दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली भरते मैफल

By Admin | Published: April 21, 2017 08:42 PM2017-04-21T20:42:15+5:302017-04-21T20:42:15+5:30

किराणा घराण्याचे अध्वर्यु संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेची परंपरा गेली ८२ वर्षे सुरू आहे.

Filled with tamarind trees in the castle | दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली भरते मैफल

दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली भरते मैफल

googlenewsNext

सदानंद औंधे/ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 21 - मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरसात महान गायक आणि किराणा घराण्याचे अध्वर्यु संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेची परंपरा गेली ८२ वर्षे सुरू आहे. दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गायन-वादन करून अब्दुल करीम खाँ यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. देशातील नामवंत गायक, वादक स्मृती संगीत सभेत सहभागी होतात.
अब्दुल करीम खाँ मूळचे उत्तर प्रदेशातील कैराना येथील. मात्र मिरज ही त्यांची कर्मभूमी. मिरजेत १९३० मध्ये त्यांनी बंगला बांधून तेथेच वास्तव्य केले. तो बंगला गवई बंगला म्हणून ओळखला जातो. खाँसाहेबांनी या बंगल्यात नामवंत शिष्यांना गायकीचे धडे दिले. मिरजेत आल्यानंतर खाँसाहेबांना प्लेगचा आजार झाला. एका फकिराच्या सांगण्यावरून त्यांनी येथील प्रसिद्ध मीरासाहेब दर्ग्यात जाऊन गानसेवा केली. त्यामुळे चार दिवसांतच ते प्लेगच्या आजारातून पूर्ण बरे झाले.

अब्दुल करीम खाँ यांची मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यावर अपार श्रद्धा होती. खाँसाहेब देशात कोठेही गेले तरी उरसाच्या दुसऱ्या दिवशी मिरजेत येऊन दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गानसेवा करीत असत. सुमारे ४० वर्षे त्यांनी हे व्रत पाळले. १९३८ मध्ये महाराष्ट्राबाहेर दौऱ्यावर असताना त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह मिरजेत आणून दर्गा आवारात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दर्ग्यात गानसेवा करणाऱ्या खाँसाहेबांच्या मृत्यूनंतर १९३८ पासून त्यांच्या शिष्यांनी दर्गा उरूसात अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभा सुरू केली. १९३८ मध्ये दर्गा उरूसातील पहिल्या स्मृती संगीत सभेचे आॅल इंडिया रेडिओवरून प्रक्षेपण करण्यात आले होते. गेली ८२ वर्षे खाँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभा सुरू आहे. देशातील अन्य कोणत्याही नामवंत गायकाची पुण्यतिथी एवढी वर्षे साजरी होत नाही. सवाई गंधर्व, हिराबाई बडोदेकर, संगीत दिग्दर्शक राम कदम, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, सरस्वतीबाई राणे, पंडित भीमसेन जोशी, पंडित गंगूबाई हनगल, पंडित फिरोज दस्तूर, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, कैवल्यकुमार या शिष्यांनी दर्गा उरसात गायन-वादनाची परंपरा पुढे सुरू ठेवली.

किराना घराण्यातील दिग्गज गायकांचे खाँसाहेबांसोबत दर्ग्याशीही भावनिक नाते निर्माण झाले आहे. दर्गा संगीत सभेत गायक सुरेश वाडकर, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, नियाज अहमद-फैयाज अहमद, हिराबाई बडोदेकर, रोशनआरा बेगम, पं. सुरेश माने, तबलावादक अहमदजान थिरकवा, पं. कैवल्यकुमार, पं. व्यंकटेशकुमार यांच्यासह दिग्गज गायक-वादकांनी हजेरी लावली आहे. गायक-वादक कोणतेही मानधन न घेता दर्गा संगीत सभेत संधी मिळावी, यासाठी धडपड करतात. मिरजेतील गवई बंगल्यात खाँसाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय करून ही इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, यासाठी किराणा घराण्यातील नामवंत कलाकारांनी गवई बंगला स्मृती मंडळाची स्थापना करून गेली २५ वर्षे शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. खाँसाहेबांची कन्या हिराबाई यांनी मिरजेत अब्दुल करीम खाँ स्मृती भवनाची उभारणी केली असून, स्मृती भवनात सतार व तबलावादनाचे प्रशिक्षण देण्यात येते.

दर्गा संगीत सभेत केवळ ख्याल व अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत सादर होते. दर्गा संगीत सभेमुळे संगीत ऐकण्याची सवय झालेले रसिक श्रोते तयार झाले आहेत. या सभेने शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसाराला हातभार लावला आहे. त्यामुळे मिरजेशी किराना घराण्याचे नाते कायम राहिले आहे.
- बाळासाहेब मिरजकर, तंतुवाद्य निर्माते

Web Title: Filled with tamarind trees in the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.