जी. कांबळेंना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू : जयश्री जाधव

By संदीप आडनाईक | Published: January 7, 2024 08:05 PM2024-01-07T20:05:40+5:302024-01-07T20:08:40+5:30

शोभा शिराळकर, अशोक वाडकर, कुलदीप यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

We will try to get Maharashtra Bhushan posthumously to G Kamble says Jayashree Jadhav | जी. कांबळेंना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू : जयश्री जाधव

जी. कांबळेंना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू : जयश्री जाधव

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार यापूर्वीच मिळायला हवा होता. त्यांच्यासारख्या कलाकाराला मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार जयश्री जाधव यांनी दिली.

कलायोगी जी. कांबळे ट्रस्टतर्फे दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार मिरजकर तिकटी येथील सार्वजनिक आर्ट गॅलरीतील समारंभात पार पडला. यावेळी जाधव बोलत होत्या.

अनेक वर्षे चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका गाजवणाऱ्या जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शोभा शिराळकर, कवी, लेखक आणि गायक अशोक वाडकर (पोवार) आणि जुन्या जमान्यातील चित्रपटाचे पोस्टर्स करून जी. कांबळे यांच्या हाताखाली काम करणारे लेटरिंग आर्टिस्ट, कलाशिक्षक, कार्टून, व्यंगचित्रकार आर. एस. कुलदीप यांना आमदार जाधव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, कलायोगीची ट्रॉफी आणि मानपत्र, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. समारंभानंतर गायक प्रमोद कोरडे यांनी जी. कांबळे यांनी पोस्टर काढलेल्या जुन्या गाजलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील आणि मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. समारंभाला ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम जी. कांबळे, उपाध्यक्ष एम. जी. वलिखिंडी, सचिव अशोक कांबळे, दिग्दर्शक प्रकाश इनामदार, चित्रकार अरुण सुतार, भरत कुरणे, वैभव जाधव, शिवाजी जाधव, चित्रपट महामंडळाचे विलास कांबळे, रवींद्र बोरगावकर, दिलीप कांबळे, प्रकाश प्रभावळकर, सदानंद सूर्यवंशी, प्रमोद गिरी, बबन बिरांजे, सुरेश साबळे, प्रमोद कोरडे, अविनाश कुलकर्णी, राजेंद्र कल्याणकर, शाहीर दिलीप सावंत यांच्यासह कांबळे परिवारातील सत्यम कांबळे, कैलाश कांबळे, दिव्या कांबळे, आर्या कांबळे आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: We will try to get Maharashtra Bhushan posthumously to G Kamble says Jayashree Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.