ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 17 -  देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्य सरकारच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होते आहे. संजय राऊत यांनी हे वक्तव्य अमरावतीत केले आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या नावाने जे काही खंडणीचे राज्य महाराष्ट्रात सुरू आहे ते त्यांनी आधी थांबवावे. कोणाची घरं भरली जात आहेत, याचा पर्दाफाश करणार आहोत, असा इशाराही यावेळी राऊत यांनी दिला आहे. 
 
शिवाय, 'पदाच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अप्रतिष्ठा होईल,  असे विधान फडणवीस यांनी शक्यतो करू नये. कारण खुर्ची तशीच असते त्यावरील माणसं बदलतात. फडणवीस कितवे आहेत हे त्यांनी पाहावे. लवकरच ते माजी होतील आणि माजी म्हणून त्यांच्या वक्तव्याला काहीही किंमत राहत नाही.  हे त्यांनी आधीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरुन पाहावे', असं सांगत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टार्गेट केले आहे. 
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपाने काडीमोडी घेतल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला आहे. राज्यातील सत्तेत एकत्र नांदणा-या मित्रांच्या दोस्तीत सध्या कुस्ती सुरू आहे. 
एकमेकांवर टीका करताना इतकी टोकाची विधानं केली जात आहेत की, राज्य सरकारच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.