पावसातही उत्साह; ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात लाडक्या बप्पाला निरोप

By संदीप शिंदे | Published: September 28, 2023 09:01 PM2023-09-28T21:01:15+5:302023-09-28T21:01:51+5:30

पावसाची तमा न बाळगता गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात मिरवणूक काढून  निरोप दिला.

Enthusiasm even in the rain; Farewell to beloved Bappa in thunder and lightning | पावसातही उत्साह; ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात लाडक्या बप्पाला निरोप

पावसातही उत्साह; ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात लाडक्या बप्पाला निरोप

googlenewsNext


लातूर : शहरातील विसर्जन मिरवणुकांना गुरुवारी सकाळपासूनच सुरुवात झाली होती. मात्र दुपारी २ वाजेपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसास सुरुवात झाली. पावसाची तमा न बाळगता गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात मिरवणूक काढून  निरोप दिला.

यंदाच्या गणेशाेत्सवात सर्वत्र जल्लाेषाचे वातावरण हाेते. विविध गणेश मंडळांनी केलेल्या विधायक देखाव्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘गणपती बाप्पा माेरया...पुढच्या वर्षी लवकर या...’च्या जयघाेषाने आसमंत दणाणून गेला होता. दरम्यान, पावसातही प्रचंड उत्साहात ढाेल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढून सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘श्रीं’ना निराेप दिला. बाप्पा निघाले गावाला...चैन पडेना जिवाला...या गगनभेदी घाेषणांनी वातावरण भारावून गेले.

गुरुवारी सकाळपासूनच लातूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणच्या श्री गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या विसर्जनाची तयारी केली हाेती. सायंकाळच्या सुमारास लातुरातील विविध चार ठिकाणच्या मार्गावरून मिरवणुका काढण्यात आल्या. शहरातील मुख्य असणाऱ्या सर्व गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका काढण्याची प्रथा आहे. त्यानुसार सुभाष चाैकात प्रत्येक गणेश मंडळाचे जाेरदार स्वागत करण्यात आले. चाैकात स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या हाेत्या. दरम्यान, चाैकामध्ये विविध भागांतून येणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेनंतर पावसाने विश्रांती दिल्यानंतर पुन्हा जोमाने गणेशभक्त उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी पोलीस दलातर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध गणेश मंडळानी आपल्या गणरायाचे श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे विसर्जन करण्यासाठी आगेकूच केली.

मनपाकडून मूर्तींचे संकलन...
लातूर शहर महापालिकेच्या वतीने विविध वार्डात मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. नागरिकानीही प्रतिसाद देत आपल्या भागातील केंद्रावर गणरायाची मूर्ती प्रदान केली.

घरोघरीही विसर्जन...
शहरातील काही नागरिकांनी घरातच कृत्रिम हौद उभारून आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन केले. फुलांनी सजविलेल्या या कृत्रिम हौदात गणरायाची मूर्ती विसर्जित करून घरच्या घरीच गणरायाला निरोप दिला.

विविध देखाव्यांनी वेधले लक्ष...
पावसाचा व्यत्यय आला तरी मिरवणुकीत गणेश भक्तांचा जोश दिसला. ढोल, ताशा, लेझीम, झांज पथकासह देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. महिला-भगिनीही मोठ्या उत्साहाने अनेक मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे चित्र होते. तसेच पारंपरिक वेशभूषा,फेटा परिधान करून तरुण सहभागी झाले होते. काही मंडळांनी जनजागृती करीत सामाजिक संदेशही दिला.
 

Web Title: Enthusiasm even in the rain; Farewell to beloved Bappa in thunder and lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.