Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा खरी कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 01:59 PM2023-11-28T13:59:26+5:302023-11-28T14:02:13+5:30

शहर व जिल्हा नागरी कृती समितीची विचारणा : मुख्यमंत्र्यांना पाठविले ई-मेलद्वारे पत्र

What is the real Maharashtra Kesari wrestling tournament?, Kolhapur City and District Civic Action Committee sent a letter to the Chief Minister and asked | Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा खरी कोणती?

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा खरी कोणती?

कोल्हापूर : गेली ७० वर्षे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कुस्ती अधिवेशन व महाराष्ट्र केसरी किताबाचे आयोजन करते. दोन संघटनांतील वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. यातील खरी कोणती? हे शासनाने जाहीर करावे, असे पत्र कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून विचारणा केली आहे.

महाराष्ट्र केसरी किताबाला फार मोठा सन्मान आहे. कुस्ती संघटक स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या नावाने मानाची चांंदीची गदा विजेत्याला दिली जाते. येथे पैशाचे मोल नसते. याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेला शासनाची मान्यता आहे. विजेत्याला शासकीय मानधन, बक्षिसे, शासकीय सोयी-सवलती, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सदस्य येथे उपस्थित राहून विजेत्याचा सन्मान करतात. अलीकडे दोन संघटनांतील वादामुळे या स्पर्धेला वादाची झालर लागली आहे. खरे पाहता पुणे जिल्हा संघटनेतील वाद आहे. त्याचा फटका राज्यातील कुस्तीगीरांना बसत आहे. 

वर्षानुवर्षे अनेक मल्ल जीवापार कष्ट घेऊन सराव करतात. या वादामुळे कुस्ती वेठीस धरली जात आहे. वर्षात दोन-दोन किंवा तीनही महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धा झाल्या आहेत. त्यामुळे नवोदितांचे नुकसान होत आहे. कोणती स्पर्धा अधिकृत समजायची? असा संभ्रम मल्लांच्या मनात निर्माण झाला आहे.

राज्य शासन कोणत्या स्पर्धेला मान्यता व विजेत्यांना सवलती देणार, हे जाहीर करावे. यासह पुढील वर्षी कोणती स्पर्धा अधिकृत असणार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करावे. असे ई-मेलद्वारे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, राजाभाऊ मालेकर, विनोद डुणुंग, सदानंद सुर्वे, लहुजी शिंदे, महादेव जाधव, अजित सासने, प्रकाश आमते, राजाराम कांबळे, महेश जाधव, रमेश पोवार, महादेव पाटील, चंद्रकांत पाटील, फिरोज खान, संतोष जोगदंडे यांनी विचारले आहे.

Web Title: What is the real Maharashtra Kesari wrestling tournament?, Kolhapur City and District Civic Action Committee sent a letter to the Chief Minister and asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.