गोड बोलण्यातून प्रश्न सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:11 AM2019-01-18T00:11:26+5:302019-01-18T00:11:45+5:30

पैलवान हा तसा गरम डोक्याचा असतो. ‘तवा जाड असला की तो लवकर गार होत नाही,’ तसे पैलवानाचे असते; परंतु तिथेच खरी चूक होते. मी कायम नम्रतेने आणि विनयतेने बोललो व जगलोही. त्यातून मला मानसिक शांतता लाभली.

 Sweet talk solves the question | गोड बोलण्यातून प्रश्न सुटतात

गोड बोलण्यातून प्रश्न सुटतात

Next

- हिंदकेसरी दीनानाथ सिंह -

पैलवान हा तसा गरम डोक्याचा असतो. ‘तवा जाड असला की तो लवकर गार होत नाही,’ तसे पैलवानाचे असते; परंतु तिथेच खरी चूक होते. मी कायम नम्रतेने आणि विनयतेने बोललो व जगलोही. त्यातून मला मानसिक शांतता लाभली.

गोड बोलण्यातून प्रश्न सुटतात, असा माझा अनुभव आहे. नाही प्रश्न सुटला तरी नवीन प्रश्न निर्माण होत नाही; परंतु तुम्ही जर वाद घालत बसलात तर जुना प्रश्न तिथेच राहतो व नवीन प्रश्न तयार होतो. मी पैलवान असूनही आयुष्यभर कायमच गोड बोलत आलो. हल्ली कुटुंब असो की समाज... लोकांच्या बोलण्यात दुसऱ्याला टोचणाºया भाषेचा वापर जास्त होताना दिसतो. सहज बघा, तुम्हाला कुणी विचारले की, ‘पैलवानजी आपण जेवलात का?’ त्याला ‘होय, मी आताच जेवलो,’ असे उत्तर अपेक्षित आहे; परंतु तसे मिळताना दिसत नाही. ‘अजून राहिलोय का?’ असे आव्हानात्मक प्रत्युत्तर मिळते. जे संवाद तोडणारे असते.

माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगतो. ही गोष्ट १९९६ ची. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आम्ही एके दिवशी मंत्रालयात त्यांना सकाळी-सकाळी भेटायला गेलो; परंतु आधी वेळ घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना आम्ही तिथेच ‘हिंदकेसरी’ असे मोठ्या अक्षरांत लिहून पत्र दिले. ते वाचून मुख्यमंत्री बैठक सोडून बाहेर आले. ‘महत्त्वाची बैठक असल्याने आज सकाळी मी गणेशदर्शन न घेता मंत्रालयात आलो; परंतु इथे तर साक्षात मारुतीच मला भेटायला आला आहे,’ असे सांगत त्यांनी हिंदकेसरी मारुती माने यांच्या हाताला धरून त्यांना आत नेले.

मी त्यांना म्हणालो, ‘मग तुम्ही देवाला उपाशी ठेवू नका. हिंदकेसरींच्या मानधनाचा विषय सोडवा.’ त्यावर त्यांनी ‘तुम्ही तुमच्या अध्यक्षांना (शरद पवार) का भेटला नाही?’ असे विचारले. ‘आम्ही त्यांना सहावेळा भेटलो; परंतु प्रश्न सुटलेला नाही,’ असे आम्ही त्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री मला म्हणाले, ‘पैलवानजी, आप बहुत मिठी बातें करते है!’ त्यावर मी म्हणालो, ‘सरजी, मैं बात भी मिठी करता हूँ, मेरा आचरण और चरित्र भी मिठा है।

मुख्यमंत्र्यांनी लगेच क्रीडा सचिवांना बोलाविले व त्वरित दरमहा एक हजार रुपये मानधन सुरू करण्याचे आदेश दिले. त्यावर सचिवांनी ‘ते पुढील वर्षापासून करता येईल,’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘पुढील नव्हे, तर मागील वर्षापासून मानधन मंजूर करा,’ असे आदेश दिले. त्या वेळेपासून आमचे मानधन सुरू झाले आणि तेदेखील फक्त चांगल्या बोलण्यामुळेच...!
                                                                                                    - हिंदकेसरी दीनानाथ सिंह

Web Title:  Sweet talk solves the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.