‘उपविभागीय अधिकारी’ झाले वहिवाटदार !

By Admin | Published: December 30, 2014 09:20 PM2014-12-30T21:20:27+5:302014-12-30T23:41:13+5:30

गडहिंग्लज प्रांतकचेरी : ‘भूमिअभिलेख’कडून ‘गडहिंग्लज’च्या प्रॉपर्टी कार्डात नोंद, सुनावणीत एकतर्फी फेरफारास पालिकेची हरकत

Sub-divisional officer was a settler! | ‘उपविभागीय अधिकारी’ झाले वहिवाटदार !

‘उपविभागीय अधिकारी’ झाले वहिवाटदार !

googlenewsNext

गडहिंग्लज : नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेल्या सार्वजनिक धर्मशाळा इमारत व जागेस ‘वहिवाटदार’ म्हणून अखेर ‘उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज’ यांच्या नावाची नोंद झाली. यासंदर्भातील सुनावणीवेळी भूमिअभिलेख उपअधिक्षक सुजाता माळी यांनी ‘गडहिंग्लज’चे सहायक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार फेरफाराची प्रॉपर्टीकार्डात नोंद करण्यात आल्याची माहिती सुनावणीवेळी दिली. फेरफारीच्या या एकतर्फी नोंदीस पालिका पदाधिकाऱ्यांनी जोरदार हरकत घेतली.
येथील बसस्थानकासमोरील सि.स.नं. १३२६ मधील नगरपालिका कार्यालयाच्या बाजूस उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय आहे. ५४ वर्षापूर्वी ‘प्रांतकचेरी’ सुरू करण्यासाठी सध्याची इमारत व जागा नगरपालिकेकडून भाड्याने घेण्यात आली आहे. या मिळकतीच्या पुनर्विलोकनासाठी भूमिअभिलेख खात्याच्या येथील उपअधीक्षक कार्यालयात आज, मंगळवारी सुनावणी झाली.
सहायक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सदर जागेची मोजणी झाली असून या मिळकतीच्या सत्ता प्रकारात बदल करून १६२० चौ. मी. जागेस ‘वहिवाटदार’ म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्या नावाची प्रॉपर्टी कार्डात नोंद केल्याची माहिती उपअधीक्षक माळी यांनी सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वीच स्पष्ट केले. त्यास पालिकेतर्फे हरकत घेण्यात आली.
नगराध्यक्षा घुगरे म्हणाल्या, सदर मिळकतीबाबत सादर केलेली लेखी वस्तुस्थिती विचारात घेऊन झालेली एकतर्फी व चुकीची फेरफार रद्द करावी आणि प्रॉपर्टी कार्डावरील नोंद पूर्वीप्रमाणे कायम ठेवावी.
नगरसेवक सय्यद म्हणाले, मोजणी करण्यापूर्वी आणि फेरफाराची नोंद करण्यापूर्वी नगरपालिकेला पूर्वसूचना देणे आवश्यक होते. पालिकेने म्हणणे घेण्यापूर्वी केलेली फेरफार बेकायदेशीर आहे.
नगरसेवक भद्रापूर म्हणाले, जागामालक असणाऱ्या नगरपालिकेला न विचारता केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश आला म्हणून केलेली एकतर्फी फेरफाराची नोंद बेकायदेशीर आहे
पालिकेतर्फे नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, अरुणा शिंदे, सरिता गुरव, हारुण सय्यद, मुख्याधिकारी तानाजी नरळे, नगरअभियंता रमेश पाटील, तर प्रांतकचेरीतर्फे अव्वल कारकून महादेव मुत्नाळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)


‘लोकमत’ने फोडली वाचा !
५० वर्षांपूर्वी प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी शासनाने भाड्याने घेतलेली गडहिंग्लज नगरपालिकेची धर्मशाळा इमारत आणि जागा परत मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मंजूर विकास आराखड्यात ही जागा दुकानगाळ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे; परंतु ही जागा हस्तांतरित करण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. ठरविलेले नाममात्र भाडेदेखील २३ वर्षांपासून पालिकेला मिळालेले नसून, मार्च २०१५ पर्यंत ४०,८९८ रुपये इतके भाडे थकीत आहे, असे असतानाही या जागेवरील कब्जा कायम ठेवण्यासाठी प्रांतकचेरीकडून कूळकायदा लावण्याची शंका होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १९ नोव्हेंबरच्या अंकात वाचा फोडली होती. आजच्या सुनावणीअंती ती शंका खरी ठरल्याची चर्चा शहरात सुरू होती.


आज सर्वपक्षीय बैठक
नगरपालिकेकडून प्रांतकचेरीसाठी भाड्याने घेण्यात आलेल्या वहिवाटीतील जागेस सहायक जिल्हाधिकारी यांनी ‘उपविभागीय अधिकारी’ यांच्या नावाची नोंद झाली आहे. शहरातील मोक्याच्या या जागेवर दुकानगाळ्यांचे आरक्षण ठेवले आहे. फेरफारातील नोंदीमुळे पालिकेचे नुकसान होण्याबरोबरच या जागेवरील दुकानदारांवरही अन्याय होणार आहे. त्यामुळे त्यासंदर्भात विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या, बुधवारी सकाळी १० वाजता नगरपालिकेत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा घुगरे यांनी पत्रकातून दिली.


सुनावणीपूर्वीच फेरफार !
भूमिअभिलेख जिल्हाअधीक्षक यांच्या आदेशान्वये गडहिंग्लज नगरपालिका कार्यालय व उपविभागीय कार्यालय असणाऱ्या सि.स.नं. १३२६ या मिळकतीबाबत पुनर्विलोकन करून निर्णय देणेकामी प्राप्त प्रकरणाच्या चौकशीकरिता येथील उपअधीक्षकांनी आज दुपारी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीस हजर राहण्याची नोटीस सहायक जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना १६ डिसेंबर रोजी बजावण्यात आली होती. मात्र, या सुनावणीपूर्वीच २२ डिसेंबर २०१४ रोजी ‘फेरफारा’ची नोंद प्रॉपर्टीकार्डात झाल्याचे सुनावणीवेळी स्पष्ट झाले.

Web Title: Sub-divisional officer was a settler!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.