बंधारा फुटला: गावकरी तीन तास छतावर

By Admin | Published: September 27, 2016 07:56 PM2016-09-27T19:56:37+5:302016-09-27T19:56:37+5:30

इमामपूर येथील बंधारा फुटल्याने मंगळवारी सायंकाळी वांगी, शिवणी या गावांमध्ये पाणी शिरले.

Bandra Cold: Villagers on the roof for three hours | बंधारा फुटला: गावकरी तीन तास छतावर

बंधारा फुटला: गावकरी तीन तास छतावर

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

बीड, दि. 27 - मुसळधार पावसानंतर ओव्हरफ्लो झालेला तालुक्यातील इमामपूर येथील बंधारा फुटल्याने मंगळवारी सायंकाळी वांगी, शिवणी या गावांमध्ये पाणी शिरले. तब्बल तीन तास दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. जीव मुठीत धरुन दोन्ही गावचे लोक मुलाबाळांसह घरांच्या छतावर जाऊन बसले होते. याचवेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात भरच पडली. सायंकाळी सात वाजेनंतर पूरस्थिती नियंत्रणात आली असून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

बीडपासून २० किमी अंतरावर असलेल्या इमामपूर या डोंगरपट्ट्यातील गावाजवळ १५ वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा तलाव सततच्या दुष्काळामुळे तीन वर्षे कोरडाठाक होता. यंदा मुसळधार पावसाने तो भरून वाहू लागला. दरम्यान, सायंकाळी साडेचार वाजता बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यातून धो- धो पाणी बाहेर पडू लागले. बंधारा फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. इमामपुर येथील टुकूर नदीपात्राने अल्पावधीत रौद्ररुप धारण केले. नदीतून पाणी वांगी, शिवणी या गावांकडे वेगाने झेपावू लागले. इमामपूर येथेही यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. इमामपूर हे उंचीवर वसलेले असून वांगी, शिवणी ही गावे पायथ्याला आहेत. त्यामुळे इमामपूरपेक्षा या दोन गावांना मोठे नुकसान सहन करावे लागले.  टुकूर नदी या दोन्ही गावांमधून गेलेली आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की, पाणी नदीपात्र सोडून जमिनींतून वाहू लागले. एवढ्यात पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्यात पावसाच्या पाण्याची भर पडली. २३०० लोकसंख्या वांगी येथे जि.प. शाळेच्या जवळून पाणी थेट गावात आले. त्यानंतर गावकरी धास्तावले. अनेकांनी भीतीने आपल्या कुटुंबियांसह घराच्या छतावर जाऊन बसणे पसंद केले, तर काही जण झाडावर बसले होते. गावात चोहीकडे पाण्याचा वेढा पडला होता. नदीपात्राजवळील जमिनींतून पाणी वाहिले. बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसोबत जमीनही वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. 

शिवणीतही याहून वेगळी स्थिती नव्हती. तेथेही संपूर्ण गावाला पाण्याने वेढले होते. शिवणीची लोकसंख्या १७०० असून या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीही पाण्यासोबत वाहून गेल्या. गावातील जि.प. शाळेपर्यंत पाण्याचा लोंढा आला होता. विजय सुपेकर, बाळासाहेब डोळस, गणेश शिंदे, अशोक शिंदे, जीवन शिंदे आदींनी गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी  उंचावर असलेल्या घरांमध्ये हलवले. 

Web Title: Bandra Cold: Villagers on the roof for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.