ठळक मुद्देउदगाव, चिंचवाड अवैध माती उत्खनन प्रकरण : शेतकºयांना प्रशासनाचे आदेश जारी

उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड कृष्णा नदीकाठावरील असलेल्या मातीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शेतकरी व वीट व्यावसायिकांना सुमारे बारा कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या वीटभट्टी व्यावसायिकांत खळखळ उडाली आहे. उदगावमध्ये १० कोटी ४१ लाख १८ हजार, तर चिंचवाडमध्ये २ कोटी १६ लाख ९ हजार इतका दंड वसूल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

उदगाव-चिंचवाड येथील माती उत्खननाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे शरद चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना उदगाव-चिंचवाड येथील उत्खनन करण्यात आलेल्या मातीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये एकूण ३३ हजार ४८७ ब्रॉस मातीचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याचे समोर आले होते.

हा अहवाल मुंबई लोकायुक्त यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी तत्काळ दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उदगाव-चिंचवाडमधील बेकायदेशीरपणे माती उत्खनन केलेल्या शेतकºयांना प्रशासनाकडून दंड वसूल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनधिकृत उत्खनन केलेल्या मातीच्या बाजारभावाप्रमाणे तिप्पट रक्कम दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
पंधरा दिवसांच्या आत दंडात्मक रक्कम न भरल्यास जमीन महसुलाची थकबाकी म्हणून सक्तीच्या उपायाने वसूल करण्यात येणार आहे, असे आदेश माती उत्खननदारांना लागू करण्यात आले आहेत.

ही रक्कम मुदतीत वसूल न झाल्यास उदगाव व चिंचवाडच्या तलाठ्यांनी उत्खननदार व्यक्तीच्या सात-बारा पत्रकी नोंद करून याचा अहवाल वरिष्ठ विभागाकडे पाठविण्याचे आदेश तहसीलदार गजाजन गुरव यांनी काढला आहे. गेल्या दहा वर्षांपासून उदगाव-चिंचवाड परिसरात कृष्णा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून वीट व्यवसाय थाटला आहे. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून कमी मातीची रॉयटी भरून मोठ्या प्रमाणात मातीचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. याबाबत चिंचवाड येथील शरद चव्हाण यांच्यासह नागरिकांनी आवाज उठवून वीट व्यावसायिकांच्या विरोधात मोट बांधली होती. त्याला चांगले यश मिळाले आहे. मात्र, वीट व्यावसायिकांनी केलेले माती उत्खनन आता शेतकºयांच्या मानगुटीवर बसले आहे.

'लोकमत'चा प्रभाव
उदगाव-चिंचवाड परिसरात बेकायदेशीरपणे माती उत्खनन होत असताना नागरिकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे ‘लोकमत’ने सातत्याने उदगाव-चिंचवाड परिसरातील होत असलेल्या माती उत्खननाबाबत प्रत्येक मुद्द्यावर आवाज उठवला होता. त्यामुळे आता माती उत्खननदारांना साडेबारा कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे परिसरात निसर्गाचे संवर्धन करून नागरिकांचे प्रश्न मांडल्याबद्दल ‘लोकमत’चे कौतुक होत आहे.