शिवसेनेकडून विकासाचा ‘लक्ष्यभेद’ कधी? : कोल्हापूरने दिले भरभरून यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:54 AM2019-06-08T00:54:43+5:302019-06-08T00:56:54+5:30

विश्वास पाटील । विधानसभेच्या निवडणुकीत दहापैकी सहा आमदार व आता लोकसभेला दोन्ही जागांवर कोल्हापूरच्या जनतेने शिवसेनेला गुलाल लावला आहे. ...

 When was the 'target' of development from Shiv Sena? : Kolhapur has given a lot of success | शिवसेनेकडून विकासाचा ‘लक्ष्यभेद’ कधी? : कोल्हापूरने दिले भरभरून यश

शिवसेनेकडून विकासाचा ‘लक्ष्यभेद’ कधी? : कोल्हापूरने दिले भरभरून यश

Next
ठळक मुद्देविधानसभेच्या निवडणुकीत दहापैकी सहा आमदार व आता लोकसभेला दोन्ही जागांवर कोल्हापूरच्या जनतेने शिवसेनेला गुलाल लावला आहे. कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा, असे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्याची पूर्तता कोल्हापूरच्या जनतेने कप्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेची ताकद खर्च करण्याची गरज

विश्वास पाटील ।

विधानसभेच्या निवडणुकीत दहापैकी सहा आमदार व आता लोकसभेला दोन्ही जागांवर कोल्हापूरच्या जनतेने शिवसेनेला गुलाल लावला आहे. कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा, असे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्याची पूर्तता कोल्हापूरच्या जनतेने केली आहे. आता कोल्हापूरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी शिवसेनेवर आहे. तुमची स्वप्नपूर्ती झाली. आता या जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना किती ताकद लावणार, याकडे जनता डोळे लावून बसली आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर हा कोणत्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा विरोधकांचा जिल्हा असे म्हटले जाते. परंतु तरीही अनेक वर्षे या जिल्ह्याच्या राजकारणावर काँग्रेसचा व त्यानंतर १०-१५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिला. दोन्ही काँग्रेसच्या विरोधातील शेकापसह अन्य डावे निस्तेज झाल्यानंतर त्याची जागा भाजप-शिवसेनेने घेतली आहे. कोल्हापूरची ओळख महाराष्ट्रात ‘पुरोगामी विचारांचा जिल्हा’ अशीच आहे; परंतु तरीही या जिल्ह्याने शिवसेनेच्या विचारालाही बळ दिले आहे. कोल्हापूर शहरात गेली पंचवीस वर्षे एक अपवाद वगळता शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला दहांपैकी सहा जागा मिळाल्या; परंतु शिवसेना सत्तेत राहून विरोधकांसारखी वागत असल्याने राज्यातील सत्तेचा लाभ कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी फारसा झाला नाही. भाजप-शिवसेनेच्या सरकारने महत्त्वाचा टोलचा प्रश्न मार्गी लावला; परंतु त्यामागे कोल्हापूरच्या जनतेने केलेला उठाव महत्त्वाचा होता. दिलेत ना एकदा ५०० कोटी; आता पुन्हा काय मागू नका, असाच या सरकारचा दृष्टिकोन राहिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला, त्याला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द दिला आहे; परंतु आतापर्यंतचा गेल्या साडेचार वर्षांतील शिवसेनेचा सत्तेतील भागीदार पक्ष म्हणून अनुभव विश्वासाला तडा जाणाराच आहे. शिवसेना अजूनही सत्ताधारी कमी व विरोधकांचेच काम जास्त करते. सत्ता तुमच्याकडे असल्याने प्रश्न सोडविण्याऐवजी संघटना वारंवार मोर्चे काढून रस्त्यावर येत असल्याचे चित्र दिसते. संघटना एकीकडे व सत्ता दुसरीकडे अशी विभागणी झाली आहे. कोल्हापूरच्या प्राधिकरणाचे घोंगडे भिजत पडले आहे. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कागदावरच आहे. जिल्हा रुग्णालय म्हणून ‘सीपीआर’च्या अडचणीही अनेक आहेत. आता शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५० जागा कमी झाल्या आहेत. स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्यामुळे हे कॉलेज झाले. त्याला आता तब्बल १८ वर्षे झाली; त्यामुळे तिथे पदव्युत्तर शिक्षणाची सोय व्हायला हवी होती. ती राहिली बाजूलाच; प्रवेशाच्या आहे त्या जागांनाच कात्री लागली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळे कोल्हापुरात १९३९ साली विमानसेवा सुरू झाली. तिला आज तब्बल ८० वर्षे झाली तरी कोल्हापूर-मुंबई पूर्णवेळ नियमित विमानसेवा अजून आपल्याला सुरू करता आलेली नाही; पण या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला कधी फटकारलेले नाही. खंडपीठ लगेच शक्य नाही; त्यामुळे सुरुवातीला सर्किट बेंचला परवानगी द्या, असा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी राज्य शासनाकडून एका ओळीचे पत्र मिळायलाही दोन-चार वर्षे खर्ची पडली. आता सरकारने पत्र पाठवून हात वर केले आहेत; परंतु हा विषय फक्त पत्र पाठविण्याने सुटण्यासारखा नाही. राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडे तसा आग्रह धरायला हवा. कोल्हापूर-कोकण रेल्वेला वैभववाडी येथे जोडण्याचा प्रश्नही लोंबकळत पडला आहे. त्याचे हजार सर्व्हे झाले, बजेट तरतूदही झाली; परंतु तरीही प्रत्यक्ष काम कागदावरून पुढे गेलेले नाही. या प्रश्नातही शिवसेना बरेच काही करू शकते. उद्धव ठाकरे हे प्रत्येक निवडणुकीत कोल्हापूरच्या अंबाबाईला विजयाचे साकडे घालायला येतात. म्हणजे साकडे घालायला अंबाबाई; परंतु कोल्हापूरचे प्रश्न सोडविताना मात्र सोयीस्कर विसर, असाच अनुभव आजपर्यंतचा आहे. दोन्ही काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारांना पराभूत करून जिल्ह्यातील जनतेने तुमच्या पक्षाचे सहा आमदार निवडून दिले; परंतु तरीही या जिल्ह्याला तुम्हांला दात टोकरून साधे एक राज्यमंत्रिपद देता आलेले नाही. या सहा आमदारांनीही एकीची मूठ आवळून कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी आवाज उठविल्याचा अनुभव नाही. या जिल्ह्यातील सहा-सात पाटबंधारे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. मागच्या पाच वर्षांत त्याच्या फक्त ‘सुप्रमा’चे जीआर निघण्याव्यतिरिक्त काहीही झालेले नाही. शिवसेनेकडे उद्योग मंत्रालय आहे; परंतु मंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापूरच्या उद्योजकांचा एकही प्रश्न सोडविलेला नाही. युतीच्या १९९५ च्या काळात नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यावेळी उद्योजक मोहन मुल्हेरकर यांच्या पुढाकाराने कोल्हापूरच्या उद्योगाचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक झाली होती. त्यावेळचे प्रश्न आजही तसेच आहेत. पंचगंगा प्रदूषणाचाही अनुभव त्याहून वेदनादायी आहे. प्रदूषण झाले म्हणून पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घाण पाणी पाजतात व अंगावर केंदाळ टाकतात; परंतु गंमत म्हणजे पर्यावरण मंत्री शिवसेनेचेच रामदास कदम आहेत. प्रदूषणमुक्तीसाठी अनेक आराखडे सादर झाले; परंतु त्याला रुपयाचाही निधी मंजूर झालेला नाही. अशा प्रश्नांची जंत्री वाढतच आहे. कोल्हापूरचा माणूस हा जागरूक आहे. त्यामुळे चांगले पाठबळ देऊनही शिवसेनेने या जिल्ह्याच्या विकासासाठी काही केले नाही, तर तो त्यांना उचलून खाली आदळायला मागे-पुढे पाहणार नाही. हा येथील इतिहास आहे.

‘राष्ट्रवादी’चाही अनुभव वेदनादायीच
कोल्हापूरने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापनेनंतर सर्वाधिक बळ दिले. म्हणजे पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या स्वत:च्या पुणे जिल्ह्यातही जेवढी सत्ता नव्हती तेवढी कोल्हापूरने या पक्षाला दिली. या पक्षाचा केंद्रात पाच वर्षे पूर्ण वेळ नागरी उड्डाणमंत्री होता. पवार यांनी एक शब्द टाकला असता तरी कोल्हापूरचा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याइतपत विकसित झाला असता; परंतु ते घडले नाही. थेट पाईपलाईनच्या प्रश्न असो की टोलचे आंदोलन; त्यामध्ये राष्ट्रवादी सत्तेत असतानाही त्यांनी काही केले नाही. त्याची शिक्षा जनतेने त्यांना दिली आहे. न्यायसंकुलाची देखणी इमारत हीच दोन्ही काँग्रेसच्या सत्ताकाळातील महत्त्वाची उपलब्धी म्हणता येईल.


कोल्हापूरच्या प्रश्नांची जंत्री
अंबाबाई मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अद्याप कागदावरच आहे.
‘सीपीआर’च्या अडचणीही अनेक; वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५० जागा कमी झाल्या.
कोल्हापूर-मुंबई पूर्णवेळ नियमित विमानसेवा अजून आपल्याला सुरू करता आलेली नाही.
सर्किट बेंचबाबत सरकारने पत्र पाठवून हात वर केले आहेत. तो अद्यापही लोंबकळतच.
कोल्हापूर-कोकण रेल्वेला वैभववाडी येथे जोडण्याचा प्रश्नही कागदावरच आहे.
जिल्ह्यातील सहा-सात पाटबंधारे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.
पंचगंगा प्रदूषणाचा अनुभवही कोल्हापूरकरांना वेदनादायी आहे.
मंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापूरच्या उद्योजकांचा एकही प्रश्न सोडविलेला नाही.


कोल्हापुरात गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशाबद्दल अंबाबाईचे सपत्नीक दर्शन घेतले. या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ तपोवन मैदानावर झाला तेव्हाही ते कोल्हापूरकरांसमोर असेच नतमस्तक झाले होते. कोल्हापूरने त्यांचे नवस पूर्ण केले, आता शिवसेना कोल्हापूरसाठी काय करते, हीच उत्सुकता..!!

Web Title:  When was the 'target' of development from Shiv Sena? : Kolhapur has given a lot of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.