भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही

By यदू जोशी | Published: March 7, 2024 07:19 AM2024-03-07T07:19:51+5:302024-03-07T07:21:27+5:30

शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल. 

BJP list of 35; 9 to Shinde's Shiv Sena, 4 to NCP; Eknath Shinde, Ajit Pawar insist to increase share | भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही

भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत दोन दिवस केलेल्या चर्चेत भाजपकडून महाराष्ट्रात शिवसेनेला ९ आणि राष्ट्रवादीला ४ जागांची ऑफर दिली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजपने स्वत:ची  ३५ उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र, आपापल्या जागा वाढवून घेण्यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल. 

२२ जागा मागणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि १६ जागांची मागणी करणारी राष्ट्रवादी यांना एवढ्या जागांचा आग्रह शाह यांच्याशी चर्चेत सोडावा लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. माझ्यासोबत असलेल्या १३ खासदारांचे मतदारसंघ माझ्या पक्षाकडेच राहिले पाहिजेत, असा आग्रह शिंदे यांनी धरला. त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्याचवेळी किमान सहा जागा मिळाव्यात, असे राष्ट्रवादीचे म्हणणे असले तरी ते मान्य होण्याची शक्यता नाही.

मीनल खतगावकर, धरती देवरे चर्चेत; महिलांचा टक्का वाढणार 
- भाजपकडून राज्यात महिलांना जादा संधी दिली जाऊ शकते. पंकजा मुंडे (बीड), नवनीत राणा (अमरावती), डॉ. हीना गावित (नंदुरबार) यांची उमेदवारी पक्की मानली जात असतानाच आता डॉ. मीनल खतगावकर (नांदेड), स्मिता वाघ (जळगाव) आणि धरती देवरे (धुळे) ही नावेही उमेदवारीबाबत आघाडीवर आहेत. 

- रक्षा खडसे (रावेर), पूनम महाजन (उत्तर-मध्य मुंबई), डॉ. भारती पवार (दिंडोरी) यांच्याबाबत भाजपश्रेष्ठी काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता आहे. धरती देवरे या धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असून, गुजरात भाजपचे अध्यक्ष खा. सी. आर. पाटील यांच्या कन्या आहेत. 

‘विधानसभेला योग्य वाटा देऊ’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात गेल्या दोन दिवसात मुंबईत तीन बैठका घेतल्या. त्यांनी मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बुधवारी सकाळी पुन्हा याच नेत्यांसोबत चर्चा केली. 

दुपारी त्यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. ‘लोकसभेला आम्हाला साथ द्या, विधानसभेला तुम्हाला योग्य वाटा देऊ,’ असे आवाहन शाह यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना केले. फडणवीस आणि बावनकुळे दुपारनंतर दिल्लीला रवाना झाले. 

भाजपच्या यादीत १० ते १२ नवीन चेहरे?
भाजपच्या यादीत दहा ते बारा नवीन चेहरे असल्याची माहिती आहे. काही दिग्गजांना धक्के बसू शकतात. पक्षातर्फे करण्यात आलेली सर्वेक्षणे, उमेदवाराची कामगिरी, जातीय संतुलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेचा फीडबॅक व जिंकून येण्याची क्षमता या निकषांवर उमेदवारी देण्याचे ठरले आहे. तसेच, व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट धरू नका, असे अमित शाह यांनी मंगळवारी रात्रीच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते. भाजपने जास्त जागांसाठी दबाव वाढविला असताना एकनाथ शिंदे व अजित पवार किती जागा खेचून आणतील याबाबत उत्सुकता आहे. आम्ही नऊ जागा स्वीकारणे कदापि शक्य नाही असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलारही मैदानात? 
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा मतदार संघातून लढविले जाण्याची दाट शक्यता आहे. बावनकुळे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना उत्तर-मध्य किंवा उत्तर-पश्चिम या दोनपैकी एका जागेवर लढविले जाऊ शकते. 

- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले पण नंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून लढतील हे जवळपास निश्चित मानले जाते. 

- राष्ट्रवादीला बारामती, रायगड, मावळ किंवा शिरूर आणि भंडारा-गोंदिया किंवा गडचिरोली यापैकी एक अशा जागा देऊ करण्यात आल्याचे कळते. शिवसेनेचे दोन ते तीन खासदार हे भाजपच्या चिन्हावर लढू शकतात.

महायुतीच्या जागा वाटपाबाबत जे आकडे माध्यमांमधून येत आहेत त्यात तथ्य नाही.मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील.लवकरच निर्णय होईल. जिथे भाजप एकट्याने लढतो अशा राज्यांमधील उमेदवार पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आले.जेथे युती आहे अशा राज्यांचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येतील.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
 

Web Title: BJP list of 35; 9 to Shinde's Shiv Sena, 4 to NCP; Eknath Shinde, Ajit Pawar insist to increase share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.