ऑनलाइन लोकमत
मोहोळ, दि. 06 - वडवळ येथील कार्यक्रम उरकून सोलापूरकडे निघालेल्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने चौघे जागीच ठार झाले. स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काशीनाथ भरमशेट्टी यांचाही मृतामध्ये समावेश आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर सावळेश्वर टोल नाक्याजवळ घडली.
मूळचे हन्नूर (ता. अक्कलकोट) येथील रहिवासी असलेले काशीनाथ भरमशेट्टी (वय ५२) हे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी वडवळ (ता. मोहोळ) येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून सोलापूरकडे परत येताना ट्रॅक्टरला कारने (क्र. एम. एच. १३ ए. झेड. २९९९) धडक दिली. यात चौघे जागीच ठार झाले. काशीनाथ विठ्ठल भरमशेट्टी, दिनकर जगताप (रा. सोहाळे), राजेंद्र जोशी (रा. हॉटेल चालक, फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर), कारचालक चपळगावचे माजी उपसरपंच अप्पासाहेब मांदे (रा. चपळगाव, ता. अक्कलकोट) हे जागीच मरण पावले. जोराच्या धडकेत कार चक्काचूर झाली आहे. काशीनाथ भरमशेट्टी हे युवक काँग्रेसचे अक्कलकोट तालुक्याचे माजी अध्यक्ष व दहिटणे (ता. अक्कलकोट) येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष या पदावर काम केले होते. ते माजी आ. सिद्रामप्पा पाटील व आ. सिद्धाराम म्हेत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.