वाळूमाफियांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपला चाप

By admin | Published: March 6, 2016 01:15 AM2016-03-06T01:15:43+5:302016-03-06T01:15:43+5:30

महसूल विभागाची कारवाई चुकविण्यासाठी अनधिकृत वाळू वाहतूकदार सोशल मीडियावरील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व माहिती आपल्या साथीदारांना कळवत असल्याने बोटांवर मोजण्याइतक्या

Arc of Woolmafia's What's App Group | वाळूमाफियांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपला चाप

वाळूमाफियांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपला चाप

Next

लोणी काळभोर : महसूल विभागाची कारवाई चुकविण्यासाठी अनधिकृत वाळू वाहतूकदार सोशल मीडियावरील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व माहिती आपल्या साथीदारांना कळवत असल्याने बोटांवर मोजण्याइतक्या वाहनांवर कारवाई होते. यामुळे सरकारी कारवाईची गोपनीय माहिती उघड होत असल्याने या असंख्य अवैध ग्रुपवर सायबर क्राइमअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे फर्मान हवेली तहसीलदार कार्यालयातून पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
हवेली तालुक्याच्या कार्यक्षेत्रात अनेकदा तालुका महसूल विभाग अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूकदारांवर धडक कारवाई करतो. याप्रसंगी वेळोवेळी पोलिसांचीही मदत घेतली जाते; मात्र प्रमुख रस्त्यावर कारवाई सुरू करण्यात आली, की फक्त तीन ते चार वाहने संबंधित विभागाच्या हाती सापडतात. त्यानंतर ही वाहतूक ठप्प होते, कारण कारवाईची माहिती इतर वाहनचालकांना तत्काळ मिळत असल्याने कारवाईप्रसंगी इतर अनधिकृत वाहने मुख्य रस्त्यावर येत नाहीत. यामुळे महसूल विभागही चक्रावून गेला आहे. कारवाईची माहिती ताबडतोब अवैध वाहतूकदारांना मिळत असल्याने पोलीस व महसूल विभाग एकमेकांकडे संशयी नजरेने पाहू लागले आहेत.
हवेली तालुक्याचे तहसीलदार दशरथ काळे यांना नुकताच याचा अनुभव आला होता. सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणे कायद्याने गुन्हा असतानाही रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक सुरू असते. याविषयी अनेक तक्रारी आल्याने वरिष्ठ कार्यालयातील आदेशानुसार हवेलीचे तहसीलदार दशरथ काळे, महसूल नायब तहसीलदार समीर यादव, हडपसरचे मंडलाधिकारी संतोष सोनवणे, थेऊरचे मंडलाधिकारी हरिदास चाटे यांनी महसूल पथकाच्या व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या मदतीने २३ अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती. मात्र, लोणी काळभोर येथील एका पेट्रोलपंपाच्या मालकीच्या जागेतील १० अवैध वाहने महसूल अधिकारी रात्री उशिरा परत गेल्याने गायब झाली होती. वाहने गायब झाल्याची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी समजताच संबंधित विभागांमध्ये संशयाचे वातावरण होते. वाहने गायब होण्यास व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप कारणीभूत मानला जात आहे.

महसूल विभागाकडून होणाऱ्या कारवाईची माहिती, कारवाईप्रसंगी उपस्थित असलेले अधिकारी, अधिकाऱ्यांकडे ‘महाराष्ट्र शासन’ नावाची पांढऱ्या रंगाची गाडी, त्या गाडीचा क्रमांक व सद्य:स्थितीत त्यांचे असलेले गाडीचे ठिकाण व कोणकोणते अधिकारी आहेत अशी सर्व माहिती अनधिकृत गौणखनिज वाहतूकदारांना तत्काळ मिळत असल्यामुळे हवेलीचे तहसीलदार दशरथ काळे हेही चक्रावून गेले आहेत. त्यांनी सखोल माहिती घेऊन वाळूवाहतूकदारांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा छडा लावला आहे. कारवाई करताना हेच ग्रुप अडथळा ठरत आहेत, हे लक्षात आल्यानंतर तहसीलदारांनी या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
हवेली तालुक्यातील सर्व मंडलाधिकाऱ्यांनी अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूकदारांवरील कारवाईप्रसंगी सरकारी कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या व सरकारी गोपनीय माहिती उघड होत आहे, हे सिद्ध झाल्याने सायबर क्राइम अंतर्गत संबंधित अवैध व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर कारवाई करण्याकामी पोलीस ठाण्याला गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून, शासकीय गौणखनिजाची चोरी रोखण्याकामी योग्य त्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- दशरथ काळे, तहसीलदार, हवेली

Web Title: Arc of Woolmafia's What's App Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.