ठाण्यात ‘एटीएस’चे स्वतंत्र युनिट

By Admin | Published: October 31, 2016 06:01 AM2016-10-31T06:01:10+5:302016-10-31T06:54:34+5:30

संशयास्पद व्यक्तींच्या वाढत्या वावराच्या शक्यतेमुळे, राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी आता या भागातील सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता बाळगण्याचा निर्णय घेतला

ATS's independent unit in Thane | ठाण्यात ‘एटीएस’चे स्वतंत्र युनिट

ठाण्यात ‘एटीएस’चे स्वतंत्र युनिट

googlenewsNext

जमीर काझी,

मुंबई- मुंबईबरोबरच ठाणे व कोकण किनारपट्टीच्या गावात अतिरेकी, संशयास्पद व्यक्तींच्या वाढत्या वावराच्या शक्यतेमुळे, राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी आता या भागातील सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मंजूर मनुष्यबळातून स्वतंत्र युनिट कार्यरत केले जाणार आहे. दोन पोलीस निरीक्षकांसह ३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या ठिकाणी नेमला जाणार आहे.
सहा महिन्यांपूर्वी एटीएसने पाठविलेल्या या प्रस्तावाला गृहविभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे आता स्थानिक ठाणे आयुक्तालय व ग्रामीण भागातील पोलिसांवर पडणारा ताण कमी होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबरोबरच ठाणे व कोकणाला मोठी सागरी किनारपट्टी लाभली आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी परप्रांतीय, बाहेरच्या मंडळींचा वावर वाढल्याने, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.
ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालये, कोकण परिक्षेत्र परिमंडळांतर्गत रायगड, ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यात दहशतवादी संघटनांचे हस्तक, दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालणे, देशविघातक कृत्यांना लगाम घालण्यासाठी एटीएसचे एक पथक सात वर्षांपासून कार्यरत आहे. या कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे ठाणे आयुक्तालय व ठाणे ग्रामीण अधीक्षक यांच्याकडील उपलब्ध मनुष्यबळापासून तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत होते.
मात्र, या भागातील अतिरेकी संघटनांचा वाढता वावर पाहता, एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ठाण्यात एटीएसच्या मुख्यालयात मंजूर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची काही पदे त्या ठिकाणी स्थलांतरित करून, स्वतंत्र युनिट सुरू करण्याचा प्रस्ताव २३ मार्चला तयार
केला होता. पोलीस महासंचालकांकडून २४ मे रोजी तो गृहविभागाकडे पाठविण्यात आला. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. आता या ठिकाणी स्थानिक पोलिसांऐवजी एटीएसकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
>सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
गेल्या महिन्यात उरण येथे पाच अतिरेकी घुसल्याच्या अफवेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती, तर तीन दिवसांपूर्वी पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत. त्यामुळे या भागातील सुरक्षेबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे एटीएसचे स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
३८ कर्मचाऱ्यांचा ताफा
ठाण्यातील एटीएस युनिटसाठी दोन निरीक्षक, ४ सहायक निरीक्षक, ६ उपनिरीक्षक,४ एएसआय व हवालदार आणि २२ नाईक व कॉन्स्टेबल असे एकूण ३८ अधिकारी-कर्मचारी पूर्ण वेळ कार्यरत राहतील, त्यांच्यावर सहायक आयुक्त, उपायुक्त, तसेच मुंबई एटीएस मुख्यालयातून विशेष महानिरीक्षक यांचे नियंत्रण असेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ही ठिकाणे संवेदनशील
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, पडघा, कल्याण आदी ठिकाणी परप्रांतीयांचा वावर वाढला आहे. त्यामुळे ही संवेदनशील ठिकाणे बनलेली आहेत. त्यामुळे या भागात व सागरी किनाऱ्यावर अतिरेकी संघटनांचे हस्तक, त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून, राज्य पोलीस व एटीएसला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: ATS's independent unit in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.