गर्भपातास परवानगी द्या!

By admin | Published: June 9, 2017 05:31 AM2017-06-09T05:31:26+5:302017-06-09T05:31:26+5:30

शेजारच्याने मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

Allow abortion! | गर्भपातास परवानगी द्या!

गर्भपातास परवानगी द्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेजारच्याने मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आठ महिने कोंडून ठेवले. पोलीस तपासास विलंब झाल्याने मुलगी गर्भवती राहिली. मात्र तोपर्यंत तिच्या गर्भारपणाला २६ आठवडे उलटून गेले होते. ससून रुग्णालयाने गर्भपातास नकार दिला. मुलीच्या जीवन जगण्याच्या अधिकारावर गदा आणली जात आहे, अशी व्यथा एका १७ वर्षीय मुलीच्या वडिलांनी याचिकेत मांडली. मुलगी मानसिकरीत्या उद्ध्वस्त झाली असून नकोसे गर्भारपण शारीरिक रीत्याही सहन करू शकत नाही. त्यामुळे तिला गर्र्भपाताची परवानगी द्यावी, अशी विनंती वडिलांनी याचिकेत केली.
पुण्यात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी या घटनेस दत्तवाडी पोलिसांनाही जबाबदार धरले आहे. पोलिसांनी वेळेवर तपास केला असता तर मुलीचा योग्य वेळी गर्भपात करता आला असता किंवा ही परिस्थिती ओढावलीच नसती. त्यामुळे मुलीच्या उपचारासाठी व तिच्या भविष्यासाठी दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंती वडिलांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १२ जून रोजी ठेवली आहे.
याचिकेनुसार, २२ आॅगस्ट २०१६ रोजी कामावरून मुलगी न परतल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. दरम्यान शेजारचा मुलगा प्रशांत सर्वदेही गायब असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. अखेर २३ एप्रिल २०१७ रोजी पोलिसांनी या दोघांना सोलापूरमधून ताब्यात घेतले.
मुलीच्या जबानीनुसार २२ अ‍ॅगस्टला प्रशांत कॉलेजमध्ये आला. वडिलांनी तत्काळ बोलावल्याचे सांगितले. शेजारीच राहणारा मुलगा असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. मुलगा तिला हडपसरला घेऊन गेला. त्यानंतर सोलापूरला घेऊन गेला. त्याने शारीरिक संबंध ठेवण्यास मुलीवर जबरदस्ती केली होती.
>लादलेले गर्भारपण
‘मी माहिती दिल्यामुळे पोलीस या दोघांना शोधू शकले. नातेवाईक आणि मित्र यांच्या मदतीने मुलीचा पत्ता शोधू शकलो. तिच्यावर जबरदस्तीने हे गर्भारपण लादण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही महिलांचा अधिकार लक्षात घेत बलात्कार पीडितांना २० आठवडे उलटल्यानंतरही गर्भपात करण्याची मुभा दिली आहे. माझ्या मुलीचा सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ठीक नाही, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

Web Title: Allow abortion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.