शरीरातील ‘आनंददायी मूलद्रव्य’चाचणी कमी खर्चात होणार, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला मिळालं पेटंट

By संतोष.मिठारी | Published: November 29, 2022 05:13 PM2022-11-29T17:13:32+5:302022-11-29T17:17:47+5:30

मानसिक विकारांचे प्रभावी निदान होणार

The test of 'pleasure element' in the body will be done at low cost, Research in Shivaji University got a patent | शरीरातील ‘आनंददायी मूलद्रव्य’चाचणी कमी खर्चात होणार, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला मिळालं पेटंट

शरीरातील ‘आनंददायी मूलद्रव्य’चाचणी कमी खर्चात होणार, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला मिळालं पेटंट

googlenewsNext

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील ‘आनंददायी मूलद्रव्य’ असलेल्या सेरोटोनिन या मूलद्रव्यासाठी नॅनो-संयुगांच्या सहाय्याने सेन्सिंग पद्धत विकसित केली आहे. त्यासाठी त्यांना भारतीय पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. सागर डेळेकर आणि संशोधक विद्यार्थी डॉ. साजिद मुल्लाणी यांनी ही कामगिरी केली.

डॉ. डेळेकर यांचे या वर्षातील हे सलग दुसरे भारतीय पेटंट आहे. या संशोधनात रसायनशास्त्राच्या क्षेत्रामधील हे एक महत्त्वपूर्ण संशोधन असून मानवाच्या विविध मनोविकारांचे निदान आणि उपचारांमध्ये दूरगामी परिणाम करण्याची क्षमता त्यात आहे. डॉ. डेळेकर, मुल्लाणी यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले.

मानसिक विकारांचे प्रभावी निदान होणार

सेरोटोनिनच्या असंतुलनामुळे माणसाला ताण-तणाव, नैराश्य, चिंता, निद्रेच्या समस्या, पचनाच्या समस्या, आत्मघाती वर्तन, वेड लागणे, आघातानंतरची तणावपूर्ण विकृती, स्किझोफ्रेनिया (मानसिक विकार), फोबिया (भीती) यासारख्या विविध मनोकायिक समस्यांना सामोरे जावे लागते. बिघडलेल्या मानसिक संतुलनाचे जर प्राथमिक अवस्थेत योग्य निदान झाल्यास त्याची मानसिक परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते.

या निदानासाठी आजघडीला अत्यंत महागड्या वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. त्यांना पर्याय म्हणून या संशोधनांतर्गत विविध नॅनोसंमिश्रांचा वापर करून अत्यंत सुलभ व कमी खर्चिक सेरोटोनिन चाचणी पद्धती विकसित करण्यात यश आले आहे. या संशोधनामुळे विविध मानसिक विकारांचे अधिक चांगले आणि प्रभावी निदान करता येईल, त्याचप्रमाणे योग्य उपचार करण्यास मदत होईल, असे डॉ. डेळेकर यांनी सांगितले.

या संशोधन प्रकल्पावर डॉ. डेळेकर, मुल्लाणी हे सन २०१८पासून काम करीत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणजे हे पेटंट आहे. अनेक लोक मनोकायिक आजारांना बळी पडत आहेत. या संशोधनामुळे अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यात वैद्यकीय उपचारांमध्ये या पद्धतीचे समावेशन शक्य आहे. - डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू

Web Title: The test of 'pleasure element' in the body will be done at low cost, Research in Shivaji University got a patent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.