इचलकरंजी-सांगली रस्त्यावर प्रवास कोण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:18 AM2019-07-16T00:18:55+5:302019-07-16T00:48:42+5:30

पावसाळा सुरू झाल्याने रस्ता होणे शक्य नसल्याने आणखीन किती दिवस हा धोकादायक प्रवास सहन करायचा, असे म्हणत वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Who will travel to Ichalkaranji-Sangli road? | इचलकरंजी-सांगली रस्त्यावर प्रवास कोण करणार

हा काही दुर्गम ग्रामीण भागातील रस्ता नसून चक्क इचलकरंजी शहरातील मुख्य सांगली रोड आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खराब झालेला रस्ता.

googlenewsNext
ठळक मुद्देअपघात घडूनही वाहनचालक दररोजचा करतात धोकादायक प्रवास दुर्गम ग्रामीण भागातील रस्त्याप्रमाणे स्वरूप

इचलकरंजी : येथील सांगली रोडची दुरवस्था पाहता दुर्गम ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठीचा मार्ग असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. भुयारी गटार योजनेच्या खुदाईमुळे या मुख्य रस्त्याची वाताहात झाली आहे. मोटारसायकली घसरून पडणे, यासह किरकोळ अपघात नित्याचेच बनले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने रस्ता होणे शक्य नसल्याने आणखीन किती दिवस हा धोकादायक प्रवास सहन करायचा, असे म्हणत वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इचलकरंजी-सांगली-मिरज-जयसिंगपूरकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे. त्याचबरोबर या मार्गावर मोठमोठे शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालये, मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, विविध कंपनीच्या गाड्यांचे शोरूम असल्याने नेहमीच मोठी वर्दळ असते. नगरपालिकेच्यावतीने गेल्या वर्षभरापासून भुयारी गटार योजना राबविण्यासाठी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात खुदाई सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्याची चाळण होऊन पूर्ण रस्ता खराब झाला आहे. खुदाई केलेली माती रस्त्यावर पसरून निसरडे निर्माण झाल्याने अनेक वाहनधारक यावरून घसरून पडून जखमी झाले आहेत.

गेल्या पावसाळ्यामध्येही अशीच परिस्थिती कायम आहे. अनेकजण या रस्त्यावर घसरून पडत आहेत. त्याचबरोबर मोठी खुदाई केली असतानाही त्याबाबत सूचना अथवा काळजी न घेतल्याने काहीजण खड्ड्यांमध्ये जाऊन पडले आहेत. वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने केली, नगरपालिकेकडे तक्रारी केल्या, सोशल मीडियावर वारंवार टीकाही केली जाते. तरीही हे काम म्हणावे तशा गतीने पूर्ण होताना दिसत नाही.

जीव मुठीत घेऊन करावे लागणार मार्गक्रमण
पावसाळा सुरू झाल्याने नियमानुसार रस्त्याचे काम करता येणार
नाही, त्यामुळे नागरिकांना दिवाळीपर्यंत जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे. परिणामी संतप्त नागरिकांच्या तीव्र भावनांना नगरपालिकेलाही सामोरे जावे लागणार आहे.

वारंवारच्या खुदाईमुळे रस्ता कमकुवत
भुयारी गटार योजनेच्या पूर्वी पाईपलाईनसाठीही या मार्गावर खुदाई करण्यात आली होती. वारंवारच्या खुदाईमुळे हा रस्ता कमकुवत झाला असून, शासनाने नव्याने रस्ता करताना गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन चांगला दर्जेदार रस्ता करणे गरजेचे आहे.

सद्य:स्थितीत हा रस्ता म्हणजे ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाणारा किंवा पाणंद रस्ता असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. नाइलाजास्तव अनेकजण धोका पत्करून या रस्त्यावर मार्गक्रमण करीत आहेत.


 

Web Title: Who will travel to Ichalkaranji-Sangli road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.