"मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाची दिशा बदलली तर..."; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 02:15 PM2024-02-26T14:15:50+5:302024-02-26T14:31:33+5:30

बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे.

Bachchu Kadu reaction over manoj jarange patil maratha reservation | "मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाची दिशा बदलली तर..."; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

"मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाची दिशा बदलली तर..."; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर उत्तर दिलं. यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या दोन तासांत पुढील निर्णय घेणार असून फडणवीस यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असं म्हटलं आहे. 

बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे. तसेच आंदोलनाला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं यासाठी काही लोक तसं करत आहेत. पण त्याला आपण बळी पडू नये असंही म्हटलं आहे. "मनोज जरांगे-पाटील यांनी मेहनत घेतली आहे. प्रामाणिकपणे आंदोलन सुरू केलं आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आंदोलनाला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं यासाठी काही लोक तसं करत आहेत. पण त्याला आपण बळी पडू नये."

"एका व्यक्तीवर आरोप करून आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल. आम्ही सोबत आहोत. पण त्यांनी एकदम एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. याला वेगळं वळण लागावं यासाठी काही शक्ती काम करत आहेत. त्या शक्तींना बळी पडू नये. घेतलेली टोकाची भूमिका जरांगे पाटील यांनी थांबवावी. बारसकर आणि प्रहारचा विषय संपलेला आहे" असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

जनता कामं केल्यावर आदर देते. देवेंद्र फडणवीसांनी असले धंदे बंद करावेत. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही. देवेंद्र फडणवीसांना आता हरवायचे आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. राज्यासह देशात त्यांना अडचणीत आणू. जनतेचा अंत पाहू नये. संचारबंदी लावून सरकार चालवण्यात कसली मर्दानगी आहे, असा सवाल करत, त्यांच्यात दम नाही, ते पोलिसांच्या आडूनच कामे करणार, असे अनेक गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केले. त्यानंतर अंतरवाली सराटीत परतण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. तसेच तिथे जाऊन एक बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असंही स्पष्ट केलं आहे. आंदोलकांनी शांत राहावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
 

Web Title: Bachchu Kadu reaction over manoj jarange patil maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.