मराठा समाजाला मिळणार १६ टक्के स्वतंत्र आरक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:45 AM2018-11-28T05:45:40+5:302018-11-28T05:45:55+5:30

विधेयक २९ नोव्हेंबरला विधिमंडळात मांडणार

16 percent independent reservation for Maratha community | मराठा समाजाला मिळणार १६ टक्के स्वतंत्र आरक्षण !

मराठा समाजाला मिळणार १६ टक्के स्वतंत्र आरक्षण !

Next

मुंबई : मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्गात १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने जवळपास घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आरक्षणाची तरतूद असलेले विधेयक २९ नोव्हेंबरला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणावरून विरोधक राजकारण करीत असून राजकारणाला राजकारणानेच उत्तर दिले जाईल, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावले.


मराठा, धनगर आरक्षणाचा अहवाल मांडण्यावरून विरोधकांनी चालविलेल्या गोंधळातच मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणारच ही आमची कमिटमेंट आहे. विरोधकांच्या मनात मात्र काळंबेरं आहे. त्यांना समाजा-समाजात तेढ निर्माण करायची आहे. आम्ही मराठा आरक्षणाचे विधेयक तर मांडूच पण राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सरकारचा कृती अहवालही (एटीआर) आम्ही मांडू.


आज अहवालाची मागणी करीत असलेल्या विरोधकांनी आयोगाचे ५१ अहवाल आतापर्यंत सभागृहात का मांडले गेले नाहीत याचा जाब द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. एकत्रिपणे निर्णय घेऊयात. माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही समाजविघातक राजकारण करू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.


ओबीसींसह असलेल्या ५२ टक्के आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. गोवारी समाजाला ओबीसींमध्ये नाही तर स्वतंत्रपणेच आरक्षण दिले आहे. मुस्लिम समाजाकडे काँग्रेस-राष्ट्रवादी हे व्होट बँक म्हणूनच पाहत आले आहेत. सवलती आम्ही दिल्या. मुस्लिम समाजाचा एवढाच कळवळा असेल तर सच्चर, रंगनाथन समितीच्या अहवालानंतर या समाजाला तुम्ही आरक्षण का दिले नाही असा सवाल त्यांनी केला.


भाजपा-शिवसेना सदस्यांनी पुढचे तीन दिवस दोन्ही सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहावे, असा व्हिप आज काढण्यात आला.
मराठा, धनगर आरक्षणासंदर्भातील अहवाल सभागृहात मांडण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सरकारच्या मनात पाप असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. तर सरकार अहवाल मांडत का नाही, त्यात लपविण्यासारखे आहे तरी काय, असा सवाल अजित पवार यांनी केला.

शिवसेनेचा पाठिंबा
मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत सरकार आणत असलेल्या विधेयकाबाबतची माहिती त्यांनी ठाकरे यांना दिली, असे सूत्रांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. मराठा समाज बांधवांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. मराठा आरक्षण टिकणारे पक्के विधेयक बनवा. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी. इतर वर्गाला धक्का न लावता आरक्षण विधेयक आणावे तसेच धनगर आणि इतर समाजाच्या न्याय मागण्यांसाठीही केंद्राकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: 16 percent independent reservation for Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.