मराठवाड्यात जाळपोळ, दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:46 AM2018-07-25T00:46:35+5:302018-07-25T00:47:09+5:30

आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि कायगाव येथे नदी उडी मारल्यानंतर मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला मंगळवारी मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही हिंसक वळण लागले.

Burnt in Marathwada, picketing | मराठवाड्यात जाळपोळ, दगडफेक

मराठवाड्यात जाळपोळ, दगडफेक

Next

औरंगाबाद : आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि कायगाव येथे नदी उडी मारल्यानंतर मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला मंगळवारी मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही हिंसक वळण लागले. घनसावंगीत पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी गोळीबार केला. सहा ठिकाणी कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आंदोलनावेळी एका पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. विभागात अनेक ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन झाले.
बीड जिल्ह्यात आंदोलकांवरील दगडफेकीत चौघे जखमी झाले. गेवराईत सोमवारी रात्री माजलगाव- पुणे बसवर दगडफेक झाली. हिंगोलीत बंदला हिंसाचाराचे गालबोट लागले. हिंगोली, वसमत येथे बसवर दगडफेक झाली. खानापूर चित्ता येथे जमावाने पोलिसांची जीप जाळली. वसमत येथे दगडफेकीत पोलीस उपअधीक्षक शशीकिरण काशिद जखमी झाले.
परभणी जिल्ह्यात ४ आगारातील १८०० बस फेºया रद्द झाल्या. परभणीत आझम चौक येथे दोन गट समोरासमोर आले. पोलीस तातडीने तेथे दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. लातूरला शाळा, महाविद्यालयांसह बाजारपेठा आणि बस सेवा बंद होती. उस्मानाबादला उमरगा येथे मुंबई- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

नांदेडला लाठीमार
नांदेडला आंदोलक व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली़ पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला़ आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या वाहनांचे नुकसान झाले़ पोलिसांच्या लाठीमारात सहा ते सात कार्यकर्ते जखमी झाले़ दगडफेकीत पोलीस कर्मचारी गणेश मिटके गंभीर जखमी झाले़ मुखेडमध्ये दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली़
औरंगाबादमध्ये बाजारपेठा बंद होत्या. पैठणगेट ते नूतन कॉलनी येथे किरकोळ दगडफेक झाली.

गोदावरीत आंदोलनाचा प्रयत्न
औरंगाबादच्या घटनेनंतर नाशिकमध्येही विलास कदम या तरुणाने गोदावरीच्या प्रवाहात उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी धाव घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढले.

खान्देशात बंद शांततेत
जळगाव, धुळे जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने, ठिय्या आंदोलने झाली. धुळे-औरंगाबाद थेट बस सेवा पोलिसांच्या सूचनेनुसार चाळीसगावपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात रास्ता रोको
कोल्हापुरला मोटारसायकल रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने झाली. सकल मराठा समाजाच्या सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शहरात मोटारसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सांगली दौºयावर असलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वाहनांचा ताफा कवठेमहांकाळ येथे अडविण्यात आला होता. साताºयात आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली.

विदर्भातही ठिय्या
नागपुरला महाल, रेशीमबाग, सक्करदरा परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. विदर्भात काही ठिय्या आंदोलन झाले. मुख्यमंत्र्यांविरुद्ध अमरावतीमधील कोतवाली ठाण्यात सामूहिक तक्रार करण्यात आली.

Web Title: Burnt in Marathwada, picketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.