दलित समाजाची न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 03:27 AM2016-10-14T03:27:01+5:302016-10-14T03:27:01+5:30

दलित मुलाने मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने नाशिकमध्ये तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेने नाशिकमध्ये हिंसक वळण

Dalit community run in court | दलित समाजाची न्यायालयात धाव

दलित समाजाची न्यायालयात धाव

googlenewsNext

मुंबई : दलित मुलाने मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने नाशिकमध्ये तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले; तर दुसरीकडे दलितांवर मराठा समाजाकडून अत्याचार करण्यात येत असल्याने व त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घातल्याने दलित वर्गातील दोघांनी थेट उच्च न्यायालयाची पायरी गाठली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली त्याच दिवशी ५० जणांच्या जमावाने सांजेगाव येथील दलितांच्या १५ घरांवर हल्ला केला. जो सापडेल त्याला मारहाण केली तर महिलांचा विनयभंग केला, असा आरोप नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील सांजेगावची रहिवासी बेबीबाई शिंदे (५०) आणि साहेबराव पवार (३०) यांनी याचिकेद्वारे केला आहे. या हल्ल्यात बेबीबाई यांची मुले शिवाजी आणि विजय गंभीररीत्या जखमी झाले. दोघेही कोमामध्ये असून, शिवाजीला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर विजय नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहे. या जमावाने सांजेगाव येथील बौद्धविहाराचीही तोडफोड केली. या घटनेची पोलिसांनी अद्याप दखल घेतलेली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
‘त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेनंतर अनुसूचित जाती व जमातीच्या समाजावर पूर्णपणे सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करून दिला जात नाही तसेच पिण्यासाठी पाणीही दिले जात नाही. मुलांनाही शाळा सोडून घरी बसावे लागत आहे,’ असे याचिकाकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. ‘पोलिसांकडून साहाय्य मिळावे यासाठी बेबीबाई शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकार महिलेचा फोन वापरून महासंचालक सतीश माथूर यांना फोन केला. मात्र माथूर यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्या वेळी कार्यालय बंद असल्याचे कारण पुढे केले. त्यावर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागू, असे माथूर यांना सांगितले. माथूर यांनी त्यांना उच्च न्यायालयात भेटू, असे सांगितले,’ असेही अ‍ॅड. सदावर्ते यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांना याबाबतीत सूचना घेण्याचे निर्देश दिले.
त्र्यंबेकश्वर येथे ९ आॅक्टोबर रोजी एका पाच वर्षीय मराठा मुलीवर दलित मुलाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी दलित वस्तीवर हल्ला करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Dalit community run in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.