे असतानाच पोलिसांनी गत चार दिवसांपासून कारवाईची रंगीत तालीमच सुरू केली आहे. कऱ्हाड शहर पोलिसांनीही विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर पोलिस ठाण्याची वाहतूक शाखा तसेच महामार्ग पोलिस संयुक्तरीत्या ठिकठीकाणी अशी कारवाई करतायत.
मलकापूर, ढेबेवाडीफाटा, वारूंजीफाटा, विद्यानगर यासह शहरातील प्रमुख चौकात दररोज सकाळी आठ ते दहा पोलिसांची फौज उभी असते. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, हीच त्यावेळी पोलिसांची ‘कामगिरी’. एखादा दुचाकीस्वार हेल्मेट परिधान न करता प्रवास करताना दिसल्यास पोलिस त्याला तत्काळ अडवतात. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून पाचशे रुपये घेतात. दुचाकीस्वाराने कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी नियमावर बोट ठेऊन ते संबंधिताच्या खिशाला कात्री लावतात. मात्र, हे करीत असताना ते स्वत: हेल्मेट वापरतात का, हा संशोधनाचा विषय बनला आहे. मंगळवारीही शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने मलकापूर येथील ‘डी मार्ट मॉल’समोर तसेच विद्यानगर येथे गाडगे महाराज महाविद्यालयासमोर कारवाईची मोहिम राबविली. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांना त्यांनी दंडही केली. मात्र, मोहिम संपल्यानंतर पोलिसांची खरी ‘कामगिरी’ समोर आली. दुचाकीस्वारांना धायकुतीला आणल्यानंतर कारवाई संपवून अधिकारी व कर्मचारी दुचाकीवर बसले. डोक्यात हेल्मेट नसतानाही ते तेथून पोलीस ठाण्याकडे मार्गस्थ झाले. त्यावेळी संबंधित पोलिसांची बोडकी डोकी दुचाकीस्वारांना अक्षरश: खुणावत होती.
हे पोलिस मित्र कोण?
विद्यानगर येथे मंगळवारी सकाळी कारवाई सुरू असताना नवीनच प्रकार पहायला मिळाला. एका महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचारी रस्त्यानजीक उभे राहून पावत्या फाडत होते. तर ज्यांच्या अंगावर खाकी नाही, असे युवक रस्त्यावर उभे राहून गाड्या अडवत होते. संबंधित युवकांच्या टी शर्टवर ठसठशीत अक्षरात ‘पोलीस मित्र’ असे लिहीले होते. या युवकांचा गाड्या अडवण्याचा संबंधच काय, असा प्रश्न त्यावेळी सामान्यांतून उपस्थित केला जात होता.
दहा दिवसांत
दीड लाख दंड वसूल
पोलीस महानिरीक्षकांनी हेल्मेट सक्तीची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली. मात्र, घोषणा होताच प्रत्येक पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी कारवाई करायला सरसावलेत. कऱ्हाड शहर पोलिसांनीही गत आठ ते दहा दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये फक्त विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांकडूनच तब्बल दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आलाय. पोलिसांनी सोमवारी ६१ जणांवर कारवाई करून ३० हजार ५०० तर मंगळवारी ७० जणांवर कारवाई करून ३५ हजाराचा दंड वसूल केला.
कारवाई करा; पण
क्रेनवाल्यांना आवरा!
कारवाईची मोहीम राबविली जात असताना त्याठिकाणी क्रेनही बोलाऊन घेतली जाते. एखादा दुचाकीस्वार दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असेल तर तातडीने त्याची दुचाकी उचलून त्या क्रेनमध्ये घातली जाते. दुचाकीस्वाराने कितीही विनवणी केली तरी त्याला त्यावेळी जुमानले जात नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगण्यापूर्वीच क्रेनमध्ये कामाला असलेले युवक ती दुचाकी उचलून क्रेनमध्ये ठेवतात. त्यामुळे कारवाई करा; पण क्रेनवाल्यांना आवरा, असं म्हणण्याची वेळ दुचाकीस्वारांवर येते.
कर्मचारी सुस्त; अधिकारीही बिनधास्त
हेल्मेट सक्तीच्या ‘टेन्शन’चा सध्या सामान्यांच्या डोक्यावर भार आहे. घरातून बाहेर पडतानाच अनेकजण पोलिसांच्या भीतीने थबकतायत. मात्र, जे पोलिस सामान्यांवर कारवाई करतात तेच पोलिस हेल्मेट वापरीत नसल्याचे समोर आले आहे. हेल्मेटबाबत कर्मचाऱ्यांना काहीही देणंघेणं नाही. तसेच अधिकारीही या सक्तीला गांभिर्याने घेत नसल्याची परिस्थिती आहे. कर्मचारी किंवा अधिकारीही हेल्मेट न घालताच दुचाकी दामटत असल्याचे कऱ्हाडच्या रस्त्यावर दिसून येते.
महिला पोलिसही दुचाकीवर सुसाट
विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी महिला पोलिसही सरसावतात. दुचाकीस्वाराला अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. मात्र, त्या स्वत: हेल्मेट वापरीत नसल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी गाडगे महाराज महाविद्यालयासमोरील कारवाई आटोपून पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या एकाही दुचाकीस्वार महिला पोलिसाकडे हेल्मेट नव्हते. महिला पोलीस अधिकारीही विनाहेल्मेटच दुचाकीवरून सुसाट गेल्याचे पहायला मिळाले.
हेल्मेटसक्ती १५ जुलैपासून प्रभावीपणे राबविले जाणार असून सध्या दुचाकीस्वारांमध्ये जागृती केली जात आहे. दंडात्मक कारवाईमुळे दुचाकीस्वार हेल्मेट परिधान करतील, अशी अपेक्षा आहे. पोलिसांसाठी पांढऱ्या रंगाची हेल्मेट मागविण्यात आली आहेत. ती अद्याप मिळालेली नाहीत. हेल्मेट मिळाल्यानंतर प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यालाही हेल्मेट परिधान करूनच दुचाकीवरून प्रवास करावा लागेल. तशा सूचना सर्वांना दिल्या आहेत.
- प्रमोद जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कऱ्हाड

Web Title: Helmet masses ... 'Khaki' Mirwaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.