आमदारांची ‘पळवापळवी’! भाजप म्हणतो, २५ आमदार संपर्कात; सेना म्हणते ५० आमदार संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 09:57 AM2022-03-20T09:57:56+5:302022-03-20T09:59:16+5:30

एकमेकांच्या आमदारांवरून भाजप, शिवसेनेचे दावे-प्रतिदावे

bjp shiv sena claims they are touch with upset mlas of each other | आमदारांची ‘पळवापळवी’! भाजप म्हणतो, २५ आमदार संपर्कात; सेना म्हणते ५० आमदार संपर्कात

आमदारांची ‘पळवापळवी’! भाजप म्हणतो, २५ आमदार संपर्कात; सेना म्हणते ५० आमदार संपर्कात

Next

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येईल, असे म्हटले जात असतानाच भाजप आणि शिवसेनेने एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचे दावे-प्रतिदावे केले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला, तर या उलट भाजपचेच ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा प्रतिदावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला. 

महाविकास आघाडीचे बरेच आमदार सरकारवर तीव्र नाराज आहेत आणि २५ आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे २५ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालणार होते; पण त्यांची समजूत काढली गेली, असा दावा मंत्री दानवे यांनी जालन्यात केला. दानवे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, दानवे यांनी हा दावा कोणत्या नशेत केला, हे मला माहिती नाही. कदाचित आघाडीचे १७५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांना म्हणायचे असेल. संपर्कात आहेत तर घ्या ना, थांबलाय कशासाठी? असा सवालही त्यांनी केला. भाजपचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले.

आमदार फुटल्यास विधानसभेत दिसणार नाही - जयंत पाटील
आमचे आमदार फुटणार नाहीत. जर कुणी फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. लोकच त्यांना सळो की पळो करून सोडतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्या आमदाराविरोधात लढू आणि त्याचा पराभव करू,  अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना इशारा दिला आहे. 

अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून भाजपच्या आमदारांनाही मोठा निधी दिला आहे. फडणवीसांच्या काळातही एवढा निधी मिळाला नसल्याचे भाजपचे आमदार आम्हाला सांगतात. भाजपचे आमदार आमच्या सरकारवर खुश आहेत, असा दावाही त्यांनी केला.

कराड पुड्या सोडतात- अब्दुल सत्तार 
केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनीही महाविकास आघाडीतील आमदार नाराज असल्याचे वक्तव्य करीत या नाराज आमदारांनी भाजपमध्ये यावे, अशी ऑफर दिली. त्यावर राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी निशाणा साधला. कराड हे पुड्या सोडण्याचे काम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. नाराज वगैरे कोणीही नाही, असे सत्तार म्हणाले.

Web Title: bjp shiv sena claims they are touch with upset mlas of each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.