अनुसूचित जाती, जमातींचा सन्मान जपणे प्रत्येकाचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:15 AM2018-10-19T05:15:54+5:302018-10-19T05:16:04+5:30

उच्च न्यायालय : तिरस्काराने वागवल्यामुळे प्रतिष्ठा, सन्मान हरवल्याचे नोंदवले निरीक्षण

Everyone's duty to honor the Scheduled Castes and the Scheduled Tribes | अनुसूचित जाती, जमातींचा सन्मान जपणे प्रत्येकाचे कर्तव्य

अनुसूचित जाती, जमातींचा सन्मान जपणे प्रत्येकाचे कर्तव्य

Next

मुंबई : दुकानातील बाटलीतून खाऊ न विचारता घेतल्याने दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. तिरस्काराने वागल्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सदस्यांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान हरवला आहे. त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान जपणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.
इरफान पठाण व सलीम मेहमूद पठाण यांची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर या दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. ए. एम. बदार यांच्या खंडपीठापुढे या जामीन अर्जांवर सुनावणी होती. या दोघांवरही अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (प्रिव्हेन्शन आॅफ अ‍ॅट्रॉसिटी) अ‍ॅक्ट व पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सदस्यांचा सन्मान आणि स्वाभिमान जपणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ झाली आहे. अशा प्रकारे तिरस्काराने वागवल्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील सदस्यांची प्रतिष्ठा आणि सन्मान हरवला आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.
या केसमध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावरून मुलांवर अत्यंत वाईट प्रकारे अत्याचार केले असल्याचे दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
गेल्या वर्षी मे महिन्यात ठाणे पोलिसांनी इरफान पठाण आणि सलीम मेहमूद पठाण यांना अटक केली. ८ व ९ वर्षांच्या दोन मुलांनी त्यांच्या दुकानातील बाटलीतून खाऊ घेतला होता. मात्र हा खाऊ त्यांना न विचारता या मुलांनी घेतल्याने आरोपींनी रागाच्या भरात या मुलांना नग्न करून त्यांची धिंड काढली होती.
मुलांना नग्न करून त्यांच्या धिंड काढण्यासोबतच त्यावेळी या मुलांच्या गळ्यात चपलेचा हारदेखील अडकवण्यात आला होता. यादरम्यान या मुलांना मारहाणही करण्यात आली होती. केवळ खाऊ पळवल्यामुळे या मुलांना अशाप्रकारची वाईट शिक्षा करण्यात आली होती. ही दोन्ही मुले अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील आहेत.

जामीन अर्ज फेटाळला
जामीन अर्जावर युक्तिवाद करताना पठाण यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या कायद्याअंतर्गत दोषी सिद्ध झाल्यास पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. आरोपींनी आधीच १७ महिने कारागृहात काढले आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी. मात्र, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, असे म्हणत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: Everyone's duty to honor the Scheduled Castes and the Scheduled Tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.