ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री व दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांचा विनयभंग झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मीरारोड येथील सिनेमा थिएटरमधील ही घटना आहे. शनिवारी (15 जुलै )ही घटना घडली आहे. 
 
प्रिया बेर्डे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी व त्याचे दोन मित्र मद्यधुंद अवस्थेत थिएटरमध्ये आले होते. शो सुरू झाल्यानंतर या तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी अन्य प्रेक्षकांनीही त्या तिघांना हटकलं व शांत बसण्यास सांगितले. काही वेळानं त्यातील एकानं स्पर्श केल्याचं जाणवल्यानं प्रिया बेर्डे यांनी त्याच्या थोबाडीत लगावली व आरोडाओरडा केला.  घडल्या प्रकाराला न घाबरता न गप्प बसता प्रिया यांनी त्याविरोधात आवाज उठवला. छेडछाड करण्याला चोप देऊन त्याला अद्दल घडवली.  
 
यानंतर त्या विकृतानं तेथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रिया यांनी त्याचा पाठलाग केला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या सर्व प्रकारात पोलिसांनी चांगले सहकार्य केल्याचंही सांगत प्रिया बेर्डे यांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, यावेळी प्रिया यांच्यासोबत त्यांची मुलगी होती. तिला या घटनेमुळे धक्का बसल्याचे प्रिया यांनी सांगितले.  

आणखी बातम्या वाचा
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत विकृतांचा मनस्ताप वाढताना दिसत आहे. बोरीवली, सीएसटीएम, पवईतील विकृतीच्या घटना ताज्या असतानाच, चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शनिवारी (15 जुलै ) याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या वाढत्या घटनांमुळे मुंबईतील महिला असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
 
चर्चगेट रेल्वे स्थानकात ८ जुलै रोजी एक तरुणी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर लोकलची वाट पाहत उभी होती. दरम्यान, तिथूनच एक तरुण चालत आला. तरुणीचे लक्ष लोकलकडे असल्याचे पाहून, या तरुणाने तिच्या जवळ जात तिला स्पर्श केला. तरुणी क्षणाचाही विलंब न करता, त्याच्या मागे धावत गेली आणि तिने त्याला पकडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला आरोपी काळाघोडा परिसरात बहिणीसोबत राहत होता. तो अल्पवयीन असल्याने, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
 
यापूर्वी बोरीवली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसटीएम) अशा वर्दळीच्या ठिकाणीही अशा घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे मुंबईतील महिलांमध्ये असुरक्षिततेची भीती वाढत चालली आहे. सुरक्षित मुंबई गेली कुठे, असा संतप्त सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

महाविद्यालय, रेल्वे स्थानक लक्ष्य
यापूर्वी बोरीवली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसटीएम) विकृताने महिला प्रवाशांना पाहून अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. त्या पाठोपाठ पवई महाविद्यालयाच्या आवाराबाहेर दुचाकीस्वारांनी विद्यार्थिनींसमोर विकृत कृत्य केले होते.