डोंबिवली-पुणे बसला एसटीचाच खोडा

By admin | Published: May 8, 2017 06:17 AM2017-05-08T06:17:33+5:302017-05-08T06:17:33+5:30

सुटी सुरू झाली की, एसटी प्रवास... ही सवय हळूहळू कमी होतेय, असे वाटण्याजोगी एसटीची स्थिती आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद मिरवणाऱ्या प्रशासनानेच

Dombivli-Pune bus stop ST | डोंबिवली-पुणे बसला एसटीचाच खोडा

डोंबिवली-पुणे बसला एसटीचाच खोडा

Next

- मुरलीधर भवार -  

सुटी सुरू झाली की, एसटी प्रवास... ही सवय हळूहळू कमी होतेय, असे वाटण्याजोगी एसटीची स्थिती आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद मिरवणाऱ्या प्रशासनानेच एसटीच्या वाढीत खोडा घातल्याने खाजगी बससेवेचे फावते आहे. डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाशांची मागणी असूनही येथून पुण्यासाठी आजवर ना शिवनेरी सुरू झाली, ना व्होल्व्हो. ते मार्ग खाजगी गाड्यांना आंदण देण्यात आले आहे. तीच अवस्था कोकण आणि गोव्यासारख्या पर्यटनस्थळांची. खान्देश, मराठवाडा, विदर्भाकडे तर एसटीचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. अशा स्थितीत प्रवासी वळतील कसे?



यद्याचे बसमार्ग समोर दिसत असून, प्रवाशांची मागणी असूनही त्या मार्गावर बस न वाढवणे, हक्काच्या मार्गासाठी न झगडणे आणि कालबाह्य झालेल्या बसमुळे आहेत तेही प्रवासी टिकवून न ठेवणे, कर्मचाऱ्यांच्या भरतीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ही सेवा अधिकाधिक मोडकळीस कशी येईल, असेच त्यांचे धोरण असल्याचे दिसून येते. त्यामुळे डोंबिवलीसारख्या ठिकाणी बसस्थानक पार आडबाजूला आहे. तेथे मागणी असूनही सुविधा पुरवल्या जात नाहीत. कितीही वाहतूककोंडी होत असली, तरी खासगी गाड्या कस्तुरी प्लाझा, घरडा सर्कल आणि पश्चिमेतील रेल्वे स्थानकापासून सुटतात. पण, कोंडीचे कारण देत बाहेरगावची एसटी तेथे येत नाही. एसटीचा मुख्य थांबा एमआयडीसीत ठेवून शहरात बाजीप्रभू चौक, इंदिरा गांधी चौक किंवा कस्तुरी प्लाझासमोर एसटीला थांबा दिल्यास शहरातून जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल आणि खाजगी गाड्यांकडे जाणारे प्रवासी एसटीकडे सहज वळतील. पण, खाजगी गाड्या शहरात याव्या म्हणून झगडणारे नगरसेवक, आमदार, खासदार एसटीसाठी असे प्रयत्न करायला तयार नाहीत, ही एसटीची आणि पर्यायाने प्रवाशांची शोकांतिका आहे.
कल्याणच्या बसस्थानकाचेही तसेच आहे. रेल्वे स्थानकालगत असल्याने येथे एसटीकडे प्रवाशांचा ओढा आहे. पण, एसटीच्या मोक्याच्या भूखंडावर डोळा ठेवून काही लोकप्रतिनिधीच हे स्थानक खडकपाड्याला हलवण्याच्या प्रयत्नात आहेत. तेथे रेल्वेचे जंक्शन असल्याचे कारण देत तेथून राज्याच्या विविध भागांत बस सोडण्यातून एसटीनेच अंग काढून घेतले. त्यामुळे मोक्याची जागा आणि प्रवाशांचा ओढा असूनही एसटीच्या वाढीला खीळ बसली आहे. त्यापेक्षा वाईट स्थिती आहे, ती विठ्ठलवाडी आगाराची.
हे आगार सध्या चर्र्चेत येत आहे, ते तेथील भूखंडावर असलेल्या बिल्डरांच्या डोळ्यामुळे. तेथून बस सोडल्या तर त्या कल्याण, डोंबिवलीमार्गे कोकण, पुणे, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, गोवा येथे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होऊ शकते. पण, हे आगारच अडगळीत टाकल्यासारखी त्याची अवस्था आहे.
या तिन्ही स्थानकांत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिवहनसेवा सुरू झाल्याचे कारण देत एसटीच्या ताब्यातील ग्रामीण मार्ग काढून घेण्यात आले.
पण, उल्हासनगर परिवहनसेवा बंद पडली, तर कल्याण-डोंबिवलीच्या परिवहनसेवेने ग्रामीण भागातील अनेक मार्ग तोट्याचे कारण दाखवून बंद केले. त्या मार्गांचा ताबा खाजगी जीप, बेकायदा रिक्षांनी घेतला, पण ते मार्ग पुन्हा एसटीकडे हस्तांतरित करण्यात आले नाहीत आणि एसटीनेही त्यासाठी आग्रह धरला नाही. कालबाह्य झालेल्या बस हेही एसटीचे आणखी एक दुखणे.
मंत्रिमंडळात परिवहन खाते सध्या शिवसेनेकडे आहे. या परिसरात शिवसेनेची सत्ता आहे. ग्रामीण भागातही शिवसेना भक्कम असल्याचा त्यांच्या नेत्यांचा दावा आहे. मग, त्या प्रवाशांच्या एसटी सुविधेसाठी तो पक्ष कधीही झगडताना दिसत नाही. ज्या पांढरपेशा मतदारांवर भाजपाची भिस्त आहे, त्या डोंबिवली, कल्याणच्या एसटी प्रवाशांची व्यथा तो पक्षही समजून घेण्यास तयार नाही आणि मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्षांनीही प्रवाशांची ही व्यथा कधी कळलेली नाही. त्यामुळे या भागातील प्रवासी भरमसाट दर आकारणाऱ्या खाजगी बसच्या दावणीला बांधले आहेत. ज्या डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी स्थानकांचा हा प्रश्न आहे, त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातील गैरसोयी पाहता प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यापेक्षा ती प्रवाशांच्या त्रासासाठी असल्याचे दिसून येते.


आरामदायी बस वाढवण्याची मागणी
विठ्ठलवाडी बस डेपो वाचवण्यासाठी कोकण प्रवासी संघटनेने वारंवार पाठपुरावा केला आहे. विठ्ठलवाडी आगाराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. कल्याणच्या आगाराची पाच एकर जागा आहे. ही जागा ९९ वर्षे करारावर आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पात स्टेशन परिसरातील सोयीचे बस आगार हलवून खडकपाडा परिसरात स्थलांतरित केले जाणार आहे. त्याला प्रवासीवर्ग, एसटी कामगार संघटना व प्रवासी संघटनांचा विरोध आहे. महामंडळाने महापालिका परिवहनसेवेशी केलेल्या करारामुळे शहरांतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद केल्या आहेत. आता परिवहनसेवाही बस चालवत नाही. त्या ठिकाणी महामंडळाने पुन्हा सेवा सुरू करावी. विठ्ठडवाली आगारात काही सुविधा केल्या जात आहेत. कल्याण आगारात अस्वच्छता आहे. ती दूर करून प्रवाशांना निरोगी प्रवास करता यावा, अशी व्यवस्था केली जावी. डोंबिवली बस स्थानकात जाणाऱ्या बस डोेंबिवली रेल्वे स्थानकाकडून वळवून घ्याव्यात. प्रवाशांना त्या ठिकाणाहून बस पकडता यावी. त्या ठिकाणी रात्र व दिवस या दोन्ही पाळीत दोन कंट्रोलर देण्यात यावेत. डोंबिवली बसस्थानक कल्याण आगारांतर्गत आणल्यास नियंत्रण करणे सोपे होईल. खाजगी बसचा व्यवसाय तेजीत आहे. तो रोखण्यासाठी बस आगार अद्ययावत करणे, सोयीसुविधा देणे, नव्या बस सुरू करणे, नव्या चांगल्या आरामदायी बस देणे, यावर महामंडळाने भर दिल्यास बससेवा हा सक्षम वाहतूक पर्याय होऊन रिक्षा व खाजगी बससेवाचालकांची मुजोरी मोडीत काढता येऊ शकते.
- मुरलीधर शिर्के, अध्यक्ष, कोकण प्रवासी संघटना

Web Title: Dombivli-Pune bus stop ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.