राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा; अमित शाहांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 07:50 PM2024-03-05T19:50:54+5:302024-03-05T19:53:31+5:30

-विदर्भातील सहा मतदारसंघांचा घेतला आढावा -अकोल्यात पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची आणि लोकसभा कोअर कमिटीची झाली बैठक

Amit Shah directed all party workers of BJP at Akola to win all Lok Sabha seats in Maharashtra | राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा; अमित शाहांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा; अमित शाहांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Amit Shah in Akola, Lok Sabha Elections 2024: राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सहा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या व लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत अमित शाह यांनी हे आदेश दिले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४००पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने झटून कामाला लागावे लागेल. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आणि विकासकामांच्या आधारावर मते मागायची आहेत. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी संपर्क प्रस्थापित करावा," असे अमित शाह म्हणाले.

"आपला उमेदवार विजयी होण्यासाठी प्रत्येक बूथ सशक्त करण्यासाठी आपणा सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे, असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. महायुतीचा उमेदवार हा भाजपाचाच उमेदवार आहे असे समजून एकदिलाने महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी अहोरात्र काम करा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशाच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एनडीए विजयी होणे आवश्यक असल्याचे मतदारांना पटवून दिले पाहिजे," असा सल्लाही अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निवडणूक व्यवस्थापन समिती, लोकसभा कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर या मतदारसंघांतील पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Amit Shah directed all party workers of BJP at Akola to win all Lok Sabha seats in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.