वेंगुर्ले : युवा पिढी भजनाकडे ओढली जातेय...: कोकणातील घराघरात सध्या भजनाचे सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:51 PM2018-09-18T18:51:01+5:302018-09-18T18:51:07+5:30

गणेशोत्सवात भजनाला फार महत्त्व आहे. भजनाला वयाची अट नसल्याने लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत यात सहभागी होऊन आपापल्या परीने नामस्मरण करतात. गेल्या काही वर्षात युवा पिढीही भजन कलेकडे वळल्याचे दिसत असून, त्यांच्या सहभागाने या

Vengurle: The young generation is attracted to Bhajan ... | वेंगुर्ले : युवा पिढी भजनाकडे ओढली जातेय...: कोकणातील घराघरात सध्या भजनाचे सूर 

वेंगुर्ले : युवा पिढी भजनाकडे ओढली जातेय...: कोकणातील घराघरात सध्या भजनाचे सूर 

googlenewsNext
ठळक मुद्देगणेशोत्सवात भजनाला महत्व - कोकणातील घराघरात सध्या भजनाचे सूर

प्रथमेश गुरव । 
वेंगुर्ले : गणेशोत्सवात भजनाला फार महत्त्व आहे. भजनाला वयाची अट नसल्याने लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत यात सहभागी होऊन आपापल्या परीने नामस्मरण करतात. गेल्या काही वर्षात युवा पिढीही भजन कलेकडे वळल्याचे दिसत असून, त्यांच्या सहभागाने या कलेला नवी ओळख मिळाली आहे. कोकणातील घराघरात सध्या भजनाचे सूर उमटताना दिसत आहेत.

भजन ही कला अनादीकाळापासून चालत आली आहे. भक्ती, जप आणि नमन या तीन शब्दांच्या आद्याक्षरांवरून ‘भजन’ हा शब्द प्रचलित झाला आहे.  ईश्वराची आराधना करण्याचा साधा-सोपा मार्ग म्हणजे भजन. भजन हे एकट्याने करता येते, तसेच ते सामूहिकरित्याही करता येते. त्यामुळे सर्वसाधारण भाविकांसाठी भजन हेच आराधनेचे मुख्य साधन आहे. संत-महात्म्यांनी अंगिकारलेला हा भक्तिमार्ग आजही त्याच परंपरेने सुरू आहे. 

गेली बरीच वर्षे भजन कलेवर प्रौढांची मक्तेदारी होती. मात्र अलीकडच्या काही वर्षात भजन कलेत प्रौढांबरोबरच तरुण व लहान मुलेही आवडीने सहभाग घेताना दिसत आहेत. पूर्वीच्या काळी हार्मोनियम, पखवाज, तबला शिकविणाºयांची संख्या फारच कमीच होती. त्यामुळे गायन-वादनाची कला वडिलोपार्जित वारसा असलेली मंडळीच पुढे चालविताना दिसायची. मात्र गेल्या काही वर्षात गायन-वादनाचे वर्ग ठिकठिकाणी निर्माण झाले आहेत. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी याचा लाभ घेताना दिसत आहेत. 

कोकणात संगीत आणि वारकरी हे भजनाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. मात्र आता चक्री भजन, जुगलबंदी  आदी प्रकारांमुळे भजन कलेला नवी ओळख मिळाली आहे. विविध सण-उत्सवांमध्ये जिल्हा तसेच तालुकास्तर भजन स्पर्धांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून भजनी कलाकारांना नवे व्यासपीठ मिळत असून त्यांच्या कलेचेही कौतुक होत आहे. 

गणेश चतुर्थीत घरोघरी पंचक्रोशीतील मेळ बोलावून त्यांची भजने करुन घेण्याकडे गणेशभक्तांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे अशा भजनी मेळांना संधी मिळाली आहे. सायंकाळपासून सुरु होेणारी भजने मध्यरात्रीपर्यंत, काही ठिकाणी पहाटेपर्यंतही तेवढ्याच उत्साहात सादर होताना दिसत आहेत. या भजनांमधून तरुणाई, शालेय विद्यार्थी हार्मोनिअम, पखवाज, ढोलकी, तबला आदी वाद्ये वाजविताना दिसत आहेत. 
युवा गायकही वेगवेगळ््या चालींवर अभंग सादर करुन रसिकांची मने जिंकत आहेत. भजनांना गणेशभक्तांकडूनही प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे भजन ही तरुणाईची ओळख बनू लागली आहे. तरूणाईला भजन कलेचे वेड 

भजन कला शिकण्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज भासत नाही. शालेय शिक्षण अथवा कामधंदा सांभाळूनही तबला, पखवाज, हार्मोनियम, गायन शिकता येते. त्यामुळे तरुणांसह लहान मुलांचा याकडे ओढा वाढला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या संगीत वर्गांमधून अनेक जण संगीत विशारद झाले आहेत. आज गावागावात वाडीवार भजनी मेळे दिसत असून, भजन कलेच्या जतनासाठी ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. 

आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी संगीत क्षेत्र फायदेशीर आहे. या क्षेत्रात येण्यासाठी मुलांना पालकही प्रोत्साहन देत आहेत. सामूहिक मृदुंग वादनासारख्या नवीन प्रकारांमुळे वादकांना, तर जुगलबंदी-चक्री भजनातून गायक कलाकारांना व्यासपीठ मिळत आहे. नामवंत कलाकार नवीन कलाकार घडवित आहेत. तरुणाईला संगीत क्षेत्रात चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 

निलेश पेडणेकर,  पखवाज प्रशिक्षक, वेंगुले  
गणेशोत्सव काळात भजनी मेळे रात्री जागवत आहेत.

Web Title: Vengurle: The young generation is attracted to Bhajan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.