किर्ती शेरे आत्महत्या प्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:17 PM2017-07-25T13:17:01+5:302017-07-25T13:17:01+5:30

बारामतीत स्पर्धा परीक्षेला बसलेल्या किर्ती जगन्नाथ शेरे (वय-25) या विद्यार्थिनीने 20 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती.

CRPF jawan arrested in Kirti Shere's suicide case | किर्ती शेरे आत्महत्या प्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक

किर्ती शेरे आत्महत्या प्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक

Next
>ऑनलाइन लोकमत
बारामती, दि. 25- बारामतीत स्पर्धा परीक्षेला बसलेल्या किर्ती जगन्नाथ शेरे (वय-25) या विद्यार्थिनीने  20 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी आणि सीआरपीएफमध्ये बिहार येथे तैनात असलेल्या गणेश गोरख राऊत याला बारामती पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गणेश गोरख  याच्यासह अन्य सात आरोपींची त्रालासा कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. प्रेमात गणेशने आपली फसवणूक केल्याचं किर्तीने चिठ्ठीत लिहीलं होतं. तसंच इतर सात जणांनी तिला आत्महत्या करायला भाग पाडल्याचंही तिने चिठ्ठीत लिहीलं होतं. गोरख राऊत. शितल, सुप्रीया, महादेव निगडे, किरण निगडे, संजय निगडे, सचिन काटे अशी इतर सात जणांची नावं आहेत. 
 
सीआरपीएफमध्ये बिहार येथे तैनात असलेल्या गणेश गोरख राऊत याला बारामती पोलिसांच्या पथकाने सोमवारी (दि. 24) बिहारमध्ये ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मंगळवारी रात्रीपर्यंत हे पथक बारामतीत येईल. बुधवारी राऊत याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
 
या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश राऊत हा सीआरपीएफमध्ये बिहारमध्ये कार्यरत आहे. त्याने केलेल्या विश्वासघातामुळेच किर्तीने आत्महत्या केल्याने त्याला अटक केल्याशिवाय पुढील माहिती मिळणे अशक्य होते. परिणामी गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच सीआरपीएफच्या बिहारमधील प्रमुखांशी जिल्हा पोलिस अधिक्षकांच्यामार्फत संपर्क साधण्यात आला. सीआरपीएफच्या तेथील कार्यालयाला घटना सांगिल्यानंतर लागलीच गणेश याला तेथे कार्यालयात थांबवून ठेवण्यात आले होते. त्याला ताब्यात घेवून बारामतीला आणण्यासाठी बारामती शहर पोलिस ठाण्यातून पोलिस उपनिरीक्षक नीलेश आपसुंदे,  कॉन्स्टेबल दादासाहेब डोईफोडे व अतुल जाधव हे बिहारला गेले होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास या पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत गणेश याला ताब्यात घेत परतीचा प्रवास सुरु केला आहे. मंगळवारी रात्री मुख्य आरोपी गणेशसह हे पथक बारामतीत पोहोचल्यानंतर बुधवारी गणेश राऊत याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. गणेशकडे चौकशी केल्याशिवाय या प्रकरणातील सखोल माहिती पोलिसांच्या हाती लागणे अशक्य आहे. 
 
किर्तीच्या या प्रकरणाबाबत तिच्या कुटुंबियांना कोणतीच माहिती नसल्याने त्यांच्याकडून कोणतीही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली नाही. गणेश याला ताब्यात घेतल्यावर सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या व गुन्हा दाखल झालेल्या दोन महिलांपर्यंत पोहोचणेही पोलिसांना शक्य होणार आहे. 
 
गणेश राऊत हा बिहारमधील जुमाई येथे बटालियन क्रमांक २०६ मध्ये कमांडो म्हणून कार्यरत आहे. किर्तीने आत्महत्या करण्यापूर्वी सेल्फी काढून त्याला पाठविला होता. त्यामुळे किर्ती आत्महत्या करत असल्याची माहिती त्याला त्याचवेळी मिळाली होती. लागलीच त्याने त्याच्या कार्यालयाकडे रजेचा अर्जही सादर केला होता. परंतु बारामती पोलिसांनी तात्काळ तेथील सीआरपीएफच्या प्रमुखांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली होती. परिणामी गणेशची रजा नामंजूर करत त्याला तेथे थांबवून ठेवण्यात आले होते.
 

Web Title: CRPF jawan arrested in Kirti Shere's suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.