'हरलो नाही तर मरेपर्यंत लढलो', 'पानिपत'चा पराभव मराठ्यांचे शौर्य सांगून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 11:52 AM2019-01-14T11:52:49+5:302019-01-14T18:50:31+5:30

दिल्लीपासून सुमारे 90 किमी अंतरावरील ‘पानिपत’ या कुरक्षेत्राच्या शेजारच्या मोकळ्या मैदानावर 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अफगाणिस्थानचा दुराणी बादशहा अहमदशाह अब्दाली यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. देशावरचे परचक्र परतवून लावण्याच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातली एक अखंड पिढी गारद झाली.

'Do not lose your battle till death,' defeat of 'Panipat' went on telling about Maratha bravery | 'हरलो नाही तर मरेपर्यंत लढलो', 'पानिपत'चा पराभव मराठ्यांचे शौर्य सांगून गेला

'हरलो नाही तर मरेपर्यंत लढलो', 'पानिपत'चा पराभव मराठ्यांचे शौर्य सांगून गेला

googlenewsNext

दिल्लीपासून सुमारे 90 किमी अंतरावरील ‘पानिपत’ या कुरक्षेत्राच्या शेजारच्या मोकळ्या मैदानावर 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अफगाणिस्थानचा दुराणी बादशहा अहमदशाह अब्दाली यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. देशावरचे परचक्र परतवून लावण्याच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातली एक अखंड पिढी गारद झाली. यात मराठ्यांचा दारुण पराभव झाला असला, तरीही त्यांनी दाखविलेले शौर्य जगभरात वाखाणले गेले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खैबरखिंड ओलांडून भारतात होणाºया परकीय आक्रमणांना कायमचा आळा बसला. १७६१नंतर येथून एकही परकीय आक्रमक भारतावर चालून आला नाही. त्यामुळे  पूर्वीच्या दोन लढायांप्रमाणेच १७६१ सालच्या पनिपताच्या तिसºया लढाईतही स्वकीय सत्तेचा पराभव होऊनही, मराठ्याच्या रक्ताने शिंपलेली ही भूमी भारतीयांसाठी पुण्यभूच ठरते!

पानिपतचे तिस-या युद्धाने मराठ्यांच्या आणि एकंदरीतच भारतवर्षाच्या इतिहासाला कलाटणी दिली. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव इतका दारुण होता की, अक्षरश: पराभवाची आठवण वा उच्चारही नकोसा वाटतो. या लढाईचा उल्लेख मोठा पराभव झाल्याचा दाखल देत 'पानिपत होणे' हा शब्दप्रयोग वापरून केला जातो. पानिपतचे युद्ध मराठे हरले असले, तरी त्यांनी अब्दालीचा ज्याप्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनही मराठे परत उभे राहिले. काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानावर असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता की, जेणेकरून नंतर ब्रिटिशांचा विजय अशक्य झाला असता.

हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवछत्रपतींनी केली, हे आपण जाणतोच. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. समकालीन जुलमी सत्ताधाऱ्यांपासून महाराष्ट्र भूमीला मुक्त करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांना साम्राज्यतृष्णा नव्हती व ते सत्तापिपासू नव्हते. त्यामुळेच त्यांनी उत्तरेतून दक्षिणेत येऊन दक्षिणेतल्या विजापूर आणि गोवळकोंडा येथील पातशहांचा नाश करू इच्छिणाऱ्या औरंगजेबाच्या विरुद्ध दक्षिणेतल्या राज्यांचा संघ उभारून त्याचा प्रतिकार करण्याची कल्पना मांडली. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हातमिळवणी करत दक्षिणेत दक्षिणेतील लोकांची सत्ता असा महाराजांचा आग्रह होता. 

अब्दालीने १७५९मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील प्रांतांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. अब्दालीचे हे हल्ले म्हणजे त्याने सरळ सरळ मराठ्यांशी वैर पत्करल्याची ग्वाही देत होते. दिवसागणिक अहमदशहा अब्दालीचा उपद्रव वाढत चालला होता. याला वेळीच आवर घालावा लागेल अन्यथा उत्तरेतील साम्राज्य हातून जाईल हा विचार करून 1 लाखाहून अधिकची फौज घेऊन सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पानिपताच्या दिशेने कूच केले. या फौजेला वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले, आदी सरदार येऊन मिळाले. भाऊसाहेबांनी सर्वप्रथम दिल्लीचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर कुंजपुराच्या चकमकीमध्ये मराठ्यांनी नजीम खानाच्या सैन्याला मात देत काही रसद मिळविली. याच दरम्यान, अब्दालीने बाघपत येथून यमुना ओलांडली आणि मराठ्यांचा दिल्लीशी संपर्क तोडला.

या वेळी मराठ्यांनी आपला तळ पानिपत येथे टाकला. अब्दालीने मुख्य मराठा सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणणाऱ्या गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवला. या घटनेमुळे मराठ्यांचा रसद पुरवठा ठप्प झाला आणि मराठी सैन्याची उपासमार होऊ लागली. पुढे दोन महिने दोन्ही पक्षांमध्ये लहानमोठ्या चकमकी झडतच होत्या. उपासमारीने हैराण झालेल्या सैन्यासह भाऊंसाहेबांनी अखेर स्वत:हून पहिले पाऊल उचलले. 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईला सुरुवात झाली. तोफखाना दलाचा प्रमुख इब्राहीम खान या गारद्याच्या तुकडीला पुढे ठेवून मराठ्यांनी गोलाच्या लढाईला प्रारंभ केला. भाऊंच्या सैन्याने मध्यातून हल्ला चढविला. अफगाण गांगरल्याचे पाहून मराठ्यांच्या घोडदळाने जास्त वाट न बघता जोरदार आक्रमण केले. परंतु भुकेले उपाशी घोडे रणांगणामध्ये भिडण्यास सज्ज नव्हते. त्यांनी हाय खाल्ली.

बहुतेक घोडे अफगाणी सैन्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले. ही चाल जरी अयशस्वी झाली असली तरी मराठे रणांगणावर अजूनही वर्चस्व राखून होते. येथवर सर्व ठीक होते. असेच सुरु राहिले असते तर मराठ्यांनी पानिपतामध्ये विजय देखील संपादन केला होता, पण या क्षणी अब्दालीने त्याचे १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा या स्वरुपाची राखीव सेना बाहेर काढली आणि मराठ्यांवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला. अब्दालीच्या या एका चालीमुळे दृष्टीक्षेपात असलेला मराठ्यांचा विजय पराभवात बदलला. थकल्या भागलेल्या मराठी सैन्याला नव्या दमाच्या अफगाणी सैन्याचा प्रतिकार करताना अडचण येऊ लागली. मराठे कधी नव्हे ते मागे हटू लागले. कुंजपुरामध्ये मराठ्यांनी बंदी बनवलेल्या अफगाण्यांनी याच निर्णायक क्षणी उठाव केला. मराठे पुरते गोंधळात पडले. ही गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी भाऊंनी आपली राखीव सेना पुढे न आणण्याची चूक केली आणि ते स्वत: हत्तीवरून उतरून अफगाण्यांना कापू लागले. लढणाऱ्या मराठी सैन्याच्या हे लक्षात आले नाही. त्यांची हत्तीकडे नजर जाताच त्यावर भाऊ न दिसल्याने त्यांना वाटले की सदाशिव भाऊ पडले.

भाऊ पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांनी आशा सोडली. अफगाण सैन्याच्या गर्दीत लढताना भाऊंना शेवटचे नाना फडणीस यांनी पाहिले होते. याच दरम्यान विश्वासराव देखील गोळी लागून धारातीर्थी पडले. आपला पराभव झाला असे समजून अर्ध्याअधिक मराठी सैन्याने माघार घेतली. तर काही तुकड्या अजूनही निकराने लढत होत्या. पण जसजशी रात्र झाली तसतसे ह्या तुकड्या देखील शत्रूपासून दूर गेल्या. अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचे पानिपत झाले.  पानिपतच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धात अगणित मराठ्यांना वीरमरण आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीम खान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे अशी मातब्बर मंडळी या युद्धात मराठ्यांनी गमावली. जणू मराठ्यांची कर्तबगार पिढी संपुष्टात आली. यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यांनी अपार कर्तुत्व दाखवत पानिपताचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना देखील अल्पायुष्य लाभल्याने मराठी साम्राज्याची पताका खाली आली.

इंग्रजांनी आपला डाव साधला आणि भारतात आपले पाय रोवले. असे हे पानिपतचे तिसरे युद्ध घडले आणि 14 जानेवारीचा हा दिवस मराठी इतिहासात काळ्याकुट्ट आठवणी सोडून गेला. पानिपतची लढाई ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चिली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे. पानिपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकावता आला नाही आणि तेथे त्यांचा दारुण पराभव झाला, हे जरी खरे असले तरी त्यामुळे मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही. या मराठे त्वेषाने लढले. जगाला मराठ्यांच्या शौर्याचे दर्शन घडले.

Web Title: 'Do not lose your battle till death,' defeat of 'Panipat' went on telling about Maratha bravery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.